कायद्याच्या बंधनांनी सृष्टी जशी ईश्वरापासून अलग केलेली आहे, त्याप्रमाणे आपणही स्वतःच्या अहंच्या मर्यादांनी ईश्वरापासून दूर झालो आहोत. ईश्वराने स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेस मर्यादा घालून तुम्हा-आम्हास काही स्वातंत्र्य दिले आहे. पिता मुलाला काही कर्मस्वातंत्र्य देतो व त्यात ढवळाढवळ करीत नाही. तसेच तो जगज्जनक करतो. दोन स्वतंत्र इच्छा प्रेमाने एकत्र येऊ शकतील. जी इच्छा प्रेमामुळे अलग आहे, तिला दुसर्या स्वतंत्र इच्छेशी समरस झाल्याशिवाय कुठला आनंद? स्वार्थी माणसाला दुसर्याची स्वातंत्र्यता आवडत नसते. कारण स्वार्थ स्वतःच मुळी स्वतंत्र नसतो. स्वार्थ, सत्ता परतंत्र असतात. सुलतान एका स्वार्थ स्वतःच मुळी स्वतंत्र नसतो. स्वार्थ, सत्ता परतंत्र असतात. सुलतान एका अर्थाने आपल्या गुलामावर अवलंबून असतो, आणि म्हणून तर त्यांना ताब्यात ठेवायची खबरदारी घेतो. प्रेमाचा परमविकास दोन स्वतंत्र इच्छा परस्परांत मिळण्यात आहे. ईश्वराने प्रेमानेच तुम्हा-आम्हाला स्वतःपासून निराळे केले आहे. या प्रेमानेच पुन्हा आपण एकत्र मिळू. आपण कायमचे अलग राहू शकणार नाही. आपण मरतो, पुन्हा त्या अनन्त जीवनाशी एकरूप होतो, पुन्हा अलग होतो, पुन्हा एकरूप होतो. क्षणाक्षणाला हा द्विविध अनुभव हवा. अनंततेचा स्पर्श हवा. अलगपणाचाही अशा रीतीनेच जीवनात ताजेपणा राहतो.
जीवनमरणाचा हा खेळ सर्वत्र दिसून येतो. जुन्यांचे सदैव नवीन होत असते. येणारा दिवस जुनाच असतो, परंतु नवीन वाटतो. अक्षय अनंततेचा ठेवा सोन्याच्या परडीत घेऊन तो येतो. ते अनंततेच कण सर्वत्र विखरून सार्या सृष्टीला तो सतेज, ताजी करतो. सृष्टीच्या अंतरंगी अनन्त तारुण्य आहे. मृत्यू व विनाश तात्पुरत्या छाया. सत्यच सदैव ताजे चमकत राहील.
अनंततेतून येणारा प्रत्येक दिवस अमरतेचा संदेश घेऊन येतो. तो दिवस सांगतो, “मरण रोज मरत असते. मरण चिरकालीन नाही. प्रक्षुब्ध लाटांनी घाबरू नका. खाली अथांग शान्त सागर आहे. रात्रीचा पडदा दूर होईल; सत्याचा निष्कलंक प्रकाश सदैव ताजा घवघवीत मिळत राहील.”
जो सर्वांच्यापूर्वी होता तो तसाच आजही आहे. सृष्टीच्या संगीतातील प्रत्येक ताना त्याच्या ध्वनीमुळे ताजी वाटते. तोच गात आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला स्वामींच्या हृदयातून गीतताना बाहेर येत आहेत. ज्याप्रमाणे एखादा विचार सर्व काव्याला व्यापून असतो, त्याप्रमाणे त्या प्रभूचे संगीत सर्व विश्वाला व्यापून आहे. त्यामध्ये कधी खंड नाही पडत. म्हणून सर्वत्र विविधता आहे. अपार रुपे, अपार ताना, नित्य नीवन. कोठून येतात कळत नाही. परंतु येतात ही गोष्ट खरी. आणि जसे सृष्टीच्या आरंभी तसेच आज जे सुरू झाले आहे ते संपणार नाही. हे विश्व सदैव जुने आहे, सदैव नवे आहे.