''आज कित्येक वर्षे एकटाच आहे. तुम्ही राहा इथे. मला तुमची जोड मिळू दे. तुम्ही माझे नोकर म्हणून नका राहू; जणू माझे स्नेही, सहकारी.
''तुमचे वय चाळीस असेल. माझे पंचवीस वर्षांचे. मी तुमचा स्नेही कसा होऊ शकेन? आणि तुम्ही लक्षाधीश व्यापारी, नगरपालिकेचे अध्यक्ष. मी कोठला कोण? गरीबाची का थट्टा करता? मला जाऊ दे. दूर दूर जाऊ दे. दुनिया बघून येऊ दे.''
''जवळची दुनिया पाहिलीत का? आपल्या आजूबाजूला का थोडी दुनिया असते? ती कधी बघता का आपण? रात्रभर विचार करा. मी पुन्हा सकाळी येईन. तुम्ही दमलेले दिसता. निजा आता. परंतु तुम्ही माझे मित्र बना. मीही जगात एकटा आहे. मला तुमची मैत्री द्या.''
''आभारी आहे.''
रंगराव उठले. तो पाहुणा उठला. रंगरावाने प्रेमाने त्या तरुणाचा हात हातांत घेतला. त्याने त्याच्याकडे भावनापूर्ण डोळयांना बघितले आणि जिना उतरून तो गेला. तो पाहुणा गॅलरीत उभा राहून रंगरावाकडे बघत होता आणि रंगरावानेही उपक्षेने वर पाहिले. पाहुणा एकदम आपल्या खोलीत गेला नि अंथरुणावर पडला.
''चमत्कारिक गृहस्थ. खरोखरीच तो एकटा आहे? मग एवढे खटाटोप कशाला करतो?'' असे तो स्वत:शीच म्हणाला. पहाटे उठून रंगराव येण्यापूर्वीच निघून जावयाचे असे त्याने मनाशी ठरविले.
''आई, झोपलीस?'' हेमाने विचारले.
''झोप नाही ग येत. तू सुध्दा अजून जागी आहेस वाटते? नीज आता.''
''आई, ते रंगराव एकटे आहेत. त्यांचे नि आपले काय ग नाते? बाबांचे नाते होते की तुझे? ते दूरचे, अगदी दूरचे नातलग आहेत. होय ना? श्रीमंत आहेत, परंतु एकटे आहेत. कंटाळत असतील. दु:खी-कष्टी असतील. नाही आई?''
''नीज ग. नको आता बोलू!''