“हे नावाड्या मला पार ने, परतीराला ने,” अशा अर्थाचा तो चरण होता. आपल्या सर्व कामकाजाच्या गडबडीतून “मला पार ने” हेच शब्द उमटत असतात. भारतातील गाडीवाला गाडी हाकीत असतो व “पार ने पार ने” म्हणत असतो. फेरीवाला गिऱ्हाईकाला माल विकतो व “पार ने, पार ने” म्हणतो.

हे दीन बंधु
पार कर कृपा-सिंधु ॥

या आर्त स्वराचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की, आपण अजून आपले ध्येय गाठलेले नसते, बाहुबलीच्या खेळात जिला आनंद वाटेनासा होतो, अशी मुलगी हृदय पिळवटून म्हणते, “हे नको म ला-हे नको, हे ते नव्हे; हे नव्हे ते !” मग ते दुसरे काय असते? कोठे असते ते दुसरे तीर? आपणाजवळ जे आहे त्याहून ते भिन्न का आहे? आपण सर्व कर्मे सोडल्याने का तो मिळणार आहे? जीवनाची सारी जबाबदारी फेकून का तो मिळणार आहे? नाही. आपल्या सकल कर्मांच्या अंतरंगी त्याचाच शोध चाललेला असतो. फुलातच फळ असते. मला पलीकडे ने, अशी प्रार्थना ओठ करत असतात, परंतु हातपाय स्वस्थ नसतात.

हे आनंदसिंधो ! हे तीर नि ते तीर, ही भाषाच झूट आहे. दोन्ही तीरे एकरूपच आहेत,-तुझ्या ठायीच आहेत. माझ्यामध्ये असलेला परिपूर्णतेचा परिमल जेव्हा मी विसरतो तेव्हा “मला परतीराला न्या” असे मी रडत  बसतो. माझे सारे हे व सारे ते-तुझ्या प्रेमात मिळून जायला उत्सुक असतात.

हा माझा क्षुद्र अहं रात्रंदिवस राबत असतो. जे घर खरोखरच आहे, तेच मिळावे म्हणून हा “क्षुद्र मी” धडपडत असतो. जोपर्यंत ह्या घराला तो तुझे घर असे म्हणणार नाही, तोवर बिचार्‍याची हालअपेष्टातून सुटका नाही. तोवर हृदय विव्हळेल व “हे नावाडया, मला पलीकडे ने” अशी आर्त हाक मारत राहील. ज्या क्षणी हे माझे घर तुझे होईल, त्याच क्षणी मी पलीकडे जाईन, तुला मिळेन. या जुन्या भिंती सभोवती असल्या तरी त्यांची अडचण होणार नाही. हा ‘मी’ मोठा चळवळ्या; त्याची जी वस्तू नाही, जी मिळवणे धर्म नाही, जिच्या प्राप्तीसाठी तो धडपडत असतो. जे वास्तविक सर्वांचे ते आपल्याच दोन हातांनी पकडून ठेवावे, असे त्याला वाटते. मग तो दुसर्‍याला दुखावतो नि स्वतःही दुःखी होतो. आणि “मला न्या रे पलीकडे” असे म्हणत रडत बसतो. ज्या क्षणी हा ‘अहं’ म्हणेल की, ‘माझे सारे काम तुझेच आहे’ त्याच क्षणी तो परतीराला प्राप्त होतो. इतर सारे उद्योग चालू असूनही तो स्वतःला परतीरावर बघतो.

हे माझे घर तुझे करूनच मी तुला भेटू शकेन. भेटण्याची आणखी का जागा आहे? माझे काम म्हणजे तुझेच काम असे मी करीन, तर लगेच तुझ्याशी जोडला जाईन. एरव्ही कसा बरे जोडला जाईन ! मी माझे घर सोडले तर तुझे मला मिळणार नाही, माझे काम सोडीन तर तुझ्या कर्मात मला सहकार्य करता येणार नाही. कारण तू माझ्यात राहतोस व मी तुझ्यात. माझ्याशिवाय तुला व तुझ्याशिवाय मला अर्थच नाही !

म्हणून आमच्या घरात, आमच्या उद्योगात, “मला पलीकडे ने” अशी प्रार्थना बाहेर पडते. सागर येथेच उसळत आहे. परतीरही येथेच आपली वाट पाहात आहे. होय;- तो अनन्त सर्वव्यापी परमात्मा येथे आहे. तो दूर नाही. येथे नसेल तर तो अन्यत्र कोठेही नाही. - येथेच तो आहे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel