हे एकतेचे तत्त्व मानवाच्या अनेक व्यवहारातून सारखे प्रकट होत असते. साहित्य, कला, शास्त्रे, समाज, राजनीती, धर्म,-सर्व क्षेत्रात हे तत्त्व संबंध जोडत, आपले राज्य पसरत जात असते. क्षुद्र अहंकार सोडून, मानवजातीचे प्रेम जोडून ज्यानी आत्म्याचे खरे स्वरूप प्रकट करून दाखवले, ते खरे थोर महात्मे. त्यांना आपण ऋषी म्हणतो. ते निंदा, छळ सहन करतात. प्रेमाने मानवजातीची सेवा करत राहतात. मरण आले तरी आनंदाने स्वीकारतात. स्वार्थमय जीवन सोडून ते आत्ममय जीवन जगत असतात. मानवजातीची अंतिम सत्यता ते दाखवतात - ते महात्मे मोठया मनाचे.
उपनिषदात एक पुढील उद्गार आहे : ‘न वा अरे पुत्रस्य कामाय पुत्रः प्रियो भवति’-पुत्रासाठी पुत्र प्रिय नाही, तर पुत्राच्या ठिकाणी आपले आत्मरूप आहे म्हणून तो प्रिय. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या ठिकाणी आपल्याच आत्म्याचे परमोच्च दर्शन आपणास होते. आपल्या प्रियजनांची सुखे व दुःखे आपणास आपलीच वाटतात-एवढेच नव्हे, तर आपणखीही काही वाटते. असे का वाटते? तर त्या वेळेला आपण मोठे असतो, आपले जीवन विशाल होत असते. जे सत्य सर्व विश्वाला व्यापून राहिले आहे. त्या सत्याचा स्पर्श आपणास त्यांच्या ठिकाणी होतो.
आपले प्रेम आपल्या प्रियजनांपुरतेच मर्यादित राहते. प्रेमाचा प्रवाह थबकतो व आत्म्याचा उत्तरोत्तर महान साक्षात्कार होत नाही. प्रेमाच्या मार्गावरील पहिले पाऊल आपण टाकतो आणि पहिले पाऊल टाकण्यातच सारे कुतूहल असते. या पहिल्या पावलाने आपणास कळून येते की, क्षुद्र अहंकार विसरून सर्वांशी एकरूप होण्यात आपला परमोच्च आनंद असतो. या प्रेमानेच नवजीवन मिळते, नवसामर्थ्य मिळते, नवदृष्टी मिळते. ज्या मानाने तुम्ही प्रेम वाढवाल, त्या मानाने तुमचे मन अधिक सुंदर होईल; दृष्टी अधिक विशाल होईल. प्रेम वाढते न ठेवाल तर हा नवजीवनाचा, नवसौंदर्याचा झरा सुकून जाईल. मग मैत्री संकुचित होते; कुटुंबे स्वार्थी होतात. दुसर्याचे आगत-स्वागतही करत नाहीत. राष्ट्रे स्वतःपुरते पाहणारी होतात. जाती दुसर्या जातींना पाण्यात बघतात. प्रज्वलित दिव्यावर दडपण घालण्याप्रमाणे हे आहे. मग विषारी वायू जमा होतात. ज्योत गुदमरते; - विझते.
उपनिषदे सांगतात ‘की, आत्मत्वाची ओळख पटली की, परमात्म तत्त्वाची ओळख पटेल. अहंकार दवडून स्वतःच्या शुध्द आत्म्याची प्राप्ती करून घेणे ही मोक्षयाकडे जायची पहिली पायरी. आपण परामात्म्याचे अंश आहोत, ही भावना आपल्या रोमरोमी भरून राहायला हवी. स्वार्थ जिंकल्याशिवाय, अहंकार दडपल्याशिवाय हे कसे होणार? आपल्या आत्म्याचा जो खरा मोठेपणा त्याला न मरणाने बाधा, ना कशाने. कवची फोडून बाहेर पडलेल्या पक्ष्याला कळून येते की, ज्या कवीचे मला कोंडले होते, तिच्याशी खरोखरी माझा काहीच संबंध नाही. ते कवच म्हणजे एक जड वस्तू. ना तेथे वाढ, ना विकास. त्या कवचाला बाहेरच्या विशाल विश्वाची काय कल्पना? ते कवच कितीही सुंदर गुळगुळीत असले तरी ते फोडून बाहेर आलेच पाहिजे. बाहेरची हवा, प्रकाश यांचा लाभ त्या पक्ष्याने करून घेतला पाहिजे. संस्कृतमध्ये पक्ष्याला ‘द्विज’ म्हणजे दोनदा जन्मणारा असा शब्द आहे. मनुष्यालाही द्विज म्हणतात. ज्ञान मिळवून विचाराने शुध्द होऊन जणू नवीन जन्म मिळवून घ्यावयाचा. द्विजत्व प्राप्त झाल्यावर गरजा साध्या होतात. अंतःकरण निर्मळ होते. निःस्वार्थ बुध्दीने व विशाल हृदयाने तो जीवनाच्या जबाबदार्या अंगावर घेतो. स्वार्थमुक्त होऊन विश्वाशी एकरूप होतो.
मी मागेच सांगितले की, भारतातील ऋषी त्यागाचा जो मार्ग दाखवत तो कर्मशून्यतेचा नसे. जगाचा त्याग न करता अधिक सम्यतेने जग आपलेसे करून घेण्याचे ते ध्येय होते. ख्रिस्त म्हणतो : ‘जे सौम्य वृत्तीचे आहेत, त्यांची ही पृथ्वी आहे.’ या म्हणण्याचा अर्थ हाच की, मनुष्य जेव्हा अहंकार व स्वार्थ सोडतो, तेव्हाच त्याचे खरे वैभव त्याला मिळते. त्याला स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी मग झगडावे लागत नाही. त्याच्या अमर आत्म्याचा अमर हक्क प्रस्थापित असतोच.