अकर्माने ‘महती विनष्टिः’ - घोर नाश, असे श्रुती सांगते. मनुष्य कर्म करून अनंत आपदांना तोंड देत मोठा होतो. धडपडीत मानवाचा मोठेपणा आहे, जे आज आपण नाही ते होण्याची त्याची अविश्रान्त खटपट असते. कष्ट, संकटे हे तर आपले भूषण तो म्हणतो. आपल्या कार्यक्षेत्राला मनाव मर्यादा घालू इच्छित नाही. कधी कधी त्याच्या अतिरेकामुळे भयंकर भोवरे उत्पन्न होतात. स्वार्थ, सत्ता यांचे भोवरे कर्मप्रवाहात उसळतात. परंतु जोपर्यंत प्रवाहाची शक्ती कायम आहे, ती आटून जात नाही, तोवर भय नाही. उत्साहभरात मानव नसते कर्मही अंगावर घेतो. परंतु तो उत्साहाने चुकाही निस्तरतो. खरा शत्रू तेव्हा-जेव्हा मनुष्य पडून राहतो. मग अशा अडचणी येतात की, त्यातून पार पडणे अशक्य होते. म्हणून ते प्राचीन आचार्य सांगतात की, “काम करण्यासाठी जगा, व जगण्यासाठी काम कर. जीवन नि कार्य एकरूपच आहेत.”
स्वतःशी एकटे राहण्यात जीवनाची परिपूर्णता नाही. आन्तरिक पूर्णता बाहेर प्रकट व्हायला हवी. बाह्य नि आन्तर जगाची सतत देवाण घेवाण चालू हवी. अशानेच आत्म्याचे वैभव वाढते. जीवन संपन्न होते. जगण्यासाठी या शरीराला हवेशी व प्रकाशाशी संबंध ठेवावे लागतात. परंतु जीवनशक्ती मिळवण्यासाठीच नव्हे तर ती प्रकट करण्यासाठीही या बाह्य जगाशी संबंध ठेवणे आवश्यक असते. हे शरीर शरीरान्तर्गत अनेक व्यापारांशी कसे जोडलेले आहे पाहा. हृदयाचे स्पंदन सारखे सुरू हवे. नाडीचा ठोका पडत राहायला हवा. जठर, मेंदू यांना सारखे काम आहेच. एवढ्यानेच भागले नाही; शरीर बाहेरच्या कामातही मग्न असते. शरीराला केवळ शरीरान्तर्गत व्यापरांनी समाधान नाही. बाहेरचे व्यापारही त्याला हवे असतात. श्रम नि क्रीडा यांचा नाच अखंडसुरू आहे. त्यात शरीर रंगले आहे. आत रक्त फिरत आहे. बाहेर पाय फिरत आहेत. हा अन्तर्बाह्य क्रियात्मक आनंद-यात मानवाची परिपूर्णता आहे.
जसे शरीराचे तसेच जीवाचे. जीवाला मनातील विचार नि भावना एवढ्याने समाधान लाभत नाही. बाह्य वस्तूंची त्याला सतत जरूरी भासते. आतील जाणीवेला पोसण्यासाठीच नव्हे तर कार्याला वाहून घेण्यासाठी, केवळ घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी म्हणूनही बाहेरच्या जगाशी जीवाला संबंध ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही.
परमात्मा सत्यरूप आहे. जीवात्माही सत्यरूप आहे. या सत्याचे स्वरूप विविध आहे. त्यातील एकच घेऊन चालणार नाही. सत्याचे खंड पाडाल तर जगणे अशक्य होईल. आपण आन्तर व बाह्य या दोन्ही रूपांनी मिळून पूर्ण आहोत. बाहेरचा अनंत परमात्मा, व आन्तरिक परमात्मा, दोघांमध्ये अपाण नांदले पाहिजे. दोहोंपैकी कोठेही एके ठिकाणी त्याला नाकारणे म्हणजे आत्मवंचना व आत्मनाश होय.
“मा अहं ब्रह्म निराकुर्याम् ।
मा मां ब्रह्म निराकरोत् ।”
मी ब्रह्माला सोडता कामा नये, ते ब्रह्मही मला न सोडो. ब्रह्माचा आन्तरिक ध्येयानेच फक्त साक्षात्कार करून घेऊ म्हणाल व बाहेरच्या कर्मात न घ्याल, हृदयातच प्रेम द्याल व कर्मांनी पूजा न कराल, किंवा याच्या उलट बाहेरच्या कर्मातच पाहाल व मनात न बघाल तर दोन्हीत नाश आहे. तोल कोणत्याही एका बाजूला अधिक जाणे म्हणजे खाली पडणे. जीवन समतोल हवे.