सायंकाळ झाली. खानावळ गजबजली. हेमा तेथे वाढत होती. काम करीत होती. माया नऊ केव्हा वाजतात याची वाट बघत होती. ती आज जेवली नाही. नवाचे ठोके पडताच ती उठली. केस नीटनेटके करून, अंगावर एक जुनी शाल घेऊन ती बाहेर पडली.
''आई, लौकर ये.'' हेमा म्हणाली.
''होय, बाळ.'' ती म्हणाली.
नगरपालिकेचे दिवे मिणमिण करीत होते. आज चांदणे नव्हते. जरा अंधारच होता. रस्ते भराभरा ओलांडून माया गावाबाहेर आली. त्या बाजूला आता रहदारी नव्हती. त्या डोंगराजवळ आली. तेथे एक मोठा दगड होता. त्याच्या आड ती बसली. त्याची वाट पाहत बसली. आणि रंगराव आला. ती उभी राहिली.
''बस माया, पुन्हा आपण भेटत आहोत.''
''किती वर्षांनी?''
''अठरा वर्षे झाली त्या गोष्टीला.''
''तू मला विकलेस.''
''अग, ते दारूतले विकणे. तो का करार असतो? मी शंभरदा पूर्वी तसे म्हटले असेल. परंतु त्या दिवशी तुला खरे वाटले. भोळी. तू अगदी भोळी. भोळी माणसे निरुपद्रवी असतात. परंतु कधी कधी त्यांचा भोळेपणा सर्वांना भोवतो. माया, इतकी वर्षे मी एकटा आहे. दारूला त्या दिवसापासून शिवलो नाही; शपथेची मुदत आणखी दोन वर्षे आहे. परंतु सवयच आता नाही.''
''पुन्हा न लागो. आता आपण काय करायचे! मी हेमाला तुझे माझे नाते अजून सांगितले नाही. ती तुझी मुलगी. परंतु त्या जयंताचेच नाव लावते.''
''तिला तुझे पूर्वीचे नाते माहीत नाही, हे बरे. तू तिला सांगितले नाहीस ही फार चांगली गोष्ट केलीस. नाही तर माझ्याविषयी तिला आदर वाटला नसता. परंतु आता आपण पुन्हा एकत्र कसे व्हायचे? पूर्वीची आपण पतिपत्नी होतो असे तर कोणाला कळता कामा नये. माया, मी एक मार्ग शोधून काढला आहे.''
''कोणता?''