जसे हे आपले शरीर, तसे आपणास दुसरे एक शरीर आहे. हे म्हणजे सामाजिक शरीर. समाज-शरीराचे आपण अवयव आहोत. शरीरागत इच्छांत ज्याप्रमाणे झगडे असतात, व आपणास मेळ घालावा लागतो, त्याप्रमाणे समाजशरीरातही झगडे उत्पन्न होतात. शरीरात ज्याप्रमाणे सर्व शरीराचे हित पाहणारीही इच्छा असते, त्याप्रमाणेच आपल्यात सामाजिक तत्त्व असते. ते सर्व समाजाच्या कल्याणाची इच्छा करते. ही इच्छा आपणास अनंताकडे नेत असते. विचारी मनुष्य स्वतःच्या इच्छा व समाजाच्या कल्याणाची इच्छा यांत विरोध उत्पन्न होऊ देत नाही, आणि आपल्या महान् स्वरूपाचा अनुभव घेतो. जेव्हा आपण स्वतःपुरते पाहतो तेव्हा इतरांपेक्षा पुढे जावे, कीर्ती मिळावी म्हणून आपण वाटेल ते करायला मागे-पुढे पाहात नाही. परंतु आपल्यातील अनंतत्वाची जाणीव जेव्हा आपणास होते, तेव्हा आपण स्वतःचे सुख नि सत्ता न बघता सर्वांच्या कल्याणाशी मेळ घालून पूर्णतेकडे पावले टाकतो. शरीराचा मोक्ष आरोग्यसंपन्न होण्यात आहे. आपल्या सामाजिक जीवनाचा मोक्ष सामाजिक मंगल निर्माण करण्यात आहे. प्रेमरूप होण्यात आहे. स्वार्थ मालवून प्रेम मिळवणे यालाच बुध्द निर्वाण म्हणतात. निर्वाणाने आपण शून्याकडे नाही जात, तर दिव्य प्रकाशाकडे जातो. यालाच ‘बोधी’ म्हणजे खरी जागृती असे म्हणतात. आपल्यातील आनंद प्रेमरूपाने प्रकट करणे म्हणजे बोधी, म्हणजे निर्वाण, म्हणजे मोक्ष. आपल्यातील पृथक व्यक्तित्वाला सर्वांशी मिळून असणार्या आत्मतत्त्वाकडे जायचे आहे. परंतु सक्तीने सृष्टीशी एकरूप होता येणार नाही. तुम्ही आधी अलग राहून पाहाल, मग पस्तावून प्रेमरूप व्हाल. स्वेच्छाचाराने, स्वार्थीपणाने परमोच्च ध्येयापासून तुम्हास तुटल्यासारखे वाटेल. आपले जीवन हेतुशून्य वाटू लागेल. आपल्या इच्छास्वातंत्र्याला विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतंत्रता आहे. आपल्या इच्छेला कायमचे अनिर्बंध राहता येणार नाही. कारण पाप हे सान्त आहे. त्याला आज ना उद्या शेवट येईलच. बंडखोरपण चिरंजीव असू शकत नाही. आपणास इच्छास्वातंत्र्य यासाठी दिलेले आहे की, इकडे तिकडे भटकून शेवटी प्रेम व सद्भाव यांचा तिने रस्ता धरावा. प्रेम व सत् ही चिरंजीव तत्त्वे आहेत. जे अनन्त नि अविनाशी आहे, त्यातच आपणास पूर्ण स्वातंत्र्याचा साक्षात्कार करून घेता येईल. जेथे भ्रम आहे, संकुचितता आहे, तेथे कोठले स्वातंत्र्य? आत्महत्या करून जगता येत नसते. स्वतःला बांधून अनंत स्वातंत्र्य कसे मिळणार? क्षुद्रतेशी स्वतःला जखडून घेणे म्हणजे स्वातंत्र्याचा खून होय.
निरंकुश अनिर्बंध इच्छा म्हणजे खोटे स्वातंत्र्य. प्रेम ही खरी स्वतंत्रता. सत्याला झुगारून आपण स्वार्थामुळे स्वेच्छेची पूजा करू लागतो, तेव्हा स्वतःवर आपत्ती ओढून घेतो. सर्वत्र ही दोन रूपे आहेत : मायिक आणि सत्यमय. शब्द हे मायिक, क्षणिक; आतील अर्थरूपाने ते सत्य नि अमर असतात. आपण स्वतःपुरते पाहतो तेव्हा आपण मायिक असतो. ख्रिस्त जेव्हा म्हणतो, “अब्राहाम होत त्याच्यापूर्वीही मी होतो,” त्यातील हाच अर्थ “मी आहे” यामधून तो “दिक्कालातीत मी” बोलत असतो. वैयक्तिक मीला अनंत मीचे स्वरूप समजल्यावरच तो मुक्त होतो.
आपणच ईश्वरापासून मायेमुळे निराळे दिसतो असे नाही, तर ही सृष्टीही ईश्वरापासून निराळी असे भासते. यालाही आपले ऋषी मायाच म्हणत. कारण मुळात असा अलगपणा नाही. सृष्टी ईश्वराच्या अनंततेला कशी मर्यादा घालणार? ईश्वरानेच स्वतःच्या इच्छेला आनंदाने बंधने घालून घेतली आहेत. बुध्दिबळे खेळणारा वाटेल तशी बुध्दिबळे हालवू शकत नाही. आपण होऊन खेळासाठी ती बंधने घातलेली असतात. तसे न करू तर साराच खेळ खलास होईल. ईश्वर जर पदोपदी सर्वशक्तिमान् म्हणून पुढे येईल तर सारी सृष्टी समाप्त होईल. शक्तीलाही स्वतःची शक्ती राहावी म्हणून मर्यादा घालून घ्यावी लागते. पाण्याने पाणीच राहिले पाहिजे. पृथ्वीने पृथ्वी; - ईश्वरानेच असे केले आहे. खेळणार्यापासून खेळ निराळा असला म्हणजे आनंद असतो.