आता उजाडले. हेमा उठली. ती हसत होती. सुखी होती. तिने केसात दोन फुले घालीत होती. बाबा कधी उठतील, याची ती वाट पाहात होती. ती त्यांच्या खोलीत गेली. त्यांची मुद्रा तिला त्रस्त दिसली, काळवंडलेली दिसली. हेमा तेथे उभी होती. थोडया वेळाने ती हळून निघून गेली.

रंगराव उठले. प्रातर्विधी आटोपून ते आले.

''बाबा, आजपासून मी खरोखरची तुमची होणार आहे. तुमचे नाव मी लावणार आहे. ते जयंतबाबा, त्यांनीही  माझ्यावर किती प्रेम केले! ते प्रेम मी हृदयांत ठेवीन. त्यांचे नाव माझ्या हृदयांत अमरच आहे. परंतु आता तुम्ही खरेखुरे बाबा भेटलेत. मी तुमची मुलगी. आता मला परके वाटणार नाही. तुमच्या प्रेमामुळे वाटत नव्हतेच. परंतु आता तुमच्या प्रेमावर माझा हक्क आहे, वारसा हक्क. खरे ना, बाबा? हे घ्या तुम्हांला फूल. घ्या ना, बाबा.'' हेमा प्रेमाने रंगरावांजवळ बसून म्हणाली. त्यांच्या डोळयातून दोन अश्रू आले. तिच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला.

''होय, माझी तू.'' ते म्हणाले. परंतु त्या शब्दांत आनंद होता की दु:ख? निराशा की आशा?

थोडे दिवस गेले. रंगराव अधिकच चिरचिरे झाले. हेमाला याचा अर्थ समजेना. अधिक आनंदी दिसण्याऐवजी बाबा अधिक दु:खी, अधिक अशांत का, ते तिच्या ध्यानात येईना. हेमंत नि रंगराव यांचे संबंध अधिअधिक विकोपाला जात होते. हे तर कारण नाही ना, असे तिच्या मनात येई. एके दिवशी ती रंगरावांना म्हणाली,

''बाबा, तुम्ही हेमंतांचा इतका तिरस्कार का करता? त्यांचे तुमच्यावर नि तुमचे त्यांच्यावर किती प्रेम होते. ते प्रेम कोठे गेले?''

''तू त्याचे नाव घेत जाऊ नकोस. जिथे तिथे तो माझी फजिती करायला बघत असतो.''

''तुम्ही उगाच काही मनात आणता. मागे ते खेळ झाले. हेमंताकडे खेळ आधी ठरलेले होते. तुम्ही मुद्दाम आयत्या वेळेस चार भाडोत्री खेळाडू जमवलेत आणि माळावर खेळ ठरवलेत. पाऊस आला. तुमची फजिती झाली. परंतु ती का हेमंतामुळे झाली? त्यांनी उलट तुमचे खेळ चांगले झाले नाहीत म्हणून खेद दाखविला. बाबा, तुम्ही दोघे पुन्हा एकमेकांशी चांगले नाही वागणार?''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel