ख्रिस्ताच्या उपदेशातही ही गोष्ट आहे. जेव्हा खिस्त म्हणतो: “सुईच्या नेढ्यातून एक वेळ उंट पलीकडे जाईल, परंतु स्वर्गाच्या दारातून श्रीमंत आत जाऊ शकणार नाही;” त्या वेळेस उपनिषदातील विचार जणू तो मांडतो. ख्रिस्ताच्या म्हणण्याचा भावार्थ असा की, आपण स्वार्थी बनताच इतरांपासून अलग होतो. आपली मालमत्ता आपणास संकुचित करते. जो स्वतःसाठी द्रव्यार्जन करतो, त्याचा अहम् इतका जाडजूड होतो की, आध्यात्मिक जगाच्या दारातून त्याला आत जाता येत नाही. स्वतःच्या मर्यादित संचयात तो कोंडला जातो. ‘मी’ ‘माझे’ या भिंतीत तो चिणला जातो.
म्हणून उपनिषदे सांगतात की, देव पाहिजे असेल तर जगाला प्रेमाने मिठी मारा. तुम्ही पैसे जोडू पाहता; परंतु जगाला तोडता. ईश्वर म्हणजे परिपूर्णता. ती प्राप्त करून घेण्याचा मार्ग पैसा नसून प्रेम हा आहे.
भारतीय तत्त्वज्ञानातील ब्रह्म म्हणजे जगात जे जे आहे त्याचा अभाव होय. असे काही पाश्चिमात्य तत्त्वज्ञानी म्हणत असतात. ब्रह्म म्हणजे अमूर्त कल्पना; याचा अनंत परमात्मा केवळ कल्पनेतच आढळायचा, असे ते म्हणतात. आपल्याकडचेही काही लोक असे बोलतात. परंतु भारतीय विचारातील ब्रह्म ही प्रत्यक्षावगम वस्तू. ती अनुभवाची वस्तू आहे. भारतीय मनाला ब्रह्मसाक्षात्काराच्या विचाराने अपार स्फूर्ती मिळत आली आहे. ही केवळ कल्पना नव्हती. प्रत्यक्ष आचारात अनुभवायची ती वस्तू होती. उपनिषदे गर्जतात, “जे काही आहे ते त्याने व्यापले आहे” , “जे देव अग्नीत, पाण्यात, धनधान्यात, वृक्षवनस्पतींत भरून राहिला आहे, त्याला प्रणाम !’ असे श्रुती म्हणत. हा ईश्वर हा केवळ अमूर्त, काल्पनिक आहे? सर्व चराचरात तो पाहायचा, एवढेच नव्हे तर त्याला नमस्कार करायचा. उपनिषदांतील ईश्वरी भावनेने वेडा झालेला मनुष्य विश्वाकडे आदराने बघतो. त्याला सारे चराचर पूज्य वाटते. या एका प्राणमय सत्यामुळे बाकीचे अनुभव सत्यमय होतात. हे केवळ जाणायचे नाही, तर त्याला पुजायचे. ‘नमो नमः” -सर्वत्र आम्ही त्याला भजू, वंदू, एक ऋषी तर आनंदाने ओसंडून -
शृण्वन्तु विश्वे अमृतस्यः पुत्राः
आये दिव्यधामानि तस्थुः
वेदाहमेनं पुरुषं महान्तं
आदित्यवर्णं तमसः परस्तात् ॥
“हे अमृतस्वरूपी परमेश्वराच्या पुत्रांनो, ऐका. स्वर्गीय दिव्य धामात राहणार्यांनो, ऐका. अंधाराच्या पलीकडून ज्याची प्रभा फाकत आहे, त्याला-त्या तेजोमय महापुरुषाला मी जाणले आहे, ओळखले आहे ” अशी गर्जना करतो या उद्गारात का संदिग्धता आहे? अनुभवाने ओले झालेले असे हे उद्गार नाहीत?
उपनिषदांतील शिकवणीच्या प्रत्यक्ष आचारावर बुध्ददेवांनी जोर दिला. ते म्हणतात, “वस्तू कुठेही असो, वर असो, खाली असो, दूर असो, जवळ असो, हृदय असो, अदृश्य असाते, - तू सर्व वस्तुजातीशी प्रेमाचा संबंध ठेव यत्किंचितही वैरभाव मनात नको. उभा अस वा चालत अस; बसलेला अस व झोपलेला अस-सर्व स्थितीत प्रेममय राहणे याला ब्रह्मविहार म्हणतात. ब्रह्माशी निशिदिन खेळ.” ब्रह्मभावनेने वेडे व्हायचे म्हणजे काय? ब्रह्माची जाणीव म्हणजे प्रत्येक वस्तूविषयी सहानुभूती असणे.