एक गोष्ट आपण विसरता कामा नये की, मनुष्य जेव्हा एखादा विचार प्रकट करतो, तेव्हा त्याने उच्चारलेले केवळ शब्दच पाहून चालत नाही. सामान्य वस्तूंच्या बाबतीत केवळ शब्दार्थ पाहून भागेल, परंतु महनीय कल्पना केवळ बाह्य शब्द पाहून समजणार नाहीत. उच्चारलेले शब्द म्हणजे मनातील विचारांच्या खुणा. विचारांचे संपूर्ण स्वरूप या तोंडी खुणांनी प्रकट करता येत नाही. शब्द उच्चारणार्या व्यक्तीच्या जीवनावरून त्याचा अर्थ बघावा लागतो. कोश घेऊन शब्दाचा अर्थ बघू पाहाल तर अर्थाच्या अंगणात पोचाल, अर्थाच्या गाभार्यात-अंतरंगात प्रवेश हवा असेल तर ते शब्द उच्चारणार्या व्यक्तीच्या जीवनात शिरा. ऋषिमुनींच्या शब्दांची नेहमी ओढाताण चालते. याचे कारण हेच की, आपण केवळ बघतो. शब्दवेल्हाळ लोक शब्दपांडितच गुंगतात. ते जाळे बघत राहतात; जाळ्याने काही पकडायचे आहे, मिळवायचे आहे, हे विसरतात. आपण शब्दातील कल्पना जीवनात अनुभवून बघायला तयार नसतो.
बुध्द धर्म किंवा हिंदुस्थानातील इतर धर्म यांनीच स्वार्थत्यागाचे, स्वत्व विसरण्याचे तत्त्व सांगितले असे नाही. तर ख्रिस्तधर्मातही ही गोष्ट उत्कटतेने उपदेशिलेली दिसेल. मरणानेच या अनित्य जीवनातून सुटका, असे ख्रिस्त म्हणतो. मरणाने जीवन मिळेल. क्रॉसने मोक्ष मिळेल, असे ख्रिस्ती धर्म नाही का सांगत? ख्रिस्तांचा क्रॉस, बुध्दांचे निर्वाण- दोन्हीचा अर्थ एकच. एकाच अर्थाच्या या खुणा, ही प्रतीके.
अविद्येपासून सुटका म्हणजे मोक्ष, हे भारतीय संस्कृतीचे सार आहे. जे सत्य आहे त्याचा नाश करून मोक्ष नाही मिळत. कारण जे सत्यार्थाने आहे ते नाहीसे करताच येणार नाही. सत्यदर्शनाला जे जे विरोधी ते दूर केल्याने मोक्ष मिळतो. डोळ्यांनी पापणी उघडणे म्हणजे डोळ्यांचा नाश नव्हे.
आपले व्यक्तित्व तेवढेच खरे, असे मानणे ही मोठी चूक होत असते. ‘आपणापुरते आपण’ असे मग आपण मानतो. स्वार्थ हेच मग जीवितकार्य होऊन बसते. रस्त्यातील धुळीलाच उराशी धरून बसणारा ज्याप्रमाणे कधीच मुक्कामावर पोचू शकणार नाही, तसे आपले होते होते. आपल्या आत्म्याचा स्वभाव पुढे जाण्याचा, उत्तरोत्तर विशाल होत जाण्याचा असतो. केवळ स्वतःलाच धरून बसू तर जे महान वस्त्र आपणास विणावयाचे आहे, ते विणता येणार नाही. आत्मसूत्र आणि विश्वसूत्र मिळून वस्त्र होईल. आपल्याच सुखोपभोगांची काळजीपूर्वक योजना करणे म्हणजे चूल पेटवणे होय; परंतु भाकरी भाजायला पीठ त्यामुळे मिळणार नाही.
जी भाषा आपणास समजत नाही, तिच्यातील अक्षरे मानगुटीस बसतात. ती थांबतात. अडवतात, परंतु बोलत नाहीत. शब्दांच्या जंजाळातून सुटायचे असेल तर अविद्येपासून, अज्ञानापासून झडझडून दूर झाले पाहिजे. मग शब्दातील भावार्थ सापडेल. ज्या वेळेस पूर्ण ज्ञान होते, त्या वेळेस प्रत्येक शब्द योग्य ठिकाणीच आहे असे कळून येते. मग ते शब्द जखडून न ठेवता पुढे नेतात; विचारांचे, सत्याचे दर्शन घडवतात; मुक्त करतात.
अविद्येमुळे, अज्ञानामुळे ‘आपण आपल्यापुरते’ असे आपणास वाटते. वास्तविक स्वतःच्या मर्यादा ओलांडून आपणास पुढे जायचे असते. म्हणून ऋषी येऊन सांगत : “अविद्येपासून मुक्त व्हा. आत्मरूप समजून घ्या, अहंकारातच नका गुरफटून जाऊ.”
ज्या वेळेस आपणास आपले अत्यंत सत्यमय असे स्वरूप सापडते, त्याच वेळेस खरी स्वतंत्रता लाभते. कलेचे ध्येय सापडल्यावरच कलावानास कलाक्षेत्रातील स्वातंत्र्य लाभते. मग तो उगीच अनुकरण करत बसणार नाही, लोकांना काय आवडते याची पर्वा करणार नाही. धर्माचे काम व्यक्तीच्या स्वधर्माचे विकसन हे आहे, तो विशिष्ट धर्म मारणे हे नाही.