अडाणी मनुष्य चेकने पैसे मिळालेले बघतो. त्याला वाटते की, कागदाचे चिटोरे जमवले म्हणजे पैसे मिळतील. तो कागदाच्या राशी जमवता, लपवतो. मांडतो. परंतु पैसे मिळत नाहीत. तो कंटाळून त्या कपट्यांना काडी लावतो. बँकनोट वटल्याशिवाय किंमत नाही. नोट नुसती अलग ठेवाल तर काय किंमत? ती पै किंमतीची आहे. ती वटवून आणावी लागते. तुम्हीही नुसते अलग नका पडून राहू. विश्वात्म्यापासून अलग राहाल तर पै किंमतीचे ठराल. परंतु मीच सत्य ही अविद्या दूर केलीत तर तो आत्मदेव अनन्त ठेवा घेऊन भेटीला येईल.

तो परमात्मा आनंदाने अनन्त रूपांनी स्वतःला देत असतो. “आनन्दरूपं अमृतं यत् विभाति ।”-ईश्वरापासून निराळ्या असलेल्या आकारांना किंमत त्याच्या आनंदाने दिलेली आहे. हे आकार जेव्हा त्या आनंदरूपात पुन्हा मिळवाल, बँकेत नोट वटवाल, तेव्हाच या वस्तूंची, या आकाराची खरी किंमत कळेल. सर्व वस्तू ईश्वरी आनंदात, त्या दिव्य प्रेमात ओता नि मग त्यांची किंमत घ्या.

जेव्हा गरजेसाठी आपण काही करतो तेव्हाचे ते करणे तात्पुरते असते. ती व्यवस्था गरज संपताच मागे पडते, धुळीला मिळते. परंतु कोणतेही काम जेव्हा आपण प्रेमाने करतो, तेव्हा त्या कामाला एक प्रकारची अमरता येते. मनुष्यातील अमरता त्याच्या कार्यासही अमरता देते.

ईश्वराच्या आनंदापासून आपण जन्मलो असल्यामुळे आपण अमर आहोत. कारण त्याचा आनंद अमर आहे. आपल्यातील अमृतत्वामुळेच आपण मरण आले तर पर्वा करीत नाही. जन्म आणि मृत्यू दोहोचा आपल्या ठायी सुसंवाद आहे. मानवी जीवन हे बाह्य दृष्टया समर्याद दिसले तरी हेतुदृष्ट्या ते अमर्याद आहे. अनंताच्या साक्षात्कारासाठी मृत्यूच्या दारातून आपण गेले पाहिजे. जीवनाचे द्विविध रूप आहे : एक दिखाऊ रूप व दुसरे यथार्थ रूप. मृत्यू हे दिखाऊ रूप. मृत्यूला सत्यता नाही. जीवनाबरोबर छायेप्रमाणे ते असते. जन्ममृत्यूच्या अनंत स्थित्यंतरांतून आपण स्वतःचा विकास करून घेत जात असतो. जेव्हा आपण स्वतःची वाढ करू इच्छीत नाही, पदोपदी मरावे, वाढावे असे इच्छीत नाही, मरण टाळू पाहतो, तेव्हाच खरोखर आपण मरतो ! परंतु आत्मविकासार्थ येणारे मरण मरणच नव्हे. ऋषी म्हणतो, “मरा, मरणाला कवटाळा.” मरण म्हणजे आत्मनाश नव्हे. प्रभात येणार म्हणून हे दीप मालवणे आहे. दिवा विझला, पण सूर्य आला.

आपल्याला आपल्या इच्छेमध्ये मेळ घालायला शिकले पाहिजे. आपल्या सुखोपभोगांच्या इच्छांबाबत आपण जागरुक असतो. खावे, प्यावे, मौज करावी, असे आपणास वाटते. परंतु या इच्छा विशिष्ट इंद्रियांच्या असतात. जिभेला आवडते ते पोटाला आवडेल असे नाही. जिव्हालौल्य जिभेचाच विचार करील, पोटाचा नाही करणार. आपणामध्ये दुसर्‍या अशा काही इच्छा असतात, -ज्या विशिष्ट इंद्रियांच्या नसून सर्व शरीरार्थ असतात. उदाहरणार्थ, आरोग्याची इच्छा. ही इच्छा सदैव कार्य करीतच असते; दुरुस्ती करीतच असते. आरोग्याची इच्छा क्षणिक वासनेचा विचार न करता दूरवरचा विचार करते. ती शरीरातील सर्व अवयवांचा विचार करते; मागचा पुढचा विचार करते. शहाणा मनुष्य आरोग्याच्या इच्छेला महत्त्व देऊन इतर शारीरिक इच्छांचा या व्यापक इच्छेशी मेळ घालतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel