''अशक्य, अगदी अशक्य. त्या हेमंताला या गावातून हाकलल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मीच या गावात त्याला ठेवून घेतले; मी त्याच्यावर अपार प्रेम केले. परंतु जेथे तेथे स्वत:चा बडेजाव तो मांडू लागला. हेमंत कृतघ्न आहे. आता येथील नगरपालिकेचा अध्यक्ष व्हावे, असेही म्हणे त्याच्या मनात येत आहे. मला धुळीत मिळवून हा खुर्चीत बसणार? हेमा, हेमंताचे नाव उच्चारीत जाऊ नकोस. माझ्या घरात राहावयाचे असेल तर हेमंतापासून दूर राहा. तू माझी मुलगी; होय ना? पित्याची इच्छा, पित्याची आज्ञा मान. नाही ना हेमंताचे नाव घेणार?''
''बाबा, हेमंत का खरोखरच वाईट आहेत?''
''वाईट की चांगला हा प्रश्न नाही. तो माझा शत्रू आहे. तुझ्या पित्याचा तो शत्रू आहे.''
''नका असे म्हणू.''
''बोल. कबूल कर. नाही ना कधी त्याचे नाव काढणार?''
''तुमची इच्छा असेल तर नाही काढणार.''
''अशी शहाणी, समजूतदार हो. तुला मी काही कमी पडू देणार नाही.''
हेमा उठून गेली. तिला वाईट वाटत होते. परंतु काय करणार बिचारी? रंगरावही कपडे करून बाहेर पडले. ते आपल्या दुकानात आले, तो त्यांच्या येण्याची वाट बघत एक मनुष्य तेथे बसलेला होता.
''नमस्कार!'' तो मनुष्य उठून म्हणाला.
''कोण तुम्ही?''
''मी सोमा. तुमची जाहिरात वाचून तुमच्याकडे नोकरीसाठी आलो होतो. परंतु त्या हेमंतला ठेवल्यामुळे तुम्ही हाकलून लावलेत. मी इतके दिवस कोठे चांगली नोकरी मिळेल का म्हणून धडपडत होतो. परंतु मिळाली नाही. आता हेमंत तुमचा शत्रू आहे. आणि तो माझाही शत्रू आहे. कारण त्यानेच माझ्या पोटावर पाय आणला. मला ठेवता तुमच्याकडे? मला धान्याची सारी माहिती आहे. बाजारभाव कसे चढतात, कसे घटतात; धान्य किती भरावे, केव्हा भरावे; मला सारे माहीत आहे. माझे ठोकताळे अचूक ठरतात. ठेवता का मला?''