मनुष्याचे व्यक्तित्व म्हणजे अंतिम सत्य नव्हे. मनुष्यामध्ये असे काही आहे-जे विश्वात्मक आहे. जेथे फक्त तुमचाच विचार तुम्हांला करावा लागेल असे जग तुम्हाला दिले, तर ते तुम्हाला आवडणार नाही. तुरुंगातील तो एकान्तवास वाटेल. सजीव-निर्जीव सृष्टीशी आत्मिक संबंध जोडण्यात मानवाचा विशुध्द आनंद आहे. सर्वांना सामान्य, सर्वांना व्यापणारे असे जर तत्त्व नसेल तर हे अशक्य आहे. हे सर्वव्यापी तत्त्व ओळखणे हे आपले परम कर्तव्य. ते ओळखून नि अनुभवून आपण मोठे होतो. आपल्या वैयक्तिक वासना विश्वात्मक सत्यतेच्या विरुध्द आहेत तोवर दुःख आहे.

एक काळ असा होता की, मानव प्राणी देवाजवळ विशेष सवलती मागे. सृष्टीचे आपल्या सुखाच्या आड येऊ नयेत, अशी आपण इच्छा करीत असू. परंतु कायदा झुगारून चालणार नाही, हे ज्ञान आज आपणास झाले आहे. या ज्ञानाने आपण अधिकच बलवान झालो आहोत. कारण हा कायदा निराळा नाही. तो आपलाच आहे. विश्वव्यापी कायद्यामध्ये जी शक्ती आहे, तीच आपल्यामध्येही आहे. एकच शक्ती अन्तर्बाह्य भरून आहे. आपण संकुचित असू तर ही शक्ती आपणास भिवविते. आपण मोठया दृष्टीने वागू तर ही विश्वशक्ती आपणास मदतच करते. सृष्टीच्या नियमांचे अधिकाधिक ज्ञान होईल तसतशी आपली शक्ती वाढतच जाईल. आपणास जणू विश्वात्मक शरीर मिळते. विजेची शक्ती, बाष्पशक्ती, जणू आपलेच हातपाय, आपलेच कानडोळे. शरीरातील सर्व अवयवांशी संबंध असल्यामुळे हे सारे शरीर आपणास आपले वाटते, त्याप्रमाणे विश्वाचे स्वरूप समजू लागल्यावर सारे विश्व आपले वाटेल. आजच्या शास्त्रीय युगात जगाशी एकरूप होण्याचा हक्क प्राप्त व्हावा म्हणून धडपडू या. खरोखर आपल्या शक्तीस सीमा नाही. कारण विश्वव्यापी कायद्याची विश्वात्मक शक्ती ती आपलीच आहे. रोग व मृत्यू यांच्यावर सत्ता मिळवत चाललो आहोत. शास्त्रीय ज्ञानाच्या साह्याने बाह्यरीत्या तरी सृष्टीशी आपण संबंध जोडत आहोत. मोठे होत आहोत. जसजशी प्रगती होईल, तसतसे दुःख-दैन्य कमी होईल, असा विश्वास वाटत आहे. व्यक्तिगत जीवन व बाहेरचे विराट जीवन यांचा मेळ घालता आला म्हणजे सारे ठीक जमते.

आपल्या आध्यात्मिक जीवनात असेच आहे. विश्वात्मक पुरुषाच्या जीवनाशी त्या सत्तेशी जेव्हा आपण जमवून घेत नाही, बंड करतो, तेव्हा नैतिकदृष्टया आपण अधःपतित होतो. अशा परिस्थितीत मिळवलेले विजयही शेवटी पराजयच ठरतात. आपल्या वासना पूर्ण होण्यानेच आपण अधिक दरिद्री होतो. आपणस विशेष सवलती मिळाव्यात, आपला फायदा व्हावा, असे वाटते. परंतु जे सर्वांसाठी नाही, त्याचा जे सर्वांसाठी आहे त्याच्याशी सदैव झगडा राहणार. सत् आणि असत्, दैवी आणि आसुरी वृत्तींचा मेळ कसा मिळणार? स्वाथी मनुष्य तटबंदी करन राहतो. मग युध्दे, यादवी ! असे वागून पुन्हा आपणच कुरकुर करतो. की, या जगात सुख नाही ! बाबा रे, तुझ्या सुखाच्या आड सृष्टी येत नसून तूच येत आहेस. तो विश्वात्मक भाव जवळ कर म्हणजे सुखाला तोटा नाही. मग आनंदसागर हेलावतील. परंतु क्षुद्र व्यक्तीला हे पटत नाही. स्वार्थामुळे ह्या जगात गुंतागुंती नि झगडे. स्वार्थामुळे समाज विस्कळित होतो. सर्व दुःखांच्या मुळाशी हा स्वार्थ आहे. शेवटी समाजात व्यवस्था राहावी म्हणून शासनसंस्था उभ्या राहतात. त्या हुकूमशाही पध्दतीने सर्वांना दडपून शान्तीचा देखावा उभा करतात. स्वार्थामुळे या अशा शासनसंस्था ठेवणे भाग पडते. पदोपदी हा मानव्याचा अपमान आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel