एकाच मार्गाने जाणारे दोन प्रवासी त्या रस्त्याकडे भिन्न दृष्टीने बघतात. एक म्हणतो, “हा रस्ता प्रियजनांच्या भेटीच्या आड येतो.” दुसरा म्हणतो, “त्याचे किती उपकार? तो प्रियजनांकडे मला नेतो.” पहिला मनुष्य प्रत्येक रस्ता तुडवण्यासाठी जणू टाकतो, तर दुसरा मनुष्य त्या रस्त्याला ध्येयप्राप्तीचे साधन मानतो. प्रत्येक पाऊल ध्येयाच्या जवळ नेत आहे या भावनेने तो टाकतो. भारतीय ऋषींची निसर्गाकडे पाहण्याची ही दृष्टी होती. मानव आणि सृष्टी यांच्यात विरोध नसून सहकार आहे, हा विचार एक थोर सत्य म्हणून येथे आदरिला गेला. मनुष्यात विचार करण्याची शक्ती आहे, एवढयावरून सृष्टीपासून तो निराळा, असे नाही अनुमान काढायचे, तर त्याचे मन आणि ही बाह्यसृष्टी यांच्यात ऐक्य आहे म्हणून तो विचार करू शकतो असे समजायचे. सृष्ट शक्तीचा आपण उपयोग करतो म्हणून का सृष्टीपासून निराळे? आपण असा उपयोग करून घेऊ शकतो-कारण दोघांना व्यापून असणारी शक्ती एकच आहे. मनुष्याचे अंतिम ध्येय सृष्टीच्या अंतिम ध्येयाला विरोधी असणे शक्य नाही. सृष्टीतून प्रकटणारी इच्छा आणि मानवी इच्छा यात अंती मेळच दिसेल; कधीही विरोध दिसणार नाही.
निसर्ग म्हणजे जड-वस्तूंचा मेळावा असे पाश्चिमात्य मानतात. मानवेतर प्राणीही ते यातच धरतात. त्यांच्या मते मानव व मानवेतर सृष्टी यांच्यात तिळभरही साम्य नाही. हे लोक जीवनक्रमात जे नीच, खालच्या पातळीवरचे ते म्हणजे प्रकृती, निसर्ग; आणि जीवनक्रमातील परमोच्च म्हणजे मानव असे समजतात. त्याला मानव म्हणावे,- जेथे परिपूर्णतेचा छाप आहे; नीतीचा जेथे विचार आहे. मानवेतर सृष्टी ही सर्व खालची. परंतु हा जो भेद पाश्चिमात्य करतात तो कळी व फूल यांच्यातील भेदाप्रमाणेच नाही का? येथील ऋषींना सृष्टीशी स्वतःचा संबंध जोडायला संकोच नाही वाटला. विराट विश्वाबरोबर मानवाचा अविभक्त संबंध खुल्या मनाने भारतीय हृदयाने स्वीकारला आहे.
व्यक्ती आणि विश्व यांना व्यापणारे अद्वैत म्हणजे केवळ बुध्दीचा विलास असे येथे मानण्यात येत नसे. जीवनात हे अद्वैत अनुभवणे म्हणजेच जीवनाचा महान् उद्देश, असे येथे मानले जाई. संयम, सेवा, मनन, चिंतन यांनी आर्य लोक स्वतःचे जीवन इतके निर्मळ करत, दृष्टी इतकी विशाल करत की, सारे चराचर त्यांना एकरूपच दिसे. पृथ्वी, पाणी, प्रकाश, फुले, फळे त्यांना केवळ जड नसत वाटत. काम झाले की फेकावे अशी नसे त्यांची दृष्टी. संपूर्णतेचे ध्येय मिळावे म्हणून, जीवनातील अंतिम आदर्श प्राप्त व्हावा म्हणून प्रत्येक वस्तू त्यांना मोलाचीच वाटे. संगीताला सार्या सुरांची जरुरी, त्याप्रमाणे सर्वांगपूर्ण जीवन अनुभवण्यासाठी वस्तुमात्राची आवश्यकता. जीवनाच्या अंतिम रहस्याचा मानवी जीवनाशी खोल प्राणमय संबंध आहे, असे येथील ऋषींना अंतःस्फूर्तीने कळून चुकले होते. हे रहस्य शोधून त्याच्याशी मानवाने डोळस संबंध जोडला पाहिजे. हा संबंध, भौतिक ज्ञानासाठी किंवा भौतिक विजयासाठी म्हणून केवळ जोडायचा असे नाही, तर अपार-अनिर्वचनीय आनंदाने उचंबळलेल्या हृदयाने जोडायचा. हा संबंध लोभमूलक नसावा, प्रेममय-आनंदमय असावा, बाह्य नसून आन्तरिक जिव्हाळयाचा असावा, असे त्यांना वाटे.
हे जगत् असे दिसते तसे वास्तविक नसते, ही गोष्ट भौतिक शास्त्रज्ञही मानतात. पृथ्वी किंवा पाणी यांच्या रूपाने जे पदार्थ दिसतात, ते वास्तविक पृथ्वी आणि पाणी यांच्या रूपाने परिणत झालेल्या शक्तीची रूपे असतात. ही शक्ती पृथ्वी नि पाणी यांच्याच रूपाने का भासते, याचे उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकत नाहीत. आध्यात्मिक दृष्टीचा मनुष्यही पृथ्वी व पाणी यांच्याकडे पाहतो,-परंतु निराळया दृष्टीने. पृथ्वी व पाणी यांच्याद्वारा प्रकट होणारी सर्वशक्तिमान् सत्ता आणि त्या सत्तेला ओळखणारी स्वतःमधील अविनाशी सत्ता यात तो संबंध पाहतो. स्वतःमधील आत्मतत्त्वच बाहेरच्या या वस्तूंनी नटले आहे, असे त्याला वाटते. जी शक्ती माझ्याद्वारे कार्य करीत आहे, तीच बाहेरही. भौतिक ज्ञानाहून हे ज्ञान निराळे आहे. भौतिक ज्ञानाने मनुष्य बलशाली होईल. अद्वैताच ज्ञानाने तो अपूर्व आनंद अनुभवील. भौतिक ज्ञान सत्ता देईल; आत्मिक ज्ञान शान्ती देईल. भौतिक दृष्टीहून अधिक उच्च दृष्टी न घेणार्यास, आध्यात्मिक दृष्टीला या विराट विश्वात काय दिसते ते कधीही समजणार नाही; कल्पनाही येणार नाही. आध्यात्मिक दृष्टीचा मनुष्य नदीत स्नान करतो, तेव्हा ते पाणी देहालाच नाही तर मनालाही शुध्द करते.