देवा ! तू माझी सकल पापे दूर करा.
यदं भ्रदं तत् आसुव ॥
‘जे कल्याणकारक असेल ते आण.’
आपण वैयक्तिक सुखात रमतो, तेव्हा स्वतःपुरते पाहतो. जेव्हा कल्याणमय गोष्टी आपण करतो, त्या वेळेस आपण सर्वांचे असतो. गर्भामध्ये अडलेले मूल आईच्या जीवनाशी एकजीव असल्यामुळे आपोआप संवर्धिले जाते. त्याचप्रमाणे आपण मंगलमय कर्मे जेव्हा करतो, तेव्हा खाली, वर सर्वत्र पसरून राहिलेला परमात्मा, त्याच्याशी आपण एकरूप होतो. ईश्वराशी एकरूप होण्याचा दुसरा मार्ग नाही. म्हणून म्हटले आहे : ज्याला सत्याची भूक आहे तो धन्य होय त्याचे जीवन परिपूर्ण केले जाईल. सत्य हे आत्म्याचे अन्न. सत्याशिवाय शाश्वताकडे जाता येणार नाही. सत्यावाचून विकास नाही.
नमः शंभवे ।
‘ज्याच्यापासून मंगलाचा प्रवाह, त्याला नमस्कार.’
नमः शंकराय ।
‘ज्याच्यापासून आत्म्याचे कल्याण जन्मते, त्याला नमस्कार.’
नमः शिवा शिवतराय ।
‘जो मंगल आहे, परम मंगल आहे, त्याला नमस्कार.’ त्या शंकराशी, त्या शिवाशी आपण सर्वतः जोडलेले आहोत. शान्ती, एकता, आनंद, प्रेम, मांगल्य - सर्व प्रकारच्या या शिवरूपांनी त्याच्याशी आपण जोडलेले असतो.
मनुष्य स्वतःच्या परमोच्च विकासासाठी धडपडत असतो. तदर्थ सारी शक्ती वेचावी, असे त्याला वाटते. स्वतःच्या विकासासाठीच तो धनदौलत मिळवू इच्छितो. परंतु संचय म्हणजे साक्षात्कार नव्हे. संचयाने आत्मदर्शन नाही. आन्तरिक प्रकाशानेच तो दिसेल.
दीलमां दीवो करो ।
‘हृदयातच दिवा हवा.’ ईश्वराची हृदयात भेट होणे म्हणजेच साक्षात्कार. स्वतःचे आत्मरूप पाहणे म्हणजे आत्म्यातील परमात्मा पाहणे. हे दर्शन नाही तोवर दुःख आहे. परमात्मचे स्वरूप प्रकट होणे आहे. ऋषी त्याला ‘हे आविः-हे प्रकट होणार्या’ अशी हाक मारतो. हा ‘आविः’ जेव्हा हृदयात आविर्भूत होतो, प्रकट होतो, तेव्हाच मानव पूर्ण होतो. त्याचा परमोच्च अव्यंग विकास झाला असे समजावे.
मनुष्याला आपल्या वासनातून संपूर्णतः बाहेर पडता येत नाही. तो पंख फडफडवतो; परंतु जाळ्यातून निसटता येत नाही. म्हणून मानव कष्टी असतो हे खरे दुखणे. हा खरा रोग. स्वतःच्या स्वार्थी संकुचित स्वरूपापलीकडचे विशाल रूप त्याला दिसत नाही. म्हणून रडत म्हणतो : ‘आविः आविर्मयेधि’- ‘प्रकट होणार्या माझ्या ठायी प्रकट हो !’ क्षुधातृषांपेक्षा आत्मरूपाची ही तहान अंतरंगात खाली खोल असते. तिच्या शांतीशिवाय समाधान नाही. ही प्रार्थना सकल वस्तुमात्राच्या अंतरंगी आहे. ‘हे प्रकट होणार्या, प्रकट हो’ असे अणेरेणू जणू ओरडत आहेत. सान्त जीवनात त्या अनन्ताच्या साक्षात्कार करून घेणे हा या जीवनाचा-सृष्टीचा हेतू. हा हेतू मानवी जीवनातच फलद्रूप होतो. तेथे इच्छा इच्छेला भेटते; प्रेरणा प्रेरणेला भेटते.