परंतु पुढे सारेच अंदाज चुकले. रब्बीचे पीक सोळा आणे आले. आणि परदेशांतूनही अपार धान्य आले. भाव घसरले. रंगरावांनी ज्या दराने खरेदी केली होती, त्यापेक्षा दर किती तरी खाली गेला. हेमंत चाणाक्ष होता. पुढे भाव  वाढतील असा त्याचा तर्क होता. आता त्याने ते स्वस्त धान्य खरेदी केले. भाव आणखी घसरले तर काय करा, असे मनाच येऊन रंगरावाने विकण्याचे ठरविले.

''तो मूर्ख हेमंत विकत घेत आहे. बेटा सपशेल बुडेल. कारण भाव घसरतच जाणार.'' सोमा म्हणाला.

''आपण नुकसानीत आलो. परंतु त्याचे अधिक होईल.'' रंगराव म्हणाले.

हेमंताने कोठारे भरली. आणि चार महिन्यानी भाव पुन्हा कडाडले. हेमंताचा होरा खरा ठरला. अपरंपार फायदा झाला. रंगराव साफ बुडाले. सर्वत्र हेमंताचा बोलबाला झाला. तो आता लक्षाधीश झाला. गावातील पहिला व्यापारी म्हणून त्याची गणना होऊ लागली. आणि रंगरावांचे पारडे खाली गेले. त्याची पत गेली. तो जवळ जवळ दिवाळखोर बनला. तो कर्जबाजारी झाला.

''सोमा, तुझे ठोकताळे सारे चुलीत गेले.'' रंगराव म्हणाला.

''आता बसा माशा मारीत!'' तो उपहासाने म्हणाला.

सोमाने दुसर्‍या दुकानात नोकरी धरली. रंगरावांची फजिती झाली म्हणून त्याला थोडेच वाईट वाटत होते? त्याला त्याचाच सूड घ्यायचा होता. रंगराव हात चोळीत होते, तर सोमा टाळया पिटीत होता.

रंगराव हेमावरही आता तोंडसुख घेत होते. वाटेल ते तिला बोलत. एके दिवशी तर त्यांनी कमालच केली!

''तू माझी मुलगी शोभत नाहीस. तिकडे परदेशांत वाढलीस. खलाशांत राहिलीस. जरा बोलायला तरी शीक. चार पुस्तके वाच. नट्टापट्टा करायला हवा. बापाचे दिवाळे निघायची पाळी आली तरी तू जरीची पातळे नेसत जा. लाज नाही वाटत? चार वाक्य नीट बोलता येत नाहीत. परवा ते पाहुणे चहासाठी आले, तर तुझ्या बोलण्यात किती रानटी शब्द. ते मला म्हणाले, असे काय बोलते तुमची मुलगी? अग, बापाला शोभेशी वाग. माझी प्रतिष्ठा का धुळीत मिळवायला तू आलीस? तू माझ्या पोटची तरी आहेस की नाही, हरी जाणे. मला लाज वाटते तुला मुलगी म्हणायला.''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel