प्रेमरूपाने साक्षात्कार

सान्त आणि अनन्त, मर्यादित आणि अमर्यादित, आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्र राहण्याचा जो सनातन प्रश्न त्याचा आता आपण विचार करू. जीवनाच्या मुळाशी असणारा हा फार भव्य व उदात्त असा विरोधाभास आहे. मर्त्य आणि अमर्त्य एकत्र कसे राहणार? तर्कशास्त्रात हा प्रश्न उत्पन्न होतो. प्रत्यक्ष व्यवहारात या दोन वस्तू एकत्र यायला अडचण वाटत नाही, परंतु तर्कदृष्टया पाहिले तर या दोन वस्तूंमधील अनन्तर कितीही थोडे असले तरी ते अनन्त आहे ! कारण त्या अनंताचे अनंत विभाग पाडता येतात. परंतु आपण पदोपदी सान्तापलीकडे जात असतो आणि अनन्ताला भेटत असतो. म्हणून आपल्यातील काही तत्त्वज्ञानी म्हणतात की, समर्याद वस्तू नाहीच मुळी. समर्यादता जी दिसते तो भास आहे. ती माया आहे. परंतु माया शब्द वापरल्याने अर्थ स्पष्ट झाला असे नाही. सत्याबरोबर सत्याशी विरोधी असे एक दृश्य असते. त्याला आपण आभास म्हटले. माया म्हटले. प्रश्न हा आहे की, एकाच वेळी या दोन गोष्टी एकत्र कशा राहतात? बुध्दीला हे कोडे उलगडत नाही.

सृष्टीमध्ये विरोधी वस्तूंच्या अनंत जोड्या आहेत. सृष्टी द्वंद्वात्मक आहे. धनविद्युत-ऋणविद्युत, उत्तर ध्रुव-दक्षिण ध्रुव आकर्षण -अपकर्षण अशा विरोधी वस्तूंच्या सर्वत्र जोड्या. परंतु या विरोधी पक्षांनी या जगात तडजोड केल्यामुळे तर जग चालते. जगातील विरोधी शक्ती ईश्वराच्या डाव्या उजव्या हाताप्रमाणे आहेत, आणि विरोधी असूनही ऐक्याने काम करीत आहेत. आपलेच डोळे बघा. एक डावा, एक उजवा; परंतु त्यांच्यामध्ये काही तरी प्रेमबंध आहे. दोन्ही डोळे ऐक्यवृत्तीने बघतात. सृष्टीतील द्वंद्वात प्रकाश नि अंधार, उष्णता नि थंडी, गती नि स्थिती इत्यादींत अखंड संबंध आहे. वाद्यातील अगदी खालच्या व अगदी वरच्या सुरात जसा मेळ असतो तसेच हे. सृष्टीत यामुळे घोटाळा न माजता सुसंवाद दिसतो. सृष्टी म्हणजे जर सारी अव्यवस्थाच असती, कोणत्याही प्रकारची नियमितता, हेतुमयता येथे नसती, तर परस्परविरोधी तत्त्वांनी एकमेकाहून वरचढ होण्यासाठी सारखी धडपड चालवली असती. परंतु सृष्टी लहरी कायद्याने चाललेली नाही. सृष्टीतील शक्ती बेलगाम नाहीत. प्रत्येक शक्तीला शेवटी वक्ररेषेने मागे येऊन समतोल राहावे लागते. लाटा एकमेकांवर आदळत येतात. जणू त्यांच्यात भयंकर स्पर्धा आहे असे वाटते, परंतु एक विवक्षित अंतरापर्यंतच त्या लाटा वर चढतात. पुन्हा एकसाथ नाचत समुद्रात विलीन होतात. त्या उसळणार्‍या लाटांचा सागराच्या चिरगंभीर शान्तीशी शाश्वत संबंध आहे.

खरे पाहू तर हे तरंग, हे कंप, हे आरोह-अवरोह म्हणजे वेडेवाकडे आळेपिळे देणे नव्हे. सृष्टीतील हा महान् नाच आहे. हे युध्द नाही, जेथे संघर्ष असेल तेथे संगीत कोठले? मूलभूत तत्त्वविरोध न राहता ऐक्य असेल तरच संगीत शक्य आहे. गूढाहून गूढ असे हे ऐक्य तत्त्व आहे. जगातील द्वंद्वे बघून आपण साशंक होतो. परंतु अद्वैताने आपण समाधान करू पाहतो. या द्वंद्वात विरोध नसून खर्‍या अर्थाने नीट संबंधच आहे, असे जेव्हा दिसते तेव्हाच सत्य सापडले असे आपणास वाटते. आण सर्वांना चकित करणार्‍या विरोधाभासाचे खरे स्वरूप आपण सांगतो की, “एकच सत्-तत्त्व अनेक रूपांनी नटते. अनेक रूपांनी त्याचे दिसणे सत्याला विरोधी असूनही सत्याशी ते कायमचे जोडलेले आहे.”

निसर्गाच्या विविधतेत व्यापक कायदा कोणी बघतात. परंतु आपल्या आनंदाच्या मुळाशी असलेली गूढ भावना अशाने दृष्टीआड होते. गुरुत्वाकर्षण म्हणजे फळ खाली पडणे, उत्क्रान्ती म्हणजे एका जीवकोटीतून दुसरीत जाणे, संशोधन म्हणजे का एखादा नियम शोधून काढणे? एवढयाने आपणास समाधान नाही. बुध्दी म्हणजे आपले सर्वस्व नाही. बुध्दी म्हणजे सर्व जीवन नव्हे. बुध्दी आपल्यात असणार्‍या अनंततेच्या भावनेला मारून टाकते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel