मानवी जीव प्रवास करीत आहे. नियमातून प्रेमाकडे, बंधनातून मोक्षाकडे, नैतिक दशेतून दैवी पारमार्थिक दशेकडे तो जात आहे. बुध्ददेवांनी नैतिक जीव-नाचा, व्रती संयमी जीवनाचा उपदेश केला. परंतु हे जीवन म्हणजे ध्येय नव्हे. कायदे पाळून बंधने पाळून त्यांच्या पलीकडे जाता येते. या मार्गानेच सुखाच्या माहेराला त्या परम आनंदाला आपण जाऊन मिळतो. बंधनांच्या मर्यादित रूपातही ते ब्रह्मच प्रकट होत असते. भगवान बुध्द या गोष्टीला ‘ब्रह्माविहार’ म्हणत. ब्रह्माबरोबर खेळण्याची परम दशा ज्याला प्राप्त करून घ्यावयाची आहे, त्याने कोणाचा मत्सर करू नये, कोणावर रागावू नये, कोणाला मारू नये. सर्वांवर प्रेम करावे. त्याने जगाची आई व्हावे वरखाली, पुढे-मागे सर्वत्र त्याने प्रेम पसरावे. त्या प्रेमाला नको सीमा, नको अडथळा. प्रेम अमर्याद असो, सदिच्छा विश्वव्यापी असो.
प्रेमाचा अभाव म्हणजे जगाविषयी बेफिकीरी. तो दुष्टपणा होय. प्रेम म्हणजे पूर्ण जाणीव. आपण दुसर्याचा विचार करीत नाही म्हणून प्रेमही करीत नाही; किंवा आपण दुसर्यावर प्रेम करीत नाही म्हणून त्याचे स्वरूप आपणास कळत नाही. सर्व वस्तुमात्राचे अंतिम फलित प्रेम होय. प्रेम ही भ्रान्त कल्पना नसून ते सत्य आहे. सृष्टीच्या मुळाशी असलेला आनंद-त्याला प्रेम म्हणतात. उपनिषद् म्हणते -
“कः प्राण्यात् यदेष आकाशे
आनंदो न स्यात् ।”
“या जगात सर्वत्र आनंद नसता तर कोण जगता, हालचाल करता?” प्रेमामुळे आपण जगतो. आपल्या बुध्दीला, जाणीवेला प्रेममय करून जगभर प्रेम पसरू, तरच ब्रह्मविहार शक्य होईल.
देणे, सतत देणे हा प्रेमाचा स्वभाव आहे. प्रेम सहज स्फूर्तीने अनंत देणग्या देत असते. या देणग्यांच्या पाठीमागचे प्रेम आपण न पाहू तर सारे स्वारस्य जाईल. ज्यांच्या हृदयात प्रेम नाही तो प्रियकराने दिलेल्या देणग्यांचा केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीनेच विचार करतो. परंतु ही उपयुक्तता ही तात्पुरती असते. जरूर असेल तेव्हा उपयोग. जरूर नसता वस्तू समोर असेल तर ओझे वाटते. परंतु हृदयात प्रेम असेल तर साधी वस्तूही चिरंतन, मोलाची वाटते. कारण ती विशिष्ट उपयोगासाठी नसते. प्रेम प्रेमासाठी असते. त्या लहानशा प्रेमचिन्हांचा आपणास कधी कंटाळा येत नाही.
ईश्वराने प्रेमाने हे विश्व तुम्हांस दिले आहे. याचा कशा रीतीने आपण स्वीकार करता हा प्रश्न आहे. आपणास प्रिय वाटणार्या वस्तू आपण हृदयमंदिरात पूजतो, त्याप्रमाणे या जगाला आपल्या हृदयात स्थान आहे का? या जगाच्या भांडारातून आपण सारखे घेत आहोत, अधिकाधिक मिळावे म्हणून झगडत आहोत. सृष्टी भीषण स्पर्धाक्षेत्र झाली आहे ! या जगावर मालकी हक्की स्थापण्यासाठी का आपण जन्माला आलो? हे जग म्हणजे का बाजारातील एक वस्तू? जगाचा उपयोग कसा करून घ्यायचा इकडेच सारे लक्ष असेल, तर या जगाची खरी किंमत तुम्ही ओळखली नाही असे म्हणावे लागेल. अधाशी मूल एखाद्या थोर ग्रंथातील पाने फाडून तोंडात कोंबते, त्याप्रमाणेच सृष्टीच्या या विशाल ग्रंथाचे आपण करणार का?