माझा एक विद्यार्थी एकदा वातचक्रात सापडला. धुळीचे लोट उठले. तो विद्यार्थी मला म्हणाला, “ते वादळ माझा उपमर्द करीत होते. मी म्हणजे जणू मूठभर माती. स्वतंत्र इच्छाशक्ती असलेला मी एक जीव आहे, याची त्या वादळाला पर्वाच नव्हती !”
मी त्याला म्हटले, “सृष्टी जर प्रत्येक व्यक्तीच्या इच्छांचा विचार करू लागेल तर तिचे कार्यच थांबेल. तुम्हा सर्वांनाच मग अपार आपत्ती भोगाव्या लागतील.”
तरीही तो ऐकेना. त्याचे म्हणणे असे की, “माझे अस्तित्व नाकारून चालणार नाही. मला का महत्त्व नाही? माझ्यातील अहं हा का कःपदार्थ?”
मी त्याला म्हटले, “तुला जे मी मी म्हणून वाटते आणि तुझ्या मीहून अलग असे जे दुसरे विश्व तुला वाटते, त्याच्याशी तुझा मीचा संबंध आहे. आणि ह्या दोघांना व्यापून पुन्हा तिसरे तत्त्व असते. त्या तिसर्या तत्त्वाचा तुझ्या मीशी किंवा मीहून अलग विश्वाशी सारखाचा संबंध असला पाहिजे.”
मी तीच गोष्ट पुन्हा येथे सांगत आहे. आपल्या व्यक्तिगत जीवनाला विश्वात्मक जीवनाची तहान असते. डोळे स्वतःलाच पाहतील तर त्यांना अर्थ नाही. शरीर स्वतःलाच खाईल तर ते जगेल कसे?
जोरदार प्रतिभाशक्ती सत्याला मिठी मारणारी असते. त्याप्रमाणे सामर्थ्यसंपन्न व्यक्ती विश्वात्मकतेकडे जात असते. व्यक्तीचा मोठेपणा व्यक्तीमध्ये काय आहे यावर आहे. भांड्याचे महत्त्व त्याच्या आकारावर नसून त्यातील पदार्थावर आहे. सरोवराची खोली केवळ खळग्यावरून नसून त्यातील पाण्याच्या खोलीवरून अजमावयाची असते.
जर आपण सत्यासाठी तहानलेले असू, स्वतःच्या वासना नि स्वतःचा बडेजाव यात तुम्हाला सुख नसेल, तर तुम्हाला विश्वाच्या इच्छेशी मिसळून वागावे लागेल. चालणारे मूल पडले तर त्याला लागणारच. त्यासाठी पृथ्वी मृदू नाही होणार. पृथ्वीच्या टणकपणामुळे मुलाला लागले तर त्याच टणकपणामुळे त्याला उभेही राहणे शक्य झाले. एकदा माझी नाव नदीच्या पुलाखालून जात असता डोलकाठी पुलात अडकली. डोलकाठी दोन इंच एकदम कमी झाली असती, किंवा पूल दोन इच वर जाता, किंवा नदी दोन इंच दबती, तर माझे सारे नीट जमले असते. परंतु ती डोलकाठी, तो पूल, ती नदी यांनी माझ्या ‘अहं’ चा विचारच केला नाही. परंतु नदी, डोलकाठी, पूल यांचा त्यांच्या अभंग स्वरूपामुळेच आपण उपयोग करू शकतो. मोठा पूर आला तर त्या पुलावरून मी निर्धास्तपणे जातो. वस्तू या अशा आहेत. त्यांच्याजवळ आपणास वागायचे आहे. त्यांचे ज्ञान करून घ्यावे. आपली इच्छा म्हणजे विश्वाचा कायदा नव्हे. वस्तूचे ज्ञान आनंददायक असते. कारण त्या त्या वस्तूचे स्वरुप कळल्यामुळेच आपण त्यांच्याशी संबंध जोडतो, त्या आपण आपल्याशा करून घेतो व आपण स्वतःला मोठे करतो.
या जगात पदोपदी दुसर्याचा विचार करावा लागतो. गेल्यावरच आपण एकटे असतो. कवी असतो, तो आपली कल्पना सर्वांना आनंद देणारी करतो. सर्वांना डोलवील अशी भाषा योजतो. भाषेचे नियम तो जाणतो. त्या नियमांचे पालन करूनच तो मोठा होतो.