अजून झुंजुमुंजू होते. कोंबडा केव्हाच आरवला होता. कोठे कोठे पक्षी झाडावर बसल्याबसल्या गोड आवाज काढू लागले होते, परंतु माणसांची जा-ये अद्याप सुरू झाली नव्हती. कोणी उद्योगी शेतकरी उठले होते. कोणी गरीब रानातून मोळी आणण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु रस्ते अजून शून्य होते. गजबज नव्हती.
तो पाहुणा उठला. आपली पिशवी नि वळकटी घेऊन तो निघाला. अमेरिकेत जायला निघाला होता. परंतु एवढेसेच सामान त्याच्याजवळ. कसा जाणार तो अमेरिकेत? खानावळवाल्याचे पैसे देऊन प्रणाम करून तो गेला.
आता उजाडले आणि ते पहा रंगराव घोडयावर बसून आले. खानावळीचा मालक बाहेर तोंड धूत होता. त्याने झटकन सारे आटोपून नम्रपणे प्रणाम केला.
''पाहुणे उठले का?'' रंगरावांनी प्रश्न केला.
''ते तर निघूनही गेले. कोंबडयाबरोबर ते उठले होते. पायीच गेले.''
''त्यांनी काही निरोप ठेवला आहे?''
''नाही.''
''कोणत्या बाजूने गेले?''
रंगरावांनी घोडयाला टाच मारली. घोडा वेगाने निघाला. वरून गॅलरीतून हेमा नि माया बघत होत्या.
''त्या पाहुण्यांचे त्यांना वेड लागल्यासारखे झाले आहे; नाही आई?''
माया काही बोलली नाही. ती शून्य दृष्टीने बघत होती. हेमा खाली गेली. तोंड वगैरे धुऊन काम करू लागली. त्या खानावळीत आजचा दिवस तरी राहणे प्राप्त होते. मायाही आपल्या उद्योगाला लागली.