राजाच्या इच्छेला अनुसरून सर्व लोकांनी यज्ञाला अनुमति दिली. आणि त्याप्रमाणे पुरोहिताने यज्ञाची तयारी केली व तो राजाला म्हणाला, ''या यज्ञांत पुष्कळ संपत्ति खर्च होणार असा विचार यज्ञारंभीं मनांत आणूं नका. यज्ञ चालला असतां आपली संपत्ति नाश पावत आहे, आणि यज्ञ संपल्यावर आपली संपत्ति नाश पावली, असा विचार तुम्ही मनांत आणतां कामा नये. आपल्या यज्ञांत बरेवाईट लोक येतील. पण त्यांतील सत्पुरूषांवर दृष्टि देऊन यज्ञ करावा व आपले चित्त आनन्दित ठेवावें.''

त्या महाविजिताच्या यज्ञामध्ये गाई, बैल, बकरे आणि मेंढे मारण्यांत आले नाहीत; झाडे तोडून यूप करण्यांत आले नाहीत; दर्भांचीं आसनें बनविण्यांत आलीं नाहीत; दासांना, दूतांना आणि मजुरांना जबरदस्तीने कामावर लावण्यांत आलें नाही. ज्यांची इच्छा होती, त्यांनी कामें केलीं, व ज्यांची नव्हती त्यांनी केलीं नाहीत. तूप, तेल, लोणी, मध, आणि काकवी यां पदार्थांनीच तो यज्ञ समाप्त करण्यांत आला.

तदनंतर राष्ट्रांतील श्रीमंत लोक मोठमोठे नजराणे घेऊन महाविजित राजाच्या दर्शनाला आले. त्यांना राजा म्हणाला, 'गृहस्थहो, मला तुमच्या नजराण्यांची मुळीच गरज नाही. धार्मिक कराच्या रूपाने माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य साठलें आहे, त्यांपैकी तुम्हाला कांही पाहिजे असेल, तर खुशाल घेऊन जा''

याप्रमाणे राजाने त्या धनाढय लोकांचे नजराणे घेण्याचे नाकारल्यावर त्यांनी तें द्रव्य खर्चून यज्ञशाळेच्या चारी बाजूंना धर्मशाळा बांधून गोरगरिबांना दानधर्म केला.

ही भगवंताने सांगितलेली यज्ञाची गोष्ट ऐकून कूटदन्ताबरोबर आलेले ब्राह्मण उद्गारले,'' फारच चांगला यज्ञ! फारच चांगला यज्ञ!”

त्यांनतर भगवंताने कूटदन्त ब्राह्मणाला आपल्या धर्माचा विस्ताराने उपदेश केला. आणि तो ऐकून कूटदन्त ब्राह्मण भगवंताचा उपासक झाला, व म्हणाला, ' भो गोतम, सातशें बैल, सातशें गोहरे, सातशें कालवडी, सातशें बकरे आणि सातशें मेंढे, या सर्व प्राण्यांना मी यूपांपासून मोकळे करतों, त्यांना जीवदान देतों. ताजें गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेंत आनंदाने राहोत!

बेकारी नष्ट करणें हाच खरा यज्ञ

वरील सुत्तांत महाविजित याचा अर्थ ज्यांचे राज्य विस्तृत आहे असा. तोच महायज्ञ करूं शकेल. त्या महायज्ञाचें मुख्य विधान म्हटलें म्हणजे राज्यांत बेकार लोक राहूं द्यावयाचे नाहीत; सर्वांना सत्कार्याला लावावयाचें. हेंच विधान निराळया तर्‍हेने चक्क वस्तिसीहनाद सुत्तांत सांगितलें आहे. त्याचा सारांश असा-
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel