त्या म्हातारीने रंगरावांकडे पाहीले. तिचा चेहरा संतापला ती एकदम ओरडून म्हणाली, ''तू नको मला उपदेश करायला. त्या खुर्चीवर बसलास तरी तू कोण ते मला माहीत आहे. जगाला माहीत नसले तरी या म्हातारीला माहीत आहे. तू तर दारुडया आहेस. अरे, दारू पिऊन माझ्या दुकानात तर्र होऊन पडला होतास, आठवते का? कपाळाला हात कशाला आता लावतोस? वीस वर्षे होतील त्या गोष्टीला. परंतु मी का विसरेन? येथे मोठा अध्यक्ष झाला आहे! माझा न्याय करायला बसला आहे मेला! तुला रे काय अधिकार? पै किंमतीचा तू! तुझ्या तोंडावर थुंकावे आम्ही. दारू पिऊन धुंद होऊन तू आपल्या बायकोला विकले होतेस ते आठवते का? या लोकांना माहीत नसेल. परंतु शपथेवर मी सांगते. तो खलाशी तुझ्या बायकोला विकत घेऊन गेला. तुझ्या लहान मुलीलाही तू विकलेस. आणि दुसर्या दिवशी धुंदी उतरल्यावर पुन्हा रडत तिच्या शोधार्थ निघालास. मला रामनामाचा उपदेश करतोस? तू घेतोस का रामनाम? आमचा न्याय करायला मेले बसतात. सारे असतात पापी. सारे लबाड नि लफंगे. सारे व्यसनी नि व्याभिचारी. खोटे नि लाचखाऊ. कर काय शिक्षा करायची असेल ती. परंतु तुझे तोंडही देवाघरी काळे आहे हे विसरू नकोस.''
पोलीस ऐकत होते. लोक ऐकत होते. कपाळाला हात लावून रंगराव ती शापवाणी ऐकत होता.
''डोळे काय मिटतोस? मला भिऊ नकोस. मी एक म्हातारी बाई. कर माझा इन्साफ.'' ती गरजली.
''हिला सोडून द्या. या खुर्चीवर बसायला मीच लायक नाही.'' असे म्हणून रंगराव एकदम निघून गेले. त्या बाईला सोडून देण्यात आले. पोलीस गेले. जमा झालेले लोक पांगले. गावभर सर्वांच्या तोंडी ती एकच गोष्ट. सर्वत्र तीच चर्चा. सुलभा चकित झाली. माया इतकी वर्षे कोठे होती, इतक्या वर्षांनी परत कशी आली? तिने सारे धागे जोडले. तिला का रंगरावांचा तिटकारा वाटला? ती पुढे तशीच बाजारात गेली. तेथे गवत कापण्याचे एक यंत्र होते. व्यापारी जमले होते.
''हेमंत, तुम्ही घेता का हे?'' कोणी विचारले.
''परंतु यंत्र चालेल की नाही?'' तो म्हणाला.
''हे यंत्र चांगले असते. तुम्ही घ्या.'' सुलभा म्हणाली. सर्वांचे डोळे तिच्याकडे गेले.
''तुम्हांला काय माहीत?'' हेमंतने विचारले.
''एके काळी माझ्या वडिलांकडे असे होते.'' ती म्हणाली.
''तुमचे वडील का गवताचा व्यापार करीत?''