“कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः। ‘
कर्म करीत शंभर वर्षे जगावे, अशी मनुष्याने इच्छा करावी. आत्म्याचा आनंद आकंठ चाखणार्या ऋषींचे हे उद्गार आहेत. आत्म्याचा पूर्ण साक्षात्कार ज्यांना घडला व रडकी गाणी कधीही गात बसले नाहीत. कर्म म्हणजे दास्य, जीवन दुःखरूपच आहे, असे त्यांनी कधी सांगितले नाही. फळ होण्यापूर्वीच गळून पडणार्या नाजूक देठाच्या फुलाप्रमाणे ते आत्मानुभवी ऋषी नव्हते. जीवनाला सर्व शक्तीने ते चिकटून बसतात. “फळ पिकल्याशिवाय देठ सोडणार नाही.” अशा प्रतिज्ञेने ते बसतात. अनंत कर्मांच्या द्वारा प्रकट होण्यासाठी ते उत्साहाने अविरत झिजतात. दुःखसंकटांनी ते खचत नाहीत. अंतःकरणावर बोजे पडून ते जमीनदोस्त होत नाहीत. विजयी वीराप्रमाणे मान उंच ठेवून ते पुढे जात असतात. विश्वात घडामोड करणारी जी विश्वशक्ती, तिच्या आनंदाला तेही सारखे धडपड करीत साथ देतात, सुख वा दुःख त्यातून स्वतःचेच तेज प्रकटवून त्या तेजात स्वतःला पाहात ते पुढे कूच करतात. परमात्म्याबरोबर जीवात्म्याचा नाच. सूर्यप्रकाशाचा आनंद, मोकळया हवेचा आनंद त्यांच्या जीवनातील आनंदात मिसळतो. अन्तर्बाह्य एकच अखंड संगीत, एकच आनंदमय सृष्टी असे अनुभवणारे ते महात्मे सांगत आहेत, “कर्मे करीत शंभर वर्षे जगेन अशी प्रत्येकाने इच्छा बाळगावी.”
हा कर्मानंद मायिक नाही. हे हाडे चघळणे नव्हे. हा आनंद मिथ्या आहे, कर्मत्यागाविना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे यात्रेकरून होता येणार नाही-असे म्हणणे खोटे आहे. कर्मभूमीपासून दूर राहून अनंताचा साक्षात्कार करू पाहणे वेडेपणाचे आहे. त्याने हित मंगल होणार नाही.
सक्तीमुळे मनुष्य कर्म करतो, हे म्हणणे खोटे आहे. एका अर्थी सक्ती असली तरी दुसर्या अर्थी आनंद आहे. मनुष्याच्या गरजा त्याला श्रमावयास लावतात हे जरी खरे असले, तरी त्यामुळेच तो स्वतःचा विकास करून घेत असतो, पूर्णतेकडे जात असतो, हेही खरे. म्हणून जसजशी संस्कृती वाढते तसतशा तो स्वतःच्या जबाबदार्याही वाढवून घेतो. स्वच्छेने नवनवीन कर्मक्षेत्रे निर्मितो. मानवाला सतत कर्ममग्न ठेवण्यासाठी सृष्टीने आधीच भरपूर तजवीज करून ठेवली आहे, असे म्हटले तरी चालेल. क्षुधातृषांच्या तृप्त्यर्थ मरेमरेतो काम करावे लागतेच. परंतु एवढयाने तो तृप्त होत नाही. पशुपक्ष्यांप्रमाणे सृष्टीने नेमून दिलेले तेवढेच करण्यात त्याला समाधान नाही वाटत. मानवेतर सृष्टीहून आपण अधिक करावे, असे त्याला वाटते. मनुष्याइतके कोणत्याही प्राण्याला राबावे लागत नाही. मानवाने अपार कार्यक्षेत्र स्वतःसाठी निर्मिले आहे. तो जुने पाडतो, नवे उभारतो. जुने कायदे रद्द करून नवे करतो. नाना प्रकारची सामग्री जमवतो. रात्रंदिवस विचार करतो. शोधबोध चालवतो. श्रमतो-सहन करतो. आजवर त्याने अनेक लढाया दिल्या आहेत. नवीन नवीन मिळवले आहे. संकटांना कवटाळले आहे, मृत्यूला शोभवले आहे.
परिस्थितीच्या पिंजर्यातील आपण पक्षी नाही, हे सत्य मानवाने शोधून काढले आहे.या जाणार्या क्षणाहून मी मोठा आहे, हे त्याने ओळखले आहे. काही न करता उभे राहण्यात क्षणभर बरे वाटले तरी अनंत जीवनाचा कोंडमारा होऊन जीविताचा हेतूच दूर राहतो.