हे पथच्युत मुशाफरा ! स्वतःच्याच कल्पनांनी झिंगून पडलेल्या ! मानवयात्रा विजयी पावले टाकीत कशी चालली आहे, - तिचा आवाज का तुझ्या कानावर येत नाही? मानवजातीचा प्रगतिरथ कसा धडपडत जात आहे ते का तुला ऐकू येत नाही? मानवी आत्म्याचा विश्वरूप होण्याचा हा प्रयत्न आहे. या ध्येयमार्गात सगळ्या अडचणी पायाखाली तुडवल्या जातील. कर्मद्वारा उन्नत होऊन, महान् होऊन जीव शिवाला मिळेल. उत्तुंग पर्वत फोडले जात आहेत व मानवी प्रगतीसमोर मान वाकवीत आहेत. मानवजातीच्या प्रगतीचे यशोधन उंच फडकत आहे. सूर्योदय होताच धुक्याची धावपळ सुरू होते, त्याप्रमाणे मानवी आत्म्याच्या प्रगतीपुढे गोंधळात पडणारी नाना भेंडोळी नष्ट होतील. मानवी प्रगतीमुळे दुःख, रोग, अव्यवस्था इत्यादी गोष्टी मागे हटत आहेत. अज्ञानाचे पडदे टराटर फाडण्यात येत आहेत. डोळ्यांवरची झापड दूर होत आहे. ती पाहा दिव्य मानवजात पुढे पुढे जात आहे, ध्येयाप्रत पोचत आहे. ते पाहा पूर्ण आरोग्य, ते पाहा सौभाग्य, ती पहा भाग्यलक्ष्मी, त्या बघा कला. ते पाहा ज्ञानविज्ञान ! तो बघा थोर धर्म ! ध्येयभूमी दृष्टिपथात येत आहे. मानवजातीचा हा प्रचंड रथ पृथ्वीला डळमळवीत विजयाने सारखा पुढे जात आहे. प्रगतीच्या खुणांचे दगड ठायी ठायी ठेवून पुढे जात आहेत. या दिव्य भव्य वेगवान रथाला कोणी सारथीच नाही, असे का तुला वाटते? मानवजात विजय-यात्रेवर निघाली आहे. या यात्रेत सामील व्हा, अशी हाक मारण्यात येत असता कोण असा दळभद्री कपाळकरंटा आहे की कोपर्‍यात बसून राहील? या संस्फूर्त मेळाव्यापासून दूर राहण्याचा मूर्खपणा कोण करील? दुःखाच्या दरीतून, सुखाच्या शिखरावरून अमित श्रम करीत अनादिकाळापासून विकासोन्मुख मानवजातीचा हा प्रगतिप्रवाह अन्तर्बाह्य संकटांना तोंड देऊन जो सारखा पुढे जात आहे, तो का मिथ्या? ही युगायुगांची आटाआटी का खोटी-मायामय? या दिव्य इतिहासाला कोण भ्रामक तरी श्रध्दा आहे का? जगापासून पळून जाणार्‍याला देव कोठे व कसा भेटणार? पळून जाणे म्हणजे शून्यात बुडणे नाही, अशा मार्गाने प्रभुप्राप्ती नाही. पळपुट्याला कुठला परमेश्वर? या क्षणी, या ठिकाणी मी परमेश्वराला भेटत आहे, असे म्हणण्याची हिंमत आपल्याजवळ असायला हवी. कर्मद्वारा स्वतःची ओळख स्वतःस पटते, त्याचप्रमाणे प्रभूचा अनुभवही अतरंगात येत आहे, असे निःशंक म्हणता आले पाहिजे. आमच्या कर्ममार्गांतील सर्व विघ्ने निरस्त करून आम्ही त्या परमेश्वराला मिळवत आहोत, असे छातीठोकपणे म्हणण्याचा हक्क आपण मिळवला पाहिजे. म्हणा की, “माझ्या कर्मात माझा आनंद आहे, व या माझ्या आनंदात तो परमानंद, सच्चिदानंद आहे.”

उपनिषदांनी “ब्रह्मविदां वरिष्ठाः।” अशी पदवी कोणाला दिली?

“आत्मानंद: आत्मरतिः क्रियावान् ।” ज्याचा आनंद आत्म्याच्या ठिकाणी आहे, आत्म्याचीच ज्याला आवड,-तो क्रियावान् असतो. तो ब्रह्मवेत्त्यांत श्रेष्ठ. आनंददायक खेळाशिवाय आनंदाला अर्थ नाही. क्रियेशिवाय असणारा खेळ तो खेळच नव्हे. आनंदाचा खेळ म्हणजे कर्म. ज्याचा आनंद ब्रह्माचे ठायी, तो पडून कसा राहील? ज्या रूपाने ब्रह्माचा आनंद प्रकट होतो, ते रूप आपल्या कर्माने त्याने नको का प्रकट करायला? जो ब्रह्म जाणतो, ब्रह्माचे ठायी ज्याचा आनंद, त्याचे सारे कर्म ब्रह्मासाठी करायला हवे. त्याचे सारे जीवनच ब्रह्मय. कवीला काव्यात, कलावंताला कलेत, शूराला शौर्यांत, प्रज्ञावन्ताला सत्यदर्शनात आनंद, त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्त्याचा आनंद दिवसाच्या सर्व कर्मांत. कर्म लहान असो वा महान् असो - सत्याच्या, सौंदर्याच्या, मांगल्याच्या रूपाने त्यातून अनंत परमात्म्याला आपण अखंड प्रकटवीत राहिले पाहिजे.

“बहुधा शक्तियोगात् वर्णान्
अनेकान् निहितार्थो दधाति ।”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel