प्राचीन आर्यावर्तातील संपूर्णतेचे ध्येय याहून निराळे होते. पाश्चिमात्य आपल्या ध्येयासाठी जशी अहोरात्र धडपड करतात, तशीच प्राचीन भारतीयांनीही स्वतःच्या ध्येयासाठी केली. भारतीय संस्कृतीने सत्ता व सामर्थ्य यांना परमोच्च ध्येय म्हणून कधीच पूजले नाही. हिंदी जनतेचे रक्षण वा भक्षण करण्यासाठी म्हणून सर्वांनाच कधी शिपाई बनवले नाही. साम्राज्ये, लष्करी प्रभुत्व यासाठी हा देश फारसा कधी हपापला नव्हता; आणि म्हणूनच युरोपात यासाठी जशा संघटना दिसतात तशा आपल्याकडे दिसत नाहीत. भारतवर्षातील ध्येयासाठी उत्तमोत्तम माणसांना एकान्तमय जीवन कंठावे लागे. ध्यान, चिंतन यात त्यांना तन्मय व्हावे लागे. आपल्या पूर्वजांनी जे सत्यशोधन केले, मानवजातीला जे बहुमोल ठेवे दिले, त्यासाठी त्यांना ऐहिक वैभव, ऐहिक सुखविलास दूर सारावे लागत. त्यांना अपार व्यावहारिक नुकसानही सोसावे लागले. परंतु असे असले तरी भारतीयांचेही कार्य अपूर्व व लोकोत्तर आहे, भव्य व दिव्य आहे, यात शंका नाही. हे कार्य म्हणजे मानवी हृदयात अनंताला मिठी मारण्याची जी अनिवार्य तृषा असते तिचेच बाह्य आविष्करण होते. जीवनात अनंताचा साक्षात्कार करून घेतल्याशिवाय खरी विश्रांती नाही-हे ते ध्येय होते.
भारतात सद्गुणी, शहाणे व शूर पुरुष झाले. येथे राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, सम्राट, चक्रवर्ती झाले. परंतु येथे आदर्श पुरुष कोणाला मानण्यात आले? ऋषी हा आमचा आदर्श होता. आणि ऋषी म्हणजे काय?
संप्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः ॥
कढतात्मनो वीतरागाः प्रशान्ताः॥
ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीराः
युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति ॥ (मुंडकोपनिषद्)
“परमात्म्याला मिळवून ज्ञानाने तृप्त झालेले, आत्म्याचे परमात्म्याशी ऐक्य अनुभवल्यामुळे कृतार्थ झालेले, सर्व स्वार्थापासून मुक्त, जगाच्या सर्व प्रवृत्तींत प्रभुदर्शनच होत असल्यामुळे शांत राहणारे विश्वव्यापी प्रभूला सर्वत्र प्राप्त करून घेत असल्यामुळे जे धीरंगंभीर असतात व विश्वजीवनाशी समरस होतात, ते ऋषी” अशी ही व्याख्या आहे.
या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे विश्वाशी आपला संबंध अनुभवणे, प्रभूशी एकरूप होऊन तदद्वारा चराचराशी अद्वैत जोडणे, हे या देशात मानवाचे अंतिम ध्येय मानण्यात आले होते. हे ध्येय प्राप्त करून घेण्यात मानवी कृतार्थता आहे, असे समजण्यात येई.
मनुष्य जाळपोळ करू शकतो, लुटालूट, कत्तली करू शकतो, व्यापार करू शकतो, कुबेर होऊ शकतो, अज्ञानाचा शोध लावू शकतो, कलानिर्मिती करू शकतो; परंतु यांतील कोणत्याही गोष्टीमुळे त्याचा खरा मोठेपणा सिध्द होत नाही. आपल्या आत्म्यात तो चराचराचा समावेश करू शकतो म्हणून तो मोठा. ज्या वेळेस मानवी आत्मा, शुष्क, निस्सार अशा रुढीत गुरफटून जातो, क्षुद्र कामातच मग्न होतो, तेव्हा त्याला अनंत क्षितिज मग दिसत नाही. मनुष्याचे खरे स्वरूप म्हणजे विश्वव्यापी होणे, सर्वांशी मिळून जाणे हे आहे. मनुष्य स्वतःचा वा सृष्टीचा दास नाही. तो मुळात प्रेम करणारा आहे. मनुष्याची मुक्ती व पूर्णता प्रेमात आहे. प्रेम म्हणजे काय? पूर्णपणे एकरूप होणे म्हणजे प्रेम. या सर्व विश्वाशी एकरूप होण्याची जी शक्ती तिच्यामुळे जीव शिव बनतो. आत्म्याचे हे खरे स्वरूप. ज्या वेळी मनुष्य इतरांना कोपरखळ्या देऊन दूर लोटून स्वतःची प्रौढी मिरवू पाहतो, जेव्हा त्याचा गर्व वाढतो, त्या वेळेस तो परमात्म्यापासून दूर जातो. मानवी जीवनाचे ध्येय ज्यांनी गाठले त्यांचे उपनिषदात प्रशान्त व युक्तात्म असे वर्णन आहे. सृष्टीशी व मानवाशी ते प्रेमाने वागतात आणि म्हणून परमात्म्याशी जोडले जाऊन ते परम शान्ती अनुभवतात.