प्राणिवधाविरूध्द अशोकाचा प्रसार

प्राणिहिंसेविरूध्द प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय. त्याचा पहिलाच शिलालेख असा आहे-

'ही धर्मलिपि देवांचा प्रिय प्रियदर्शिराजाने लिहविली. ह्या राज्यांत कोणत्याही प्राण्याला मारून होमहवन करूं नये आणि जत्रा करूं नये. कारण जत्रेंत देवांचा प्रिय प्रियदर्शिराजा पुष्कळ दोष पाहतो. कांही जत्रा देवांच्या प्रिय प्रियदर्शिराजाला पसंत आहेत. पूर्वी प्रियदर्शिराजाच्या पाकशाळेंत स्वयंपाकासाठी हजारो प्राणी मारले जात असत. जेव्हा हा धर्मलेख लिहिला, तेव्हापासून दोन मोर आणि एक मृग असे तीनच प्राणी मारले जातात. तो मृगही रोज मारण्यांत येत नाही. आणि पुढे हे तीन प्राणी देखील मारण्यांत येणार नाहीत.'

ह्या लेखांत अशोकाने गाईबैलांचा उल्लेख केला नाही. यावरून असें अनुमान करतां येते की, ब्राह्यणेतर वरिष्ठ जातीत त्या काळी गोमांसाहार जवळ जवळ बंदच पडला होता. इतकेंच नव्हे, असा प्रचार चालविला. समाज या शब्दाचें भाषांतर मी जत्रा असें केलें आहे. तें जरी तंतोतंत नसलें तरी साधारणपणें ग्राह्य वाटलें. आजकाल जशा महाराष्ट्रात जत्रा किंवा उत्तरहिंदुस्थानांत मेळे होतात, तशा प्रकारचे अशोकाच्या वेळीं समाज होत असावेत. त्यांत देवदेवतांना प्राण्यांचे बळी देऊन मोठा उत्सव करणारे समाज अशोकाला पसंत नव्हते. ज्यांत प्राण्यांचा बळी देण्यांत येत नसे, अशा जत्रा भरवण्यास त्याची हरकत नव्हती. यज्ञांत काय, किंवा जत्रेंत काय, प्राण्यांचे बलिदान होऊं देऊं नये, यावर त्याचा मुख्य कटाक्ष होता.

आमचे पूर्वज निवृत्तमांस नव्हते


आजकाल यज्ञयाग बंद पडल्यासारखे झाले आहेत. पण जत्रांतील बलिदान अनेक ठिकाणीं अद्यापिही चालू आहे. तथापि इतर कोणत्याही देशापेक्षा हिंदुस्थानेच लोक अधिक निवृत्तमांस आहेत. या कामीं जैनांचा आणि बौध्दांचाच धर्मप्रचार कारणीभूत झाला, यांत शंका नाही. अर्थात् आजला आम्ही शाकाहारी आहोंत, म्हणून आमचे पूर्वज तसेच शाकाहारी होते, असें प्रतिपादन करणें वस्तुस्थितीला धरून नाही.

चिनांत डुकराचें महत्त्व

आता खास डुकराच्या मांसासंबधीं चार शब्द लिहिणें योग्य वाटते. प्राचीनकालापासून चिनी लोक डुकराला संपत्तिचे लक्षण समजतात. त्यांची लिपि आकारचिन्हांनी बनलेली आहे. ह्या चिन्हांच्या मिश्रणानें भिन्न भिन्न शब्द तयार करतां येतात. उदाहरणार्थ, माणसांचे चिन्ह काढून त्यावर तलवारींचें चिन्ह काढलें, तर त्याचा अर्थ शूर असा होतो. घराच्या चिन्हाखाली मुलाचे चिन्ह काढलें, तर त्याचा अर्थ अक्षर, स्त्रीचीं दोन चिन्हें काढली, तर भांडण आणि डुकराचें चिन्ह काढलें, तर त्याचा अर्थ संपत्ति असा होतो. म्हणजे घरांत डुकर असणें हें संपत्तिचें लक्षण आहे, असें प्राचीन चिनी लोक समजत; आणि सध्यादेखील चिनांत डुकराला तेवढेच महत्त्व आहे.

प्राचीन हिंदु डुकराला संपत्तीचा भाग मानीत


हिंदुस्थानांत डुकराला इतके महत्त्व आलें नाही, तरी संपत्तीचा तो एक विभाग समजत असत. अरियपरियेसनसुत्तांत (मज्झिमनि.२६) ऐहिक संपत्तीची अनित्यता वर्णिली आहे, ती अशी -

''किं च भिक्खवे जातिधम्मं ? पुत्तभरियं भिक्खवे जातिधम्मं । दासीदासं......... अजेळकं........कुक्कटसूकरं.....हत्तिगवास्सवळवं...जातरूपरजतं जातिधम्मं ।''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel