आत्म्याची अनुभूती
आत्मा परमात्म्यात मिळवावा, स्वतःची जाणीवशक्ती चराचराला व्यापील अशी विशाल करावी, ही प्राचीन भारतीयांची महत्त्वाकांक्षा असे. जर ही जाणीव वाढवायची असा अर्थ असेल तर हे कधीच शक्य नाही असे कोणी म्हणतील. परंतु खरे पाहिले तर जगाचा अनुभव घेणे ही गोष्ट वाटते तशी वेडेपणाची नाही. आपले कार्यक्षेत्र मनुष्य दिवसेंदिवस वाढवत आहे. नाना प्रकारचे प्रश्न उभे राहात आहेत. ओझे वाढत आहे. परंतु मनुष्य या सर्वांची एखाद्या विशिष्ट पध्दतीने व्यवस्था लावतो आणि मग बोजा हलका वाटतो. ज्या वेळेस गोंधळ असतो, गुंतागुंत असते, काही चुकते, तेव्हा कामाचा डोंगर वाढतो. सारे सुव्यवस्थित असले म्हणजे सोपे वाटते. आपल्या सर्व खटाटोपात मेळ हवा, एकसूत्रता हवी. एवढेच नव्हे तर, या विश्वातील अनंत, विविध घटनांत, परस्परविरुध्द गोष्टीतही एक प्रकारची आन्तरिक एकता असते व ती शोधून काढण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. या एकत्वाचा अनुभव घेणे म्हणजे चराचराचा अनुभव घेणे. हेच परमोच्च ध्येय. हे एकत्व जाणून घेऊ तर खरे सामर्थ्य लाभेल. ही एकता म्हणजे परम सत्य. घटना अनेक असतात. परंतु सत्य एकच असते. मानवी मनाला सत्याचे आकलन होऊ शकते. झाडावरून फळ खाली पडले, पाऊस वरून पडतो, अशी शेकडो उदाहरणे डोक्यात कोंबली तरी त्यांना अंत नाही; परंतु आकर्षणाचा नियम एकदा लक्षात आला की, मग या शेकडो गोष्टींची जरुरी नाही. अनंत गोष्टींना व्यापून असणारे तत्त्व सापडणे याहून थोर आनंद दुसरा कोणता? सत्याच्या प्राप्तीसारखा निर्मळ आनंद दुसरा नाही. मानवी मनाचा तो मोक्ष. एखाद्या गल्लीत गेलो तर पुढे रस्ता नसतो, परंतु सत्य आणखी विशाल क्षितिज डोळ्यासमोर उभे करते. सत्य अनंताकडे, असीमाकडे नेत असते. डार्विनसारखा महान् शास्त्रज्ञ जेव्हा प्राणिशास्त्रातील साधे सत्य शोधून काढतो, त्या वेळेस ते त्या शास्त्रापुरतेच मर्यादित न राहता इतर शेकडो गोष्टींवर प्रकाश पाडते. ज्या वस्तूच्या शोधासाठी दिवा लावला, ती वस्तू तर त्या दिव्याने दिसेलच, परंतु इतर शेकडो वस्तूंवरही तो दिवा आपले किरण फेकतो. एखादे साधेच सत्य, परंतु अशा रीतीने विश्वव्यापी होते. सत्यशोधनात जरी सर्व वस्तूंचा विचार असतो, तरी सत्य म्हणजे त्या वस्तूंचा समुच्चय नव्हे. सत्या त्या सर्व वस्तूंना व्यापून पलीकडे जाते; अनंततेचे दर्शन घडवते.
ही गोष्ट जशी विज्ञानात तशीच आपल्या अनुभूतीतही. मनुष्याला अशा एखाद्या सर्वव्यापी मूलभूत सत्याचा साक्षात्कार व्हावा की, ज्यामुळे जास्तीत जास्त विशाल विश्वाची त्याला कल्पना येऊ शकेल. उपनिषद् जेव्हा म्हणते: ‘तू आपल्या आत्म्याला ओळख,’ तेव्हा तुमच्या हातात असे सर्वव्यापी तत्त्व देण्याचाच उद्देश असतो. ‘आत्म्याला जाणा’ म्हणजे प्रत्येक व्यक्तिमात्रात असलेले महान ऐक्य अनुभवून घ्या.
आत्मदर्शनाला अहंकाराचा अडथळा असतो. अहंकार दूर लोटू तर विश्वाशी एकरूप होणारे आपले आत्मरूप आपणास दिसू शकेल.
लहान मुले क, ख, अशी एकेक अक्षरे वाचतात. तोवर त्यांना खरा आनंद वाटत नाही. त्या एकेक अक्षराकडे लक्ष देणे कंटाळवाणे असते. परंतु अक्षरांचे शब्द व शब्दांची वाक्ये बनून आपणास विचार मिळतो तेव्हा आनंद होतो. त्याप्रमाणेच अहंकाराच्या छोट्या तुरुंगात आत्मा गुदमरतो. विश्वापासून आपण अलग होतो. आत्म्याचे महत्त्व अपाण विसरतो. ऐक्य हे तर आत्म्याचे स्वरूप-सर्वस्व. दुसर्याशी एकरूपता अनुभवूनच आत्म्याला स्वतःची सत्यता अनुभवता येते. जोपर्यंत सृष्टीतील एकतेचा कायदा मानवाला कळत नाही, तोवर तो संशयग्रस्त व भयभीत असतो. त्याला ही सृष्टी परकी वाटते. परंतु स्वतःची विवेकबुध्दी व सृष्टीचे व्यवहार यात अविरोध आहे हे त्याने ओळखले, ज्या जगात आपण नांदतो ते काही परके नाही, ते जग आणि मी एकच आहोत, ही गोष्ट ज्या क्षणी त्याला समजली त्या क्षणी परमानंद झाला. तो आसमंतात सर्वत्र स्वतःला पाहू लागला. एखाद्या गोष्टीचे ज्ञान होणे याचा अर्थ त्या गोष्टीत आपले काही तरी आहे हे ओळखणे होय. परंतु केवळ ओळखून भागत नाही. ज्ञानाने पुरा संबंध येत नाही. प्रेमाचा संबंध संपूर्ण, सर्वांगीण असतो. प्रेमामध्ये दुजेपणाची, भिन्नतेची जाणीव आपण विसरतो. स्वतःच्या मर्यादा ओलांडून अमर्याद तत्त्वाची गाठ घेतो. ही प्रेमप्राप्ती हाच मनुष्याचा परमोच्च आनंद. या प्रेमामुळेच आपण आहोत त्यापेक्षा किती महान् आहोत हे त्याला समजून येते. प्रेमानेच सर्वात्मकता तो अनुभवू शकतो.