सारथ्याकडून बंधुमा राजाला हें वर्तमान समजलें, तेव्हा त्याने विपस्सीकुमाराची सुखसाधनें आणखीही वाढविली, कां की, राज्य सोडून कुमाराने प्रव्रज्या न घ्यावी.

आणि भिक्षुहो, शेंकडो हजारो वर्षांनतर विपस्सीकुमार पूर्वी प्रमाणेंच तयारी करून उद्यानाकडे जाण्यास निघाला . वाटेंत मोठया लोंकाचा समूह रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी तयार करीत असलेला त्याने पाहिला आणि तो सारथ्यास म्हणाला,'' हे लोक रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी का तयार करतात?''
सा.- महाराज, हा येथे मेलेला मनुष्य आहे (त्यासाठी)
वि.- तर मग त्या मृत मनुष्याकडे रथ ने.

त्याप्रमाणे सारथ्याने तिकडे रथ नेला आणि त्या मृत मनुष्याला पाहून विपस्सी म्हणाला,''मित्रा सारथे, मृत म्हणजे काय? ''
सा.- तो आता आईबाप व दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस पडणार नाही, किंवा तो त्यांना पाहूं शकणार नाही.
वि.- मित्रा सारथे, मी देखील मरणधर्मी आहें काय? राजा, राणी आणि दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टिस मी पडणार नाही काय? आणि त्यांना मी पाहूं शकणार नाही काय?
सा.- नाही महाराज.
वि.- तर मग आता उद्यानांकडे जाणें नको, अंत:पुराकडे रथ फिरव.
त्याप्रमाणें सारथ्याने अंत:पुराकडे रथ नेला. तेथे विपस्सीकुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचारांत पडला की, ज्याच्या योगे जरा, व्याधि, मरण प्राप्त होतात त्या जन्माला धिक्कार असो!

सारथ्याकडून बंधुमा राजाला हें वर्तमान समजलें, तेव्हा त्याने कुमाराचीं सुखसाधनें आणखी वाढविलीं.इ.

आणि भिक्षुहो, शेंकडो हजारो वर्षांनंतर पुन्हा सर्व सिध्दता करून विपस्सीकुमार सारथ्याबरोबर उद्यानाकडे जाण्यास निघाला . वाटेंत एका परिव्राजकाला पाहून तो सारथ्याला तो सारथ्याला म्हणाला,'' हा पुरूष कोण आहे? याचें डोके आणि वस्त्रें इतरांसारखीं नाहीत.''

सा.- महाराज, हा प्रव्रजित आहे.
वि.- प्रव्रजित म्हणजे काय?
सा.- प्रव्रजित म्हणजे, धर्मचर्या चांगली, समचर्या चांगली, कुशल क्रिया चांगली, अविहिंसा चांगली, भूतदया चांगली, असें समजणारा.

वि.- तर मग त्याच्याकडे रथ ने.
त्याप्रमाणें सारथ्याने प्रव्रजिताकडे रथ नेला, तेव्हा विपस्सी कुमार त्याला म्हणाला,''तूं कोण आहेस? तुझें डोकें आणि वस्त्रें इतरांसारखीं नाहीत.''
प्र.- महाराज, मी प्रव्रजित आहें. धर्मचर्या, समचर्या, कुशल क्रिया, पुण्यक्रिया, अविहिंसा, भूतानुकंपा चांगली, असें मी समजतों.

ठीक आहे, असें म्हणून विपस्सीकुमार सारथ्याला म्हणाला, ''मित्रा सारथे, तूं रथ घेऊन अंत:पुराकडे परत जा. मी केस व दाढीमिशा काढून, काषाय वस्त्रें धारण करून अनागारिक (गृहवियुक्त) प्रवज्या घेतो.''

सारथि रथ घेऊन अंत:पुराकडे गेला. पण विपस्सीकुमाराने तेथेच प्रव्रज्या घेतली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel