ती मंडळी गेली. हेमंतने सुंदर थिएटर बांधायचे सुरू केले. रंगरावाला ही गोष्ट ऐकून मत्सर वाटला. आपणही कोणी खेळाडू हाताशी धरून खेळ करवावे असे त्याच्या मनात आले. त्याने पैसे वगैरे देण्याचे ठरवून चार खेळाडू ठरविले. डोंगराच्या बाजूला मैदानावर खुल्या जागेत ते खेळ करावयाचे त्याने निश्चित केले. तेथे रंगराव स्वत: अध्यक्ष होणार होते. बक्षिसे वाटणार होते.
खेळांचा दिवस आला. रंगराव मैदानावर गेले. काही माणसे जमली. परंतु तुफान वारा सुरू झाला. आणि पाऊसही. भराभर मंडळी पळाली. रंगराव हिरमुसला. परंतु हेमंतने उभारलेल्या थिएटरात सुंदर रीतीने निरनिराळे खेळ होत होते. तिकडची मंडळीही इकडे आली. थिएटर गजबजले होते. खेळाडूंना टाळया मिळत होत्या. शेवटी हेमंतने अध्यक्ष म्हणून भाषण केले. तिकडे रंगरावांकडे खेळ नीट होऊ शकले नाहीत म्हणून त्यांने खेद दाखविला. आपल्या गावात एखादे सार्वजनिक थिएटर असावे असे त्याने सुचविले. त्याने खेळाडूंचे अभिनंदन केले. आनंदाने मंडळी घरी गेली.
सारंग गावात हेमंतचे नाव सर्वांच्या तोंडी झाले. अशा लायक माणसाला रंगरावांनी काढून टाकले म्हणून त्यांची छीथू होऊ लागली. रंगरावांचा व्यापारही बसू लागला. हेमंतचा जम चांगलाच बसला. गावातील तो प्रमुख व्यापारी झाला. त्याच्याकडे आधी शेतकरी येत. त्याला धान्य नको असेल तर मग ते दुसर्या व्यापार्याकडे जात.
त्या दिवशी सायंकाळी हेमा फिरायला गेली नव्हती. आणि रंगरावही एकदम घरीच आले. हेमाला घरी पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
''हेमा, आज फिरायला नाही गेलीस?'' त्यांनी विचारले.
''कंटाळा आला होता. आणि आज मला आईची आठवण येत होती. बाबांचीही आठवण आली.''
''तुझे बाबा तुझ्यावर प्रेम करीत का?''
''हो, मला जवळ घ्यायचे, माझ्यासाठी फुले आणायचे.''
''हेमा, मी का तुझ्यावर प्रेम करीत नाही?''
''तुम्हीही करता, तुम्ही आधार दिलात म्हणून तर मी सुखी आहे. नाही तर ही पोरकी हेमा एकटी या जगात काय करती?''