बुध्दांचे निर्वाण प्रेमाने मिळवायचे असते. निर्वाण म्हणजे प्रेमाचा परमोत्कर्ष. केवळ निरपेक्ष प्रेम. प्रेम हे प्रेमासाठीच करायचे असते. बाकी इतर गोष्टीत आपण “का”? असा प्रश्न विचारू शकतो. परंतु ‘मी प्रेम करतो’ असे जेव्हा आपण म्हणतो, तेथे “का”? याला जागा नाही.
स्वार्थी मनुष्यालाही त्याग करावा लागतो. परंतु तो सक्तीने करतो. फळ पिकलेले नसते तेव्हा झाडाला दुखवून ते तोडावे लागते. परंतु पिकलेले फळ झाड आपण होऊन देते. मनुष्य प्रेम करतो तेव्हा देणे हा त्याचा आनंद असतो. स्वार्थाने केलेला त्याग बोजारूप वाटतो. प्रेमाने केलेला त्याग मोक्षरूप वाटतो. स्वार्थी माणसाला सर्व वस्तू चिकटून बसलेल्या असतात. त्या काढून देणे जणू कातडी काढावी असे त्याला वाटते. परंतु प्रेमाची अशी काही शक्ती असते की सार्या वस्तू जणू सुटतात. मग त्यांचा त्याग करणे जड नाही वाटत. उलट तसे करण्यातच कृतार्थता असे वाटते.
प्रेमातच मोक्ष. प्रेमास्तव सोसलेले दुःखही आनंदरूप असते. प्रेमास्तव आपण जे कर्म करतो ते बोजारूप न वाटता मोक्ष वाटते. गीतेमधील कर्मयोगाचा हाच अर्थ.
गीता सांगते, ‘कर्म करा. कर्मानेच तुमचा स्वधर्म प्रकट होतो.’ परंतु जोपर्यंत कर्म मोकळेपणाने होणार नाही, तोपर्यंत तुमचा धर्म, तुमचे खरे रूप प्रकट नाही होणार. भीतीने वा सक्तीने केलेले कर्म तुमचे रूप कसे प्रकटील? आईचे स्वरूप मुलाची सेवा करण्यात, कर्मापासून दूर राहण्यात मोक्ष नाही. कर्मानेच मुक्ती, परंतु ते कर्म प्रेमाने केलेले असेल तर.
तो विश्वंभरही सृष्टीच्या कामात प्रकट होत असतो. उपनिषद् सांगते की, ज्ञान, बल व क्रिया हे ईश्वराचे स्वाभाविक स्वरूप आहे -”स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च ।” ईश्वरावर हे कोणी लादले नसून ते सारे करण्यात त्याचा आनंद आहे. त्या अनंत कर्मद्वारा तो स्वतःला अनुभवतो. अन्यत्रही उपनिषदांत ही गोष्ट सांगितलेली आहे.
“आनन्दात् हि एव खलु इमानि भूतानि जायन्ते । आनन्देन जातानि जीवन्ति; आनन्दं प्रयन्ति, अभिसंविशन्ति ।” - ही सारी सृष्टी आनंदातून जन्मली, आनंदाने पाळली जाते, आनंदाकडे तिची गती आहे, आनंदात ती शिरत आहे. ईश्वराने त्याला गरज होती म्हणून नाही सृष्टी निर्मिली; तर त्याच्या आनंदातून, प्रेमातून हे विश्व जन्मले. या सृष्टीत त्याने स्वतःला ओतले. प्रकटिले.
एखाद्या कल्पनेने वेडा झालेला चित्रकार ती कल्पना व्यक्त करतो. आणि ते चित्र दूर धरून बघतो. ते चित्र दूर धरूनच त्याच्याशी तो अधिक एकरूप होतो. आपण आपल्यापासून आनंदाने दूर होतो, नाना रूपे स्वतःला देतो. परंतु त्यामुळे आपण आपले अधिकच होत असतो. पिता मुलामध्ये स्वतःचे रूप पाहतो. परंतु पुत्ररूपाने ते अलग होणे तिरस्कारजन्य नसून ते प्रेममय असते. प्रेमामध्ये वियोगी वरपांगी असतो. तेही ऐक्याचेच रूप.
ईश्वरापासून, इतर सकल चराचरापासून अलग राहणे हा जीवनहेतू नसून एक होणे हा आहे. निराळे राहणे म्हणजे माया. कारण ती गोष्ट खरी नाही. निराळे असणे जर सत्यरूप असेल, तर ते किती भयंकर होईल ! आपण मग सर्वांपासून दूर होत होत अशा थराला पोचतो की, तेथे घेरीच येईल. आपण मग सर्वांना कःपदार्थ समजून वाटेल तसे वागतो. सार्या जगाला लुटायला तयार घ्यायला आपण मागेपुढे पाहात नाही. परंतु हे आपले खरे स्वरूप नाही. हे धुके आहे, सूर्यप्रकाश नाही.