एक काळ असा होता, जेव्हा ही पृथ्वी केवळ वायुमय होती. तिच्या अणू-परमाणूंमध्ये व्यवस्था नव्हती. तिला तेव्हा नव्हता आकार, नव्हते सौंदर्य. तेथे नव्हता काही हेतू. तेथे दोनच गोष्टी होत्या : गती नि उष्णता. हळूहळू पृथ्वी थंड होऊ लागली. तिला गोल आकार आला. परस्परांपासून दूर असलेल्या अणू-परमाणूंना एकत्र आणणारी शक्ती तिच्यात आली. ग्रहमालेत तिला योग्य स्थान मिळाले. रत्नहारातील पाचूप्रमाणे ती शोभू लागली. जसे हे पृथ्वीचे, तसेच आपल्या आत्म्याचे. जोपर्यंत आपल्या विकारांची, वासनांची प्रखरता काम करीत असते, तोपर्यंत निश्चितता नसते. तोपर्यंत आपणास यथार्थतेने काही देता येत नाही वा घेता येत नाही. परंतु संयमाने जेव्हा आपण स्थिर होतो, आत्मबिंदू सापडतो, परस्परविरुध्द अशा हृदयाच्या नि बुध्दीच्या शक्ती नीट सामंजस्याने जेव्हा वागू लागतात, तेव्हा मग लहान लहान वस्तूंतही मोठे हेतू दिसू लागतात; परमेश्वरी सूत्र सर्वत्र दिसू लागते. आपल्या आचार-विचारातही सुसंबध्दता नि एकतानता येते. क्षणिक भावनाना प्रेमात परिणत व्हावे लागते. म्हणून उपनिषदे सांगतात : ‘तमेव एक जानत आत्मानम् अमृतस्य एष सेतुः-त्या एक आत्मस्वरूपाला जाणून घ्या. अमृतपुरुषाकडे घेऊन जाणारा हा सेतू आहे.’ आपणामध्ये असणारे जे हे एकमेवद्वितीयम्. तत्त्व ते शोधून घेणे हे मानवाचे अंतिम साध्य आहे. हे तत्त्व म्हणजेच सत्य. हे तत्त्व म्हणजेच सत्याचा आत्मा. या तत्त्वाच्या किल्लीनेच आध्यात्मिक जीवनाचा, स्वर्गीय राज्याचा दरवाजा तो उघडतो. मनुष्याच्या वासना अनंत असतात व त्या भरमसाटपणे नाना पदार्थांकडे धावत असतात. कारण त्या वासनांचे जनन व पूरीकरण त्यांत असते. त्या त्या पदार्थांसाठी त्या जन्मतात व ते मिळताच त्या तृप्त होतात. परंतु मनुष्यामध्ये जे ते एक आहे, त्याला सर्वत्र ऐक्य अनुभवायचे असते. ज्ञानामध्ये, प्रेमामध्ये, इच्छाशक्तीच्या अनेक कर्मांमध्ये सर्वत्र पाहावयाचे असते. चिरंतन ऐक्यरूप असणारे जे अनंत तत्त्व ते अनुभवण्यात त्याचा परमोच्च आनंद असतो. ‘एकरूप बहुधा यः करोति तं आत्मस्थं ये अनुपश्यन्ति धीराः, तेषां सुखं शाश्वतं, नेतरेषाम्’- जो एकच गोष्ट अनेक आकारांनी प्रकट करतो, असा तो परमात्मा, तो परमपुरुष जे अंतरंगात पाहतात, त्यानाच खरे शाश्वत सुख मिळते; इतरांना नाही.
या जगातील अनेकविध पसार्यात एकच गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती ही की, आपल्यामधील ते एक बाहेरच्या सृष्टीतील एकाकडे जाण्यासाठी धडपडत असते. त्या एकाचा हा स्वभावच आहे. हाच त्याचा आनंद. स्वतःचा दिवा हातात नसेल तर त्या बाहेरच्या एकाला गाठणे कठीण आहे; परंतु आपल्या अंतरात्म्यात बाहेरचा परमात्मा पाहणे ही गोष्ट अनुभवगम्य आहे. आपण बाह्य वस्तूंना खंडात्मक रीतीने पाहात नाही. वस्तूला संपूर्णपणे पाहतो. आपला आत्माही परमात्म्याला अखंडतेने पाहतो.
उपनिषद् म्हणते -
एष देवो विश्वकर्मा महात्मा
सदा जनाना हृदये संनिविष्टः ।
हृदा मनीषा मनसाभिक्लृप्तो
य एतद् विदुः अमृताः ते भवन्ति ॥
या विश्वाच्या सकल घडामोडीत जो स्वतःला प्रकट करीत असतो, असा हा देव, हा विश्वकर्मा मनुष्याच्या हृदयात परमात्मरूपाने वास करतो. जे हृदयात त्याची अनुभूती प्राप्त करून घेतात, त्याना अमृतत्व प्राप्त होते.