(३) भिक्षुहो, असा स्वभावनियम आहे की, जेव्हा बोधिसत्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो तेव्हा त्याला आणि त्याच्या मातेला मनुष्य किंवा अमनुष्य यांचा त्रास पोचूं नये म्हणून चार देवपुत्र रक्षाणाकरितां चारी दिशांना राहतात. असा हा स्वभावनियम आहे.

(४) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याची माता स्वाभाविकपणें शीलवती होते; प्राणघात, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान यांपासून मुक्त राहते. असा हा स्वभावनियम आहे.

(५) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेच्या अंत:करणांत पुरूषाविषयीं कामासक्ति उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही पुरूषास कामविकारयुक्त चित्ताने बोधिसत्वाच्या मातेचें अतिक्रमण करतां येणे शक्य नसतें. हा स्वभावनियम आहे.

(६) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला पांच सुखोपभोगांचा लाभ होतो. त्या पंचसुखोपभोगांनी संपन्न होऊन ती त्यांचा उपभोग घेते. हा स्वभावनियम आहे.

(७) भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्व मातेच्या उदरांत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला कोणताही रोग होत नाही. ती सुखी आणि निरूपद्रवी असते आणि आपल्या उदरीं असलेल्या सर्वेन्द्रियसंपूर्ण बोधिसत्वाला पाहते. ज्याप्रमाणें जातिवंत अष्टकोनी, घासून तयार केलेला, स्वच्छ, शुध्द व सर्वाकारपरिपूर्ण वैडुर्यमणि असावा आणि त्यात निळा, पिवळा, तांबडा, किंवा पांढरा दोरा ओवला, तर तो मणि व त्यांत ओवलेला दोरा डोळस मनुष्याला स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणें बोधिसत्व माता आपल्या उदरांतील बोधिसत्वाला स्पष्ट पाहतें. असा हा स्वभाव नियम आहे.

(८) भिक्षुहो, बोधिसत्व जन्मून सात दिवस झाल्यावर त्याची माता मरण पावते व तुषित देवलोकांत जन्म घेते. असा हा स्वभावनियम आहे.

(९) भिक्षुहो, ज्याप्रमाणें इतर स्त्रिया नवव्या किंवा दहाव्या महिन्यांत प्रसूत होतात, तशी बोधिसत्वमाता प्रसूत होत नाही. बोधिसत्वाला दहा महिने परिपूर्ण झाल्यावरच ती प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.

(१०) भिक्षुहो, ज्याप्रमाणें इतर स्त्रिया बसल्या असता किंवा निजल्या असतां प्रसूत होतात, त्याप्रमाणें बोधिसत्वमाता प्रसूत होत नाही. ती उभी असतां प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.

(११) भिक्षुहो, बोधिसत्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा प्रथमत: त्याला देव घेतात आणि मग मनुष्य घेतात. असा हा स्वभावनियम आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel