उपनिषद् सांगते, “लक्ष्यात घुसून बसणार्या बाणाप्रमाणे परमेश्वरात घुसून बस.” केवळ मनाच्या एकाग्रतेने हे सारे ईश्वराने व्यापले आहे. हा अनुभव येणार नाही. आपल्या सार्या जीवनाचा तो ध्येयार्थी अविरत उद्योग व्हायला हवा. आपल्या आचारविचारात त्या अनंताची सदैव जाणीव हवी. ती स्मृती दिवसेंदिवस सहज होऊ दे.
“को हि एव अन्यात्, क: प्राण्यात्
यदेष आकाशे आनंदो न स्यात् ।”
तो सच्चिदानंद या अवकाशात सर्वत्र भरून न राहता तर कोण जगता, कोण हालचाल करता?
कोणी म्हणतील की, “परब्रह्मप्राप्ती आपल्या शक्तीपलीकडची आहे. तो दुर्लभ परमात्मा आम्हांला असून नसल्यासारखाच.” इतर वस्तू आपण मिळवतो, त्याप्रमाणेच ही वस्तू मिळवायची असती तर ती खरोखरच अप्राप्य असे म्हटले पाहिजे होते. मनुष्याचे परमसुख वस्तूची मालकी मिळवण्यात नसून ती मिळाली म्हणजे झाले यात आहे. आपली शारीरिक सुखे अननुभूत अशा वस्तूला जागाच देत नाहीत. त्यांचे क्षेत्र फार मर्यादित असते. ज्या वेळेस आपण जेवत असतो, भूक शमवीत असतो, त्या वेळेस जो आनंद वाटतो, तो प्रत्येक क्षणी अनंतास स्पर्श करत असतो. परंतु खाण्याची क्रिया संपताच त्या सुखाचाही अंत होतो. आपल्या बौध्दिक सुखांची सीमा याहून विस्तृत असते. आपल्या खोल प्रेमवृत्ती मिळणे व न मिळणे या दोन्ही गोष्टी नेहमी बरोबर असतात. एक प्रियकर आपल्या प्रियेला म्हणतो, “जन्मल्यापासून मी तुझे सुखसौंदर्य पाहात आहे. तरी हे डोळे बुभुक्षित आहेत. लाखो वर्षे तुला हृदयाशी धरून ठेवले तरी हे हृदय अतृप्तच राहील.”
यावरून हे स्पष्ट होईल की,आपण आपल्या सर्व सुखात अनन्ताला शोधून काढीत असतो. श्रीमंत होण्याच्या आपल्या इच्छेत इतकी रक्कम मिळविणे असा अर्थ नसतो. ती इच्छा अमाप व अस्पष्ट असते. आपली क्षणिक सुखेही अनन्त परमेश्वराचीच क्षणिक सुखे. त्या आनन्दसागरावरचेच हे क्षुद्र तरंग. ज्या वस्तू कधीही अनन्त व असीम व्हायच्या नाहीत, त्यांच्या मर्यादा वाढवण्याचा व्थर्थ प्रयत्न करणे यात मानवाचे सारे दुःख, त्याची करुण कहाणी आहे. सान्ताची शिडी कितीही उंच केलीत तरी ती अनन्ताला कशी पोचणार?
मालकीच्या कल्पनेच्या पलीकडे जाण्याची आत्म्याची कसोशी असते. आत्मा नानाविध वस्तुजातांस स्पर्श करतो व अखेर म्हणतो, “मला या वस्तूंचा वीट आला. जो अप्राप्य, ज्याला मिळवायचे नसते तो कोठे आहे?”
मानवी इतिहासात एक गोष्ट स्पष्ट दिसते की, मनुष्याचे सत्यस्वरूप हे त्यागाने नटलेले आहे. त्याग हे आत्म्याचे स्वरूप. ज्या वेळेस जीव म्हणतो, “ही वस्तू मला नको, मी हिच्याहून मोठा आहे.” त्या वेळेस एका उदात्त सत्याचा तो उच्चार करत असतो. बाहुलीपेक्षा आपण प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहोत असा जेव्हा मुलीला अनुभव येतो, तेव्हा ती तिला कोपर्यात फेकते. ज्या अर्थी वस्तू आपल्या ताब्यात असतात, त्या अर्थी त्यांच्याहून आपण मोठे आहोत हे उघड आहे. आणि अशा क्षुद्र गोष्टींनी आपणास गुलाम करावे ही केवढी खेदाची गोष्ट ! गृहत्याग करताना याज्ञवल्क्य आपली मालमत्ता जेव्हा मैत्रेयीस देऊ लागतो, तेव्हा ती प्रश्न विचारते, “या मर्त्य वस्तू त्या अमर्त्य परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याच्या कामी उपयोगी पडतील का?” निराळ्या शब्दात हाच प्रश्न पुढीलप्रमाणे विचारता येईल, “माझ्या आत्म्यापेक्षा या वस्तू मोलाच्या आहेत का?” याज्ञवल्क्य मैत्रेयीस म्हणतो, “सांसरिकदृष्ट्या या वस्तू तुला श्रीमंत करतील.” ती म्हणते, “मग यांचा मला काय उपयोग?” आपल्याला खरोखर काय मिळवायचे आहे, आपल्याजवळ जे आहे त्याची वास्तविक किंमत काय?- हे सारे जर मनुष्य नीट समजून घेईल, तर तो मोहात पडणार नाही. या वस्तू संभाराहून अति थोर, परमोच्च असे माझे स्वरूप आहे, ही गोष्ट त्याला कळून येईल. क्षुद्र बंधनातून मग तो मुक्त होईल. मनुष्य मोहमय संपत्तीच्या पलीकडे जेव्हा जाईल तेव्हाच त्याला स्वतःच्या स्वरूपाची खरी किंमत कळेल. अनन्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग अनन्त त्यागाच्या पायर्यांनी बांधलेला आहे.