भ . - हे ब्राह्मणा, हीं चार धनें सांगण्याला ब्राह्मणांना लोकांनी आधिकार दिला आहे काय ?

एसु . - नाही, भो गोतम.

भ.- तर मग मांस न खाऊं इच्छिणार्‍या गरीब माणासावर मांसाचा वाटा लादून त्याची किंमत मांगण्यासारखें हे ब्राह्मणांचे कृत्य समजलें पाहिजे. हे ब्राह्मणा, आर्य श्रेष्ठ धर्म हेंच सर्वांचें स्वकीय धन आहे, असें मी म्हणतो. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चार कुळांत जन्मलेल्या माणसांना अनुक्रमें क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र म्हणतात. ज्याप्रमाणें लाकूड, शकलिका, गवत आणि गोवर्‍या या चार पदार्थांपासून उत्पन्न झालेल्या अग्नीला अनुक्रमें काष्ठाग्नि, शकलिकाग्नि, तृणाग्नि आणि गोमयाग्नि म्हणतात, त्याप्रमाणें ह्या चार संज्ञा आहेत. परंतु ह्या चार कुलांतील मनुष्य प्राणघातादिक पापांपासून निवृत्त झाले, तर त्यापैकी ब्राह्मण तेवढाच मैत्रीभावना करूं शकेल, व इतरवर्णी लोक मैत्रीभावना करूं शकणार नाहीत, असें तुला वाटते काय?
एसु. - भो गोतम, असें नव्हे. कोणत्याही वर्णाचा मनुष्य मैत्रीभावना करूं शकेल.

भ.- ब्राह्मणच तेवढा नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपलें अंग साफ करूं शकेल, पण इतर वर्णाचे लोक आपलें अंग साफ करूं शकणार नाहीत, असें तुला वाटतें काय?

एसु.- भो गोतम, असें नव्हे. चारही वर्णांचे लोक नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपलें अंग साफ करूं शकतील.

भ.- त्याचप्रमाणें, हे ब्राह्मणा, सर्व कुलांतील लोक तथागताच्या उपदेशाप्रमाणें वागून न्याय्य धर्माची आराधना करूं शकतील.

ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ हा नुसता आवाज

बुध्द भगवंताच्या परिनिर्वाणानंतर देखील बुध्दाचे प्रमुख शिष्य चातुर्वर्ण्याला संमति देत नसत. हे चार्तुवर्ण्य कृत्रिम आहे, असें ते प्रतिपादीत, याचें एक चांगलें उदाहरण मज्झिमनिकायांतील (नं. ८४) मधुरसुत्तांत सापडतें. त्याचा सारांश असा-

एके समयीं आयुष्मान् महाकच्चान मधुरेजवळ* गुंदावनांत राहत होता. मधुरेच्या राजाने-अवंतिपुत्राने-महाकच्चानाची कीर्ति ऐकली. मोठया परिवारासह तो त्याजपाशीं गेला व कुशल समाचारादिक विचारून एका बाजूला बसला आणि म्हणाला, 'भो कात्यायन, ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत, ब्राह्मणवर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत, ब्राह्मणांनाचमुक्ति मिळते, इतरांना मिळत नाही, ब्राह्मण ब्रम्हदेवाच्या मुखापासून झालेले, ब्रम्हदेवाचे औरस पुत्र आहेत, असें ब्राह्मण प्रतिपादितात. यासंबंधीं आपलें म्हणणें काय आहे?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हीच सध्यांची मथुरा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध (उत्तरार्ध)


इच्छापूर्ती शाबरी मंत्र
श्यामची आई
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
स्वामी विवेकानंद
श्याम
बायबल - नवा करार
भगवान बुद्ध
पांडवांचा अज्ञातवास
नलदमयंती
अश्वत्थामा
श्यामची पत्रे
धडपडणारा श्याम
महात्मा गौतम बुद्ध
बौद्धसंघाचा परिचय