शाश्वतवाद व उच्छेदवाद

अशा विचित्र आणि विविध आत्मविषयक कल्पना बुध्दसमकालीन श्रमणब्राह्मणांत पसरल्या होत्या. त्या सर्व दोनच वर्गांत येत असत. त्यापैंकी एकाचें म्हणणें असें की,

सस्सतो अत्ता च लोको च वंझो कूटट्ठो एसिकट्ठयी ठितो ॥

'आत्मा आणि जग शाश्वत आहे. तो वन्ध्य कूटस्थ आणि नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे स्थिर आहे.'*

या वादांत पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, पकुध कच्चायन आणि निगण्ठ नाथपुत्त यांचीं मतें समाविष्ट होत असत.

आणि दुसरे श्रमणब्राह्मण उच्छेदवाद प्रतिपादन करीत.
ते म्हणत -

अयं अत्ता रूपी चातुम्माहाभूतिको मातापेत्तिसंभवो
कायस्स भेदा उच्छिज्जति विनस्सति न होति परं मरणा॥
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे आणि दुसरे अनेक आत्मवाद दीघनिकायांतील ब्रङह्माजालसुत्तांत दिले आहेत. इतर निकायांत देखील भिन्ना भिन्ना आत्मवादांचा उल्लेख सापडतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'हा आत्मा जड, चार महाभूतांचा बनलेला आणि आईबापांपासून उत्पन्न झालेला, शरीरभेदानंतर छिन्ना होतो, विनाश पावतो. तो मरणानंतर राहत नाही.'

हे मत प्रतिपादणार्‍या श्रमणांत अजित केसकम्बल प्रमुख होता. यांच्या दरम्यान आत्मा कांही अंशी शाश्वत व कांही अंशी अशाश्वत, असें म्हणणारे देखील श्रमणब्राह्मण होते. संजय बेलट्ठपुत्ताचा वाद तशाच प्रकारचा दिसतो. अणि तेंच तत्त्वज्ञान पुढे जैनांनी उचललें.

आत्मवादांचे परिणाम


ह्या सर्व आत्मवादांचे परिणाम बहुतांशी दोन होत असत. एक चैनींत सुख मानणें, आणि दुसरा तपश्चर्या करून शरीर कष्टविणें. पूरण कस्सपाच्या मताप्रमाणे जर आत्मा कोणाला मारीत नाही, किंवा मारवीत नाही, तर आपल्या चैनीसाठी इतरांची हत्या करण्यास हरकत कोणती? जैनांच्या मताप्रमाणे तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्माने बध्द झालेला असे म्हटलें, तर ह्या कर्मांपासूंन सुटण्याला खडतर तपश्चर्या केली पाहिजे असें तत्त्वज्ञान उत्पन्न होणें साहजिक आहे. आत्मा अशाश्वत आहे, तो मेल्यानंतर राहत नाही, असे गृहीत धरलें, तर जिवंत असेपर्यंत मौजमजा करून काल कंठावा, किंवा ह्या भोगांची शाश्वती तरी काय असें म्हणून तपश्चर्या करावी, अशीं दोन्ही प्रकारची मतें निष्पन्न होऊं शकतील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel