पाश्चिमात्यांकडे पाहू तर त्यांचा आत्मा कर्मरूपानेसारखा बाहेर विस्तारत आहे असे दिसेल. आत्म्याच्या आन्तररूपाकडे तिकडे लक्ष नाही. अंतरंगातही एक कुरुक्षेत्र आहे व तेथेही विजयी व्हायचे आहे, याची स्मृती त्यांना नाही. आन्तरिक जगावर त्यांचा विश्वासच नाही. मनाच्या समाधानाची परिपूर्णता कोठे आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. शास्त्र सांगते की, जगाची सारखी उत्क्रान्ती होत जाणार. परिपूर्णता शब्दच नाही. शेवटचा मुक्कामच नाही. पाश्चिमात्य अध्यात्मशास्त्र ईश्वराच्याही उत्क्रान्तीबद्दल बोलत असते. ‘ईश्वर आहे’ अशी कबुली ते देणार नाहीत. ईश्वरही विकास पावत आहे, असे म्हटल्यावाचून त्यांच्याने राहवणार नाही.
कल्पनागम्य सर्व मर्यादांहून अनंत हे सदैव मोठेच राहणार. एवढेच नव्हे तर ते परिपूर्णही आहे, ही गोष्ट ते विसरतात. एका अर्थाने ब्रह्मफूल फुलत आहे, तर दुसर्या अर्थाने ते सदैव फुललेलेच आहे. एका अर्थाने ब्रह्म पूर्ण आहे - सर्वांचे रहस्य आहे. दुसर्या अर्थाने ते प्रकट होत आहे. दोन्ही रूपांनी एकाच वेळेस ते आहे. गाणे व गायन हे जसे, तसेच हे. गाणे पूर्ण असून गायनात ते प्रकट होत असते. फक्त गाणे चालले आहे असे म्हणणे म्हणजे गाणार्याला विसरणे. गाणार्याच्या हृदयात ते गीत पूर्णपणे साठवलेले आहे. गाणे ऐकत असता एकाच क्षणी ते सारे आपण जरी अनुभवीत नसलो तरी गाणार्याच्या हृदयात ते संपूर्ण आहे का हे आपल्याला ठाऊक नसते?
पाश्चिमात्य जग शक्तीच्या कैफाने उन्मत्त झाल्याप्रमाणे दिसत आहे. तेथे आदळ-आपटीवर जोर. प्रत्येक वस्तू बळजबरीने मिळवायची, असा जणू त्यांचा निश्चय. ते हट्टाने सारखे हे ना ते करत राहतील. कधी काम संपले असे नाहीच. जगाच्या रचनेत तृप्तीला, समाप्तीला ते स्थानच देत नाहीत. परिपूर्णतेचा आनंद त्यांना माहीत नाही. तो ते ओळखीत नाहीत.
पाश्चिमात्यांकडे धोका आहे त्याच्या उलट वृत्तीचा आपल्याकडे आहे. पाश्चिमात्य बाह्य जगाचे भोक्ते तर आपण आन्तरिक जगाचे उपासक. सत्तेचे, बाह्य विस्ताराचे क्षेत्र आपण हीन लेखून दूर फेकतो. ब्रह्माचे वैचारिक चिंतन करावे, ही आपली वृत्ती. जगातील सर्व घडामोडीतून प्रकट होणारे परब्रह्म पाहायचे नाही, असा जणू आपला निश्चय. आपल्याकडचे परब्रह्माचे उपासक आपल्याच समाधीत मग्न असतात. परंतु यातही अधःपात आहे. त्यांची श्रध्दा नियमाना मानीत नाही. त्यांची कल्पना अनिर्बंध संचार करू पाहते. त्यांच्या आचाराविषयी त्यांना विचाराल तर उत्तर देण्याचेही सौजन्य ते दाखवणार नाहीत. त्यांची बुध्दी ब्रह्माला सृष्टीपासून अलग करू पाहू इच्छिते. परंतु त्यांची ही इच्छा फोल आहे. त्यांची बुध्दी अखेर शुष्क काष्ठाप्रमाणे नीरस होते, तर्ककठोर होते. कर्माचा कायदा झुगारल्यामुळे, या बाह्य सृष्टीत कर्म करण्याची जी आवश्यकता असते, ती त्यांच्या लक्षात न आल्यामुळे, मानवजातीचे ते नुकसान करतात. परंतु आपण असे अमित नुकसान करत आहोत, मानवजातीच्या शक्तीचा नि शीलाच -हास करत आहोत याची त्यांना जाणीव नसते. आपल्याच तंद्रीत ते मस्त असतात.
खर्या आध्यात्मिकतेत अन्तर्बाह्य जगाचा मेळ असतो. आपल्या आध्यात्मिक ग्रंथातून जी आध्यात्मिक विद्या शिकवलेली आहे तिच्यात समतोलपणा आहे. सत्याला मर्यादा असते, नियम असतात.