''आई, भेटले का ते?'' अंथरुणावर पडल्या पडल्या हेमाने विचारले.

''होय बाळ, भेटले. आपले नष्टचर्य लौकरच संपेल. ते आपणाला आधार देणार आहेत. उद्या आपण एक घर भाडयाने घेऊ. तेथे आनंदाने राहू. ते मदत करणार आहेत. तू आता लिहावाचायला नीट शीक. शहाणी हो, बरे का?''

''मी चांगली होईन. शहाणी होईन. मला खूप वाचावेसे वाटते. नवीन नवीन ज्ञान मिळवावेसे वाटते. मी होईनच चांगली.''

दोघी झोपल्या. दुसर्‍या दिवशी मायलेकी घर बघण्यासाठी बाहेर पडल्या. नगरपालिकेच्या बागेजवळ भाडयाने घर म्हणून पाटी होती. मायेने चौकशी केली. पहिल्या मजल्यावरच्या दोन खोल्या भाडयाने द्यायच्या होत्या. त्यांनी जागा पाहिली.

''छान आहे जागा. येथे सज्जातून समोर बाग दिसते. आई, येथेच आपण राहू.''

''मलाही तसेच वाटते.''

ठरवाठरवी झाली. मालकाने खोल्या झाडून पुसून ठेवल्या. दोघीजणी तेथे राहायला आल्या. त्यांनी चार भांडी खरेदी केली. सारा संसार त्यांनी तेथे मांडला. बर्‍याच उशीरा का होईना, त्यांनी नवीन घरातच स्वयंपाक केला. दोघींना बरे वाटले. जेवण आटोपल्यावर दोघींनी चटईवर जरा अंग टाकले.

इकडे रंगराव नि हेमंत दोघे जेवण आटोपून दिवाणखान्यात बसले होते.

''भाऊ, तुमचा चेहरा आज जरा गंभीर आहे. का बरे? कसल्या विचारात आहात? नवीन धान्य आता लौकरच येऊ लागेल. यंदा हंगाम जरा उशीरा सुरू होईल, असे वाटते. काळजी नका करू. माझा पायगुण काही वाईट नाही.''

''तुझा पायगुण फार चांगला आहे. गेलेली संपत्ती परत येत आहे. हेमंत, तुला एका महत्त्वाच्या बाबतीत सल्ला विचारायचा आहे. तू प्रामाणिक, प्रांजळपणे देशील अशी मला खात्री आहे.''

''मी सल्ला देईन. परंतु तुम्ही ऐकाल का?''

''हो, ऐकेन. हेमंत, समज, एका मनुष्याची पहिली बायको एकाएकी कोठे नाहीशी झाली. त्याने बरीच वर्षे वाट पाहिली. ती येण्याचे चिन्ह न दिसल्यामुळे तो दुसर्‍या एका स्त्रीजवळ लग्न ठरवतो. परंतु इतक्यात ती पहिली पत्नी येते. तर आता त्या पुरुषाने काय करावे? पहिल्या पत्नीला घरात घेऊन संसार सुरू करावा की त्या नवीन दुसर्‍या स्त्रीजवळ ठरल्याप्रमाणे विवाह करावा?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel