यश्चायमस्मिन्नोकाशे
तेजोमयोऽमृतमयः
पुरुषः सर्वानुभूः ।
असे ब्रह्माचे वर्णन आहे. ब्रह्म म्हणजे जीवनाचे जीवन, सर्वांना प्रकाश देणारे तत्त्व. ते बाहेरच भरून राहिले आहे असे नाही, तर ते आपल्यामध्येही आहे. “यश्चायमात्मनि” - जे तुझ्या आत्म्यातही आहे. एकच चैतन्य आत बाहेर सर्वत्र आहे.
विश्वाशी एकरूप होण्यासाठी आपली भावना अनंत भावनेशी एकरूप केली पाहिजे. आपल्या भावनांचे क्षेत्र वाढवणे यातच मानवाची खरी प्रगती. ज्या मानाने तुमची भावना विशाल, त्या मानाने तुमची उन्नती. मानवी भावना अधिकाधिक विशाल व्हावी म्हणून काव्ये, तत्त्वज्ञाने, कला, शास्त्रे, धर्म यांचे सतत प्रयत्न. तुमची इस्टेट किती, यावरून तुमच्या जीवनाला किंमत नसून, तुमचही सहानुभूती किती व्यापक, यावर ती अवलंबून आहे. आपली जाणीव मुक्त करण्यासाठी, विशाल करण्यासाठी, किंमत द्यायला हवी. स्वार्थाचा होम ही ती किंमत. आत्मज्ञान हवे असेल तर देहार्पण करा. त्यागानेच वैभव. मरणानेच जीवन. उपनिषद् सांगते : ‘त्यागाने मिळेल. अधाशी नको होऊ.”
गीतेचेही हेच सार. निरपेक्ष कर्तव्य कर,-गीता सांगते. “कर्मफलत्याग सांगण्याच्या मुळाशी संसार मिथ्या ही भावना आहे,” असा निष्कर्ष काही पाश्चिमात्य पंडित काढतात. परंतु गोष्ट खरोखर उलट आहे. जो मनुष्य स्वार्थी असतो, त्यालाच इतर सारे तुच्छ वाटतात. त्याला स्वतःच्या मानाने इतर जग जणू मिथ्या वाटते. सारे जग सत्य आहे, असे अनुभवायचे तर वैयक्तिक वासना, स्वार्थ, यांना सोडावेच लागेल. आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी, इतरांच्या सुखदुःखात समरस होण्यासाठी आपणांस हा संयम शिकणे प्राप्त आहे. अधिक उदात्त जीवन मिळवायचे म्हणजे अधिक त्याग करावयाचा. ऐक्यभावना वाढत विश्वैक्य अनुभवणे हे मानवजातीचे ध्येय आहे.
भारतीय ब्रह्माची कल्पना पोकळ, शून्य नाही. ऋषी असंदिग्धपणे म्हणतो :
इह चेत् अवेदीत् अथ सत्यमसि
न चेत् इह अवेदीत् न हती विनष्टिः
या जीवनात ते जाणून घेणे म्हणजेच खरोखर जगणे; ते न जाणून घेणे म्हणजे मोठी हानी. अशा त्या ब्रह्माला कसे जाणावे? ‘भुतेषु भूतेषु विचिन्त्य’ - सृष्टीत सर्वत्र त्याला पाहून. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व-अशा रीतीने ऐक्यबुध्दीचे क्षेत्र उत्तरोत्तर वाढवण्यातच आपले कल्याण आहे. या गोष्टीपासून पराङ्मुख होणे म्हणजे नाशाकडे जाणे होय.