वर्डस्वर्थने पुष्कळ दिवस लग्न केले नाही. त्याची बहीण त्याची काळजी घेई. पुढे त्याने लग्न केले, तरीही बहिणीचे प्रेम कमी झाले नाही. ही बहीणभावंडे इंग्रजी वाङ्मयात अमर आहेत. वर्डस्वर्थ त्याच्या काव्यासाठी, व बहीण- भावावरील प्रेमासाठी. तिचे जीवन म्हणजे भ्रातृप्रेमाचे मूर्तिमंत महाकाव्य!
मराठीतील केशवसुत, टिळक वगैरे कवींवर वर्डस्वर्थचा खूप परिणाम झालेला आहे. वर्डस्वर्थच्या काही कवितांचा त्यांनी मराठीत अनुवादही केलेला आहे.
सुधामाई, मी वर्डस्वर्थबद्दल लिहीत आहे. आणि परवा वामन पंडितांची पुण्यतिथी होती, त्यांचीही आठवण येत आहे. इ. स. १६३३ मधील त्यांचा जन्म. ''सुश्लोक वामनाचा'' या शब्दांनी आरंभ होणारी आर्या तुला माहीतच असेल. मराठीत वामन नावाचे कवी अनेक झाले म्हणतात. परंतु अनेक आख्याने लिहिणारा, गोड शब्दरचना करणारा, अनुरूप वृत्ते वापरणारा वामन इतरांपासून उमटून पडतो. या वामनाने गीतेवर यथार्थदीपिका म्हणून वीस हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला 'भावार्थदीपिका' असे नम्रतेने म्हटले. वामनांना तो 'भावार्थ' जणू रुचला नाही आणि त्यांनी गीतेचा 'यथार्थ' दाखविला. परंतु महाराष्ट्राने भावार्थदीपिकाच हृदयाशी धरिली. वामनांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले आहे. भाषांतर वामनांनीच करावे. भर्तृहरीची तिन्ही शतके त्यांनी मराठी काव्यात अनुवादिली. परंतु ही त्यांची काव्यरूप अनुवादशक्ती गीतेच्या समश्लोकीत कळसास पोचली आहे. विनोबाजींची गीताई व वामनांची समश्लोकी यांची मागे मी तुलना करीत बसे. विनोबाजींची अधिक प्रासादिक व गंभीर वाटते. परंतु दोनचार ठिकाणी वामन सरस वाटला.
कवितेत अधिक अक्षरांची यमके आणण्याची प्रथा वामनांनी पाडली. त्यांना 'यमक्या वामन' असे म्हणतात. यमक हा मराठी काव्याचा प्राण आहे. काही भाषांचे जणू काही विशेष असतात. ते का असतात सांगता येत नाही. संस्कृतमधील निर्यमक रचना कानास गोड वाटते; परंतु मराठी नाही वाटत. विनोबांची निर्यमक गीताई वाचताना गोड वाटते. हा अपवादच म्हटला पाहिजे.
वामनांच्या कवितेत ठायी ठायी शब्दचमत्कार आहेत, प्रास- अनुप्रास खच्चून भरलेले आहेत. यामुळे अर्थाची हानी होते. परंतु हे दोष वगळले तर वामनाची रचना किती रमणीय वाटते. हुबेहूब चित्र त्यांनीच उभे करावे. श्रीकृष्णाचे पुढील वर्णन वाचा :-
अंग वक्र अधरी धरि पावा । गोपवेष हरि तोचि जपावा ।
वामबाहुवरि गालहि डावा । तो ठसा स्वहृदयात पडावा ॥
मुरलीधराचे - वाकडी मान, डाव्या बाहूवर मान, हातात बासरी- हे शब्दचित्र किती गोड आहे! आणि कृष्णाची वेणू ऐकून दूध पिणारी वासरे दूध प्यायचे विसरतात, तोंडातील दूध बाहेर पडते :-
मातृस्तनीचा रस आननात । तो होय वेणुध्वनि काननात ।
गळे गिळेना पय वासरांते । आश्चर्य वाटे गगनी सुरांते ॥
असे हे सहृदय वर्णन आहे. आपल्या गर्जनेने कृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐकायला जाणार नाही म्हणून मेघ हळूहळू गर्जू लागला :-
हळुहळू घन गर्जतसे नभी । मुरलिहून चढेल म्हणून भी ॥
किती सहृदय भाव ! सुधाताई, तू वामनांची भरतभाव, वामनाख्यान, प्रल्हादाख्यान, भीष्मप्रतिज्ञा, कालियामर्दन, वेणु-सुधा, लोपामुद्रा- सीतासंवाद, इत्यादी आख्याने तरी वाच. कालियाने कृष्णाला वेढे दिले आहेत. कृष्ण आपले अंग फुगवतो. कालियाचा देह का तटातट तुटणार?