जीवात्मा व परमात्मा याचे ऐक्य दुकानात वस्तू घडवायची तसे नाही. परमात्म्याने जीवरूपी वधूला आधीच माळ घातलेली आहे.
“यदेतत् हृदयं मम तदस्तु हृदयां तव ।” हे माझे हृदय तुझे असो हा पवित्र मंत्र पूर्वीच उच्चारला गेला आहे. हे चिरलग्न आहे. ते हळूहळू लागायचे आहे असे नाही. ‘हा’ या शब्दाहून ज्याचे अधिक वर्णन करता येत नाही, असा हा ‘हा’ अनाम, अरूप, प्रत्यक्, परमात्मा तो सदैव अंतरंगात आहेच.
एषा अस्य परमा गतिः ।
आपल्या जीवाची परमगती, म्हणजे ‘हीच’ शेवटी त्याला जाऊन मिळायचे.
एषा अस्य परमा संपत् ।
जीवाची सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे हीच.
एष अस्य परमो लोकः ।
ह्या जीवाचे श्रेष्ठ धाम म्हणजे ‘हा’.
एष अस्य परम आनंदः ।
जीवाचा परम आनंद म्हणजे ‘हा’ होय. असा हा जो ‘हा’ ह्याच्याशी जीवाचे परम प्रीतीचे लग्न कालातीत काली कधीचे लागलेले आहे. आता केवळ प्रेमलीला चालली आहे. लपंडावाचा खेळ आहे. दिक्कालातील अशा ठिकाणी जो आधीच मिळालेला आहे, तोच या दिक्कालमर्यादित जीवनात पुन्हा पाहायचा, अनुभवायचा. जीवरूपी वधूला जेव्हा ही खुबी कळते तेव्हा तिचे हृदय आनंदाने उचंबळून येते व तिला परमभक्ती लागते. नदी एका टोकाला सागराला मिळालेलीच आहे, परंतु दुसर्या टोकला नेहमी मिळायचेच आहे, त्याप्रमाणे एका टोकाला अनंताशी आपले परमैक्य जडलेलेच आहे. ही दोन्ही टोके कायमची जोडलेली आहेत. हे जेव्हा जीवाला समजेल, त्या वेळेस हे सारे जग त्याला कुटुंबवत वाटेल. कारण तो जगाचा स्वामी म्हणजे आपला प्रियकर, ही गोष्ट जीवाला कळून येईल आणि हे एकदा कळून आले म्हणजे सर्व सेवा प्रेमरूप वाटेल. कष्ट, संकटे म्हणजे प्रियकर घेत असलेली कसोटी वाटेल. आपण सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या इर्षेने सारे सहन करू. परंतु जोवर जीवरूपी वधू अंधारातच रुतून बसून राहील जगाला प्रियकराहून निराळा मानील, तोवर तिला स्वातंत्र्य नाही. ती राणी होण्याऐवजी दासी म्हणून रडत राहील.
दौर्भिक्षयत् याति दौर्भिक्ष्यम्
क्लेशात् क्लेशं भयात् भयम् ।
दुष्काळातून आणखी दुष्काळाकडे, या संकटातून त्या संकटात, या भीतीतून त्या भीतीकडे असे जीवाला जात राहावे लागेल.
एके ठिकाणी उत्सव होता. हजारो यात्रेकरून जमले होते; आणि रात्र संपून पहाट व्हायची वेळ आली होती. त्या प्रचंड गर्दीत एका गाण्याचा छोटासा चरण माझ्या कानावर पडला -