नदी समुद्र होऊ शकली तरी सर्वस्वी ती नाही होऊ शकणार. जरी तिने विशाल व रूंद अशा जलाशयाला वेढले असले तरी तिला आपण म्हणू, ‘तुझा प्रवाह अजून समुद्रातच विश्रान्ती मिळावी म्हणून धडपडत आहे. तुझा ओघ समुद्राला कधीही मर्यादा घालू शकणार नाही.”

ज्या अर्थाने नदी समुद्र होऊ शकते, त्याच अर्थाने जीव ब्रह्मरूप होऊ शकतो. नदी अनेक वस्तूंना स्पर्श करत पुढे जाते, त्याप्रमाणे जीवात्माही या वस्तुजातातून अखेर परब्रह्माकडे जातो. सागराला मिळेपर्यंत नदीची धावपळ; मगच विश्रान्ती व शान्ती. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर आणखी कोठे मग जायचे उरत नसते. माझी विश्रान्ती ब्रह्माच्या ठिकाणी, ही गोष्ट एकदा जीवाला पटली की मग त्याच्या प्रत्येक कृतीला अर्थ प्राप्त होतो. त्याचे सर्व उद्योग त्या इष्ट स्थळी पोचण्यासाठी होऊ शकतात. आपल्या दैनंदिन विकासाला जे अपूर्व सौंदर्य प्राप्त होत असते ते त्या अंतिम ध्येयाच्या ध्यासामुळे. साहित्यसंगीतादी कलातून ही रमणीयता प्रकट होत आली आहे.

कवितेत एक विचार भरून राहिलेला असतो. त्या कवितेतील प्रत्येक वाक्य त्या विचाराकडे नेत असते, त्या विचाराला स्पर्श करत असते. त्या कवितेतील मध्यवर्ती कल्पना जेव्हा वाचकांच्या लक्षात येते, तेव्हा त्याला अपार आनन्द होतो. त्या मध्यवर्ती विचाराच्या प्रकाशात कवितेतील सर्व भाग प्रकाशित होतात. कवितेतील प्रत्येक चरणात त्या मध्यवर्ती कल्पनेचा भाग जर दिसून आला नाही, तर सूत्र जर सर्वत्र अनुस्यूत नसेल, तर ती कविता कितीही चांगली असली तरी नीरस वाटेल. आपल्या जीवनाचा विकास कवितेप्रमाणे आहे. तो अनन्त परमात्मा मिळवणे हे जीवाचे ध्येय. आपल्या जीवनाच्या काव्यातील ही मध्यवर्ती कल्पना. आपले सारे उद्योग मग या ध्येयाकडे नेणारे व्हायला हवेत. ध्येयहीन धावपळ आपणास सतावते, पिशाच्चाप्रमाणे ती मानगुटीस बसते. परंतु ध्येयाच्या ध्रुवतार्‍याला समोर ठेवून जर सर्व कर्मे होत जातील, तर ती केवढी कृतार्थता !

लहानपणी आम्हांला एक शिक्षक होते. ते संस्कृत व्याकरण आम्हाला मुखोद्गत करायला लावीत. परिभाषेचा अर्थ न सांगता ते आमच्याकडून घोकून घेत. दिवसामागून दिवस जात होते. परंतु ही घोकंपट्टी कशासाठी ते आम्हाला कळेना. ध्येयहीन मनुष्य जसा उगीच आदळआपट करत राहतो, तसे आमचे घोकणे चालले होते ज्याच्या डोळ्यांसमोर ध्येय असते त्याच्या धडपडीला, अगणित श्रमांना समतोलपणा, हेतुमयता, नि म्हणूनच सुंदरताही प्राप्त होते. धडपड कशासाठी, हे लक्षात न येईल तर मग कोठला आनन्द? कारण सत्याचे दर्शनच नाही. जीवाला ब्रह्मरूप व्हायचे आहे ही खरी सत्यता. ह्यात जीवाचा आनन्द. आपल्या सर्व क्रिया ह्या ध्येयार्थ हव्यात.

उपनिषदांत एक अत्यंत विचारप्रवर्तक वाक्य आहे -
“नाहं मन्ये सुवेदेति
नो न वेदेति वेद चित् ।”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel