परन्तु आपणात मर्यादितपणाबरोबर अमर्याद तत्त्वही आहे. आपल्यातील हा मृतत्वाचा अंश अनन्ताकडे जाऊ इच्छितो. त्याला संपत्तीची स्पृहा नसते. त्याला स्वातंत्र्य, आनन्द या वस्तू हव्या असतात. तेथे मिळवणे नसून काही तरी गमवायचे असते. काय  व्हायचे? - ब्रह्माशी एकरूप व्हायचे. अनन्ताच्या राज्यात अर्तक्य आहे. उपनिषदे सांगतात, “येथेच जाणून घेशील तर खरे.” ईश्वराच्या राज्यात काही मिळवायचे नसते, तर व्हायचे असते. शब्दाचा केवळ अर्थ समजून भागत नाही तर अर्थरूप व्हावे लागते.

ख्रिस्ताने, ‘माझ्या पित्याशी माझे ऐक्य आहे,’अशी थोर घोषणा केली. इतराप्रमाणे अव्यंग बना, असा अनयायांना त्याने उपदेश केला. परंतु ज्या ख्रिस्ताचा धर्म युरोप पाळते, त्या युरोपला त्या अनन्त चिच्छक्तीशी आपले ऐक्य हे हा विचार अजून पटला नाही. मनुष्याने ईश्वर होणे म्हणजे ईश्वराचा -हास असे त्यांना वाटते. ख्रिस्तानेही मनुष्याने मनुष्यत्व विसरून परब्रह्मरूप व्हावे, असे स्पष्टपणे नाही सांगितले. ख्रिस्ती संतांनाही ही कल्पना अपरिचितच होती. परन्तु युरोपमध्येही वरील विचार अलीकडे लोकप्रिय होत आहे.

पौरस्त्य ऋषी ईश्वराचा उपयोग आपल्या रोजच्या कामकाजासाठी करून घ्यावयाचा आहे, असे कधी सांगत नाहीत. ऐहिक इच्छापूर्तीसाठी ईश्वराला पाठवून घेणे हा विचार त्यांच्या मनात नसे. ईश्वराशी अधिकाधिक एकरूप होणे आपली उंचातील उंच आकांक्षा असे. या भौतिक सृष्टीत, या प्रपंचात आपण संपदा मिळवून मोठे होतो. परंतु आध्यात्मिक सृष्टीत आपण स्वतःला देऊन टाकल्याने मोठे होत असतो. मिळवणची क्रिया मर्यादित आहे. परंतु होण्याची अमर्याद आहे. अनंताशी आपला जो संबंध, आपले जे साधर्म्य त्यातून ओढ जन्माला येते. अनंताशी आपला संबंध असल्यामुळेच परिपूर्णतेचे तत्त्व आपल्या अंतःकरणात असते. आपणास ब्रह्ममय व्हावेसे वाटते, पूर्णाला मिठी मारावी असे वाटते. त्या परमोच्च पूर्णतेचा अनुभव जीवनात आम्हाला कधीच घेता येणार नसेल तर आमचे अस्तित्व निरर्थक आहे. ध्येयाचे दर्शन कधीच घडणार नसेल तर ते ध्येयच नव्हे.

ब्रह्म आणि जीव यांच्यात का फरक नाही? फरक आहे. त्याला अज्ञान म्हणा, माया म्हणा, भ्रम म्हणा, परंतु तो फरक आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्म. पूर्णतेचे अनंत ध्येय म्हणजे ब्रह्म. तेच आपलेही खरे स्वरूप. परंतु आपण आज तसे नाही आहोत. आपणास तसे व्हायचे आहे. ब्रह्मरूप होत जायचे आहे. प्राप्त परिस्थिती व ती ध्येयात्मक स्थिती यांच्या दरम्यान अनन्त काळापासून तो प्रेमाचा खेळ चालला आहे. या खोल गूढतेत सकल सत्याचा नि सौंदर्याचा उगम आहे. या विशाल सृष्टीचा अखंड नाच त्यामुळेच चालला आहे.

जोराने पुढे जाणारा प्रवाह आनन्दाने व निःशंकपणे गर्जत असतो : ”मी समुद्र होणार !” ही गर्जना म्हणजे भ्रान्त कल्पना नाही, किंवा ही अहंकारमय दर्पोक्ती नाही. ही नम्रतेची गर्जना आहे. कारण तिच्यात सत्यता आहे. नदीला दुसरे ध्येय नाही. तिच्या तीरावर शेतेभाते, वने-उपवने असतात, पुरे-पट्टणे असतात. ती या सर्वांच्या उपयोगी पडते. ती घाण वाहून नेते, अन्न देते, वाहतुकीस उपयोगी पडते. तिचे या सर्वांशी संबंध असले तरी तिचे आतडे येथे गुंतत नाही. हे तिचे वाटेवरचे तात्पुरते संबंध. ती क्षणभर तेथे घुटमळते, परन्तु पुढे जाते. ती वनरूप होणार नाही, नगररूप होणार नाही. ती समुद्ररूपच होणे शक्य, व ती होईलही. तिचे ते चंचल, खेळकर, नाचरे पाणी, त्याचा त्या अनन्त जलराशीशी संबंध आहे. हजारो वस्तूंस स्पर्श करीत नदी पुढे जाते, व जेव्हा समुद्रास मिळते तेव्हाच ती कृतार्थ होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel