सुधा, अग पुन्हा बरीच थंडी पडू लागली आहे. यंदा आहे तरी काय? होळी जळाली, थंडी पळाली, असे आपण म्हणतो. परंतु अजून हवेत गारवा आहे. गार वारे वाहात आहेत. रात्री पांघरून घ्यावे असे वाटते.
जे आंबे लौकर मोहरले होते त्यांच्यावर मोठमोठ्या कै-या झाल्या आहेत. परवा मी कै-या भाजून त्याचे मेतकूट केले होते. तुझ्या आजोबांना ते फार आवडायचे. याला गूळ मात्र बराच लागतो. परवा आंब्याची डाळही एके ठिकाणी मिळाली. आम्ही लहानपणी आंबा किसून त्यात गूळ व थोडे तिखटमीठ घालून खात असू. आईलाही तो प्रकार आवडे. घरोघर आता आंब्याची कढी केली जाते. आंबा म्हणजे गोरगरिबांचे फळ.
सुट्टीत सेवा दलाच्या मुलांचा एके ठिकाणी या बाजूला दीड दिवसाचा मेळावा होता. लहान लहान शेकडो मुले आली होती. घरून दशमी भाकर घेऊन आली होती. कोणी कोरडे पिठले आणले होते, कोणी लसणीची चटणी, तर कोणी दोन कांदेच आणले होते. मेळाव्याला मी गेलो होतो, परंतु खरे सांगून का? मला सभोवती मुले जमवून त्यांना गोष्ट सांगणे आवडते. हल्ली काय असते? तो 'रावण' असतो. रावण म्हणजे काय ते ओळखलेस का? रावण म्हणजे लाऊड स्पीकर! विनोबाजी त्याला 'रावण' म्हणतात. रावण शब्द का 'रव' म्हणजे आवाज यावरून बनला? हा रावण असला म्हणजे मुले दूर दूर रांगेत बसतात. मजा वाटत नाही. समरसता होत नाही. गोष्टीच्या वेळेस तरी सारी मुले सभोवती जवळजवळ बसावीत. मग मजा येते, गंमत वाटते. या वेळेस मी गोष्ट सांगितली नाही. मी जरा विमनस्कच होतो. परंतु चार शब्द तर सांगावे लागलेच. सुधा, मला सेवा दलाच्या मुलांना घेऊन जंगलात जावे असे वाटते. सेवा दलाचे वर्ग नको शहरात, नको खेडयात. ते दाट जंगलात भरवावे. सृष्टीच्या सान्निध्यात, निसर्गात राहावे आठ-दहा दिवस. तेथे नदी मात्र हवी. नदीसारखा आनंद नाही. डुंबायला, पोहायला पाणी हवे. कपडे धुवायला, भांडी घासायला नदीवर जाता येते. रानातील झाडेमाडे, लतावेली, फुले यांची मुलांना ओळख करून देता येईल. आपल्याला कशाची माहिती नसते. चार झाडांची, चार फुलांची नावे माहीत नसतात. सुधा, मोठमोठ्या जंगलात प्रचंड वेली प्रचंड वृक्षावर चढलेल्या असतात. कधी दोरांप्रमाणे त्यांचा उपयोग करून वर चढता येते. जणू वृक्षांनी खाली सोडलेले मजबूत दोर. कधी दोन झाडांच्या मधून या वेली गेलेल्या असतात. त्यांच्यावर झोके घेता येतात. भारतीय संस्कृती तपोवनात जन्मली, सृष्टीच्या सान्निध्यात संवर्धिली गेली.
आणि तेथे पाखरांची ओळख होते. नाना रंगाचे नि आकारांचे पक्षी, त्यांचे ते निरनिराळे आवाज. आपल्या पालगडच्या किल्ल्याजवळच्या राईत मोर आहेत. लहानपणी त्यांचा आवाज ऐकला म्हणजे मी नाचत असे. मोरांचा तो उत्कट आवाज मला फार आवडतो. मोरोपंतांनी देवाचा धावा मांडला, त्याला त्यांनी 'केकावली' असे नाव दिले. 'आर्या केकावली' व 'पृथ्वी केकावली' अशा दोन केकावली मोरोपंतांनी लिहिल्या. पृथ्वी वृत्तातील त्यांची केकावली फार प्रसिध्द आहे. विनोबाजी विद्यार्थी असताना बडोद्यास केकावलीतील श्लोक मोठयाने म्हणत व सारी आळी दणाणीत. मला केकावली फार आवडे. मी ती सारी पाठ केली होती. 'सुसंगति सदा घडो' वगैरे केकावलीतील श्लोक पूर्वी मुलांना पाठ येत. मोराच्या आवाजाला 'केका' असा शब्द आहे. मोरोपंतांनी स्वत: मोर कल्पून या काव्याला केकावली असे नाव दिले.
पाखरांचे आवाज ऐकण्यात एक विशिष्ट आनंद असतो. दुपारची वेळ व्हावी. पक्षी वडासारख्या मोठया झाडावर दुपारी विसावा घ्यायला बसतात. गोड किलबिल चाललेली असते. अशा वेळेस झाडांच्या बुंध्याशी डोके ठेवून ती किलबिल ऐकत ऐकत झोपी जाण्यात एक मधुर सुख असते. मला पाखरे पाहण्याचा लहानपणी फार नाद होता. लहानपणी आपला आत्मा मोकळा असतो. आपल्या मनोबुध्दीला जणू त्या वेळेस पंख असतात. पुढे वाढत्या वयाबरोबर शेकडो चिंता येतात. आपले पंख जणू तुटतात. हृदयावर बोजा असतो. मग का पाखरे आवडेनाशी होतात?