तिसरे प्रहरी गाडीतून हेमा गेली. तिचे डोळे भरून आले होते. परंतु धीराने संयम करून ती गेली. गाडी बाजाराच्या टोकाला थांबली. सामान घेऊन हेमा वर गेली. गाडी परत गेली.
''आलीस, बस.'' सुलभा म्हणाली.
''आले तरी वाईट वाटत आहे.''
''वाटेलच दोन दिवस.''
''जणू माहेर सोडून सासरी जात आहे, असे मला वाटले. परंतु मला ना माहेर ना सासर. मी एकपरी अनाथ आहे.''
''देवाच्या दयेने मिळेल चांगले सासर, मिळेल चांगला नवरा. लोक तुझ्यासाठी धावत येतील. तू दिसायला काही वाईट नाहीस.''
''मी कशी आहे तिकडे माझे लक्ष नाही.''
''तू डोळयांत भरशील अशीच आहेस. तुझी आई सुंदर असावी.''
''होय. माझी आई सुंदर होती. परंतु संकटांमुळे ती खंगली. लौकर देवाघरी गेली.''
हेमा या घरी राहू लागली. ती कामकाज करी. बाजारात जाई. भाजी आणी. कधी कधी हेमंत तिला भेटे. ती दोघे आता एखादे वेळेस बोलत. परंतु हेमंतच्या बोलण्यात एके काळी जी मधुरता होती ती आता नसे. तोही का बाजारी झाला? पैसे मोजता मोजता भावनाशून्य झाला? हेमा सुलभाला वाचून दाखवी. कधी कधी सुलभा हेमाला विणणे भरणे शिकवी. जणू तेथे शाळा सुरू झाली. तिच्या अंगातील गुण वाढीस लागले. तिला एक प्रकारचा मोकळेपणाही वाटत होता. तिची प्रकृती सुधारली. तोंडावर थोडा तजेला आला.
''कुंडीतील गुलाबाची कळी फुलली आज!'' हेमा म्हणाली.
''तुझ्या तोंडावरही गुलाब फुलले आहेत.'' सुलभा म्हणाली.
''हृदयांत फुलतील, जीवनात फुलतील, तेव्हा खरे. तेथे अद्याप केवळ काटेच आहेत.'' हेमा म्हणाली.
''हृदयात फुलल्याशिवाय तोंडावर फुलणार नाहीत.'' सुलभा म्हणाली.