संध्याकाळची वेळ होती. एक तरुण नि तरुणी जात होती. तरुणीच्या कडेवर मूल होते. ती दोघे नवरा-बायको होती यात संशय नव्हता. आणि त्यांचेच ते मूल होते. ती लहान मुलगी होती. वर्षाची असेल नसेल. कपडयांवरून त्यांची गरिबी दिसून येत होती. पुरुषाचा पोषाख एखाद्या शेतमजुरासारखा होता. तो धट्टाकट्टा होता. उंच, धिप्पाड होता. अंगात एक जाड सदरा होता. कमरेला जाडसे एक मळलेले धोतर होते. त्याने काचा मारलेला होता. डोक्याला लाल रंगाचे जरा जीर्ण असे मुंडासे होते. कपडयांवर धूळ उडालेली होती. पायांतील जाड वाहाणा धुळीने भरून गेल्या होत्या. तो बेफिकीरपणे चालत होता. शहरातील मजुरांची चाल त्याच्या चालण्यात नव्हती. तो नीट पावले टाकीत चालला होता. जणू पायाखाली जगाला तुडवीत चालला होता. त्याची वृत्ती बेडर असावी. त्याच्या जीवनात श्रध्दा नसावी. दो दिन की दुनिया, आहे काय नि नाही काय, असे त्याला वाटत असावे. त्याच्या अगदी जवळून त्याची पत्नी चालत होती. जाडेभरडे लुगडे ती नेसली होती. पारव्या रंगाचे व लाल काठाचे ते लुगडे होते. पदर खोवून ती जात होती. नवर्‍यापासून जणू ती दूर राहू इच्छित नव्हती. त्याला खेटून चालत होती. त्याचे कोपर तिला मधून मधून लागत होते, परंतु त्याचे लक्ष नव्हते. त्याची बायको फार सुंदर नसली तरी बर्‍यापैकी होती. कडेवरच्या लहान मुलीकडे जेव्हा ती बघे, आणि सूर्यास्ताचे रम्य किरण तिच्या तोंडावर पडत तेव्हा ती सुरेख दिसे. ती दमली होती. कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. मधून ती मुलीचा मुका घेई. ती चिमुकली मुलगी गोड हसे. लहान हात नाचवी. आईचा पदर ओढून दूध पिऊ पाही. ती शेवटी एका झाडाखाली बसली. मुलीला तिने पाजले. परंतु नवरा थांबला नव्हता. तो पुढे जात होता. तीही लगबगीने पाठोपाठ आली. त्याला गाठून त्याच्याबरोबर मुकाटयाने चालू लागली. एकमेकांशी ती बोलत नव्हती. तिला त्याचे वाईट वाटत नसावे. तिला जणू त्या गोष्टीची सवय होती. तिची त्याच्याकडून उपेक्षाच होत असावी. प्रेमाचा शब्द तिला मिळत नसावा. बिचारी जात होती. कडेवरच्या मुलीचे गोड हसणे, तिचे बोबडे बोलणे हाच त्या प्रवासातील तिचा आनंद होता.

पाखरे घरटयांत परत जात होती. वरून त्यांचे थवे जात होते. परंतु तो पहा एक पक्षी! एकटाच झाडाच्या एका शेंडयावर बसला आहे. त्याने गोड शीळ घातली. कोणाला घातली? रानात अशी गोड गाणी सायंकाळी ऐकू येत असतात. परंतु त्या तरुणाचे तिकडे लक्ष नव्हते.

गाव आता जवळ आला. कळमसर गाव मोठा होता. गावचे शिवार आले. एक शेतकरी घरी जात होता.

''या गावात काही कामधंदा मिळेल का? गवत कापण्याचे काम मिळेल का?''

''या दिवसांत का गवत कापण्याचा हंगाम असतो? कोठून आलेत तुम्ही राव? आणि धंदा बघायला का या भिकार कळमसरला आलेत? अहो, येथले लोक धंदा पहायला बाहेर जातात.'' असे म्हणून तो शेतकरी निघून गेला. दुसरा एक मनुष्य त्यांना भेटला.

''येथे राहायला एखादी झोपडी मिळेल का? भाडयाचे लहानसे घर मिळेल का, दादा?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel