टप्प्याटप्प्याने प्रवास करीत एके दिवशी सायंकाळी माया नि हेमा सारंगगावाला आली. सारंगगाव मोठे गाव होते. रस्ते मोठे होते. गावाच्या एका बाजूला वेगवती नदी होती. नदीच्या बाजूला गरीब वस्ती होती. नदीच्या पलीकडच्या तीराला दुसर्या जिल्ह्याची हद्द लागत होती. पुष्कळ वेळा तिकडे चोरी करून रात्री गुपचूप इकडे येऊन भुरटे चोर झोपत असत.
हेमा नि माया रस्त्यातून जात होती. एका मोठया चौकाजवळ ती आली. तेथे खूपच गर्दी होती. बँड वाजत होता. कसला होता तेथे समारंभ?
''आई, येथे पुष्कळ लोक आहेत. विचारू का कोणाला त्यांचा पत्ता? त्यांचे काय नाव तू सांगितलेस?''
''तू नको विचारू, मीच विचारीन. परंतु ही गर्दी कसली? आणि ही वाद्ये कशाला? कोणाचे लग्न आहे की काय?''
''काय हो, काय आहे इथे?'' हेमाने एका पोक्त माणसाला विचारले.
''तुम्ही का परकी माणसे आहात? येथे आज मोठा समारंभ आहे. तो वरती दिवाणखाना बघा. शृंगारलेला दिवाणखाना. तेथे आज मेजवानी आहे. गाणे आहे. रंगरावांचा सन्मान आहे. नगरपालिकेचे ते पुन्हा बिनविरोध अध्यक्ष निवडले गेले. म्हणून हा समारंभ. म्हणून ही वाद्ये.''
''रंगारावांचा सन्मान? आई, रंगरावच ना ग त्यांचे नाव? ते येथे अध्यक्ष आहेत, आई.''
''होय, मुली. ते अध्यक्ष आहेत. ते श्रीमंत आहेत. मोठे व्यापारी आहेत. त्यांचा केवढा थोरला बंगला आहे. धान्यबाजारात त्यांच्याशिवाय पान हालत नाही. परंतु ते नकार देतात. ते पाहा. ते रंगराव. ते उभे आहेत. बोलणार आहेत बहुधा. ते नेहमी गंभीर असतात. त्यांच्या इच्छेविरूध्द काही झाले तर चिडतात.''
''इतर लोक तर खाण्यापिण्यात दंग आहेत. हे का नाही खातपीत?'' हेमाने विचारले.
''रंगराव व्रती आहेत. दारूला ते स्पर्शही करीत नाहीत. पूर्वी म्हणे फार दारू पीत. परंतु पुढे त्यांनी शपथ घेतली. लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटतो.''
एकाएकी वाद्ये थांबली. सारे शांत झाले. रस्त्यावरची मंडळी गप्प झाली. हेमा, मायाही वरती बघत होत्या. अध्यक्ष भाषण करू लागले.