''भाऊ, पहिली पत्नी जर निरपराध असेल तर तिच्याशीच पुन्हा संसार करावा.''
''पहिली पत्नी निरपराधी आहे असे समज. असला अपराध तर तिच्या पतीचा आहे असे घटकाभर मान.''
''मग तर त्या पहिल्या पत्नीला जवळ करणे हा सत्याचा मार्ग होय.''
''परंतु दुसरीने काय करावे? पहिली पत्नी नाहीशी झाल्यावर तो मनुष्य असाच कोठे तरी भटकत असतो. तो आजारी पडतो. ती दुसरी स्त्री त्याची शुश्रुषा करते. परस्परांचे प्रेम जडते. मी तुझ्याशी लग्न करीन असे तो तिला अभिवचन देऊन बसतो. आणि अशा वेळेस. ती त्याची पहिली पत्नी आकाशातून किंवा पाताळातून येते. त्या पहिल्या पत्नीशी पुन्हा संसार करणे हा तू सत्याचा मार्ग म्हणून सांगतोस. परंतु ज्या स्त्रीने आपत्काळी सेवा केली, प्रेम दिले, तिला फसवल्यासारखे नाही का होत? तिच्या हृदयाची काय स्थिती होईल?''
''भाऊ, या जगात सर्वांनाच आपण सुखी करू शकणार नाही. त्यातल्या त्यांत योग्य ते करावे. त्या दुसर्या स्त्रीला सर्व सत्यकथा कळवावी. साहाय्य म्हणून तिला काही द्यावे. पहिली पत्नी समजा मेली आणि दुसरी तोवर अविवाहितच राहिली तर तिच्याशी पुढे लग्न करावे. परंतु कोणाची मरणे गृहित धरणे पाप आहे. मला तर वाटते परत आलेल्या निरपराधी पत्नीला जवळ करणे श्रेष्ठ धर्म होय. परंतु भाऊ, तुम्ही हे सारे मला का विचारीत आहात? कोणाची ही गोष्ट? की कादंबरी लिहीत आहात तुम्ही?''
''हेमंत, मी अरसिक आहे. मी का कादंबरी लिहिणार?''
''तुम्ही रसिक आहात. प्रेमळ आहात. एका अपरिचित माणसाला तुम्ही एकदम प्रेम दिलेत. त्याच्यावर लाखो रुपयांच्या देवघेवीचा विश्वास टाकलात. एखाद्या कादंबरीतील तुम्ही नायक शोभाल. ते जाऊ दे. सांगा ना, तुम्ही हे सारे का विचारीत आहात?''
रंगरावांनी हेमंतला सारी हकीगत सांगितली. तो गंभीरपणे ऐकत होता. शेवटी दोघे स्तब्ध बसले.
''तुमच्यावर प्रेम करणारी ती सुलभा हल्ली कोठे असते? तीही का येथे आली आहे?''