''पुन्हा असा प्रसंग आला तर मी मूल जाऊ देणार नाही. मूल माझे. तिने मूल का म्हणून नेले? कोणत्या बाजूला ती गेली?''

''तो खलाशी होता. जवळच्या बंदराला गेला असेल.''

शेवटी तो उठला आणि निघाला. आसपास बघत तो जात होता. परंतु त्याला त्याची बायको दिसली नाही. ती मुलगी, तो खलाशी, कोणीही दिसले नाही. तो या बंदरावर गेला, त्या बंदरावर गेला. त्याने अनेक ठिकाणी चौकशी केली. त्याला पत्ता लागला नाही. परंतु एके दिवशी पत्ता लागला.

''दोनतीन तासांपूर्वीच एका गलबतात बसून तुम्ही म्हणता त्यासारखी दोन तरुण माणसे गेली. लहान मुलगीहि त्यांच्याबरोबर होती. उजाडत आला असतात तर गाठ पडली असती.'' त्याला तेथे सांगण्यात आले.

''ते गलबत कोठे जाणार होते?''

''तिकडे लांब लंकेकडे.''

तो तेथे समुद्रतीरावर लांबवर बघत उभा राहिला. शेवटी मनाशी निश्चय करून तो माघारा वळला. तो गंभीरपणे जात होता. तो मनाशी म्हणाला, ''अशी कशी गेली? भोळी बिचारी! तिला सारे खरेच वाटले. तिचा भोळा स्वभाव; परंतु माझे जन्माचे नुकसान झाले. वेडी, अगदी वेडी! तिचा भोळेपणा मला कधी कधी गुण वाटे. ती माझ्यावर विश्वास ठेवी. परंतु आज ह्या भोळेपणामुळे केवढा प्रसंग ओढावला! आणि मी तरी असा मूर्खपणा का केला? मी जर दारू नसतो प्यालो, ते द्रोणावर द्रोण ताडीचे घेतले नसते, तर असे झाले असते का? या ताडीमुळे हा सत्यानाश झाला. आजपासून दारूला, ताडीमाडीला शिवायचे नाही. जितकी वर्षे आयुष्याची झाली, तितकी वर्षे तरी दारू प्यायची नाही. मी आज वीस वर्षांचा आहे. वीस वर्षे आता यापुढे दारू बंद. परंतु हा निश्चय कोणासमोर करू? एखादे देऊळ नाही का कोठे? देवासमोर प्रतिज्ञा करावी.'' असे मनात येऊन तो मंदीर शोधीत निघाला. तो एका डोंगरावर त्याला मंदीर दिसले. खाली एक ओढा वाहात होता. हातपाय धुऊन तो वर गेला. शंकराच्या पिंडीसमोर उभा राहून तो म्हणाला: ''प्रभो, महादेवा, आजपासून वीस वर्षे मी दारू पिणार नाही. तुझीच शपथ. तू पुरी कर. मला सामर्थ्य दे.'' लोटांगण घालून, नवीन निश्चयाने तो तेथून निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel