पापाचा प्रश्न

जगात पाप का आहे, असे विचारणे म्हणजे जगात अपूर्णता का, असे विचारण्यासारखे आहे. किंबहुना ही सृष्टी उत्पन्नच का करण्यात आली, असे विचारण्यासारखे आहे. जगात पाप असणारच हे गृहीत धरूनच जायला हवे. कारण जग हळूहळू पूर्णतेकडे जात आहे. प्रश्न असा विचारायला हवा की, जगातील पाप शाश्वत स्वरूपाचे आहे का? जगातील दुष्टता जगाच्या अंतापर्यंत राहणार का? नदीला दोहो बाजूना बंधनात ठेवणारी तीरे आहेत. परंतु ती तीरे म्हणजे का नदी? उलट त्या बंधनामुळेच नदी पुढे जाते. बोटीला दोरी बांधून ओढतात. ती दोरी का बंधन? त्या बंधनामुळेच बोट पुढे नाही का येत?

जगाच्या प्रवाहाला मर्यादा आहेत. बंधने आहेत. परंतु त्यामुळे जग बध्द न होता पुढेच जात आहे. या जगात दुःखे, अडथळे आहेत याचे आश्चर्य न वाटता या जगात नियमबध्दता आहे, व्यवस्था आहे, सुंदरता आहे, सद्भाव आहे, प्रेम आहे, आनंद आहे,-याचे आश्चर्य वाटले पाहिजे. जे अपूर्ण आहे तेही त्या परिपूर्णाचेच स्वरूप आहे, ही गोष्ट मानवाला अंतर्गाभार्‍यात कळलेली आहे. निरनिराळ्या सुरात संपूर्ण संगीताचे जसे गायकाला दर्शन होते, तसेच अपूर्णताही पूर्णतेचे दर्शन दृष्टी असलेला मनुष्य घेऊ शकतो. जे मर्यादित दिसते ते त्या मर्यादांनी कोंडलेले नाही. हा विरोधाभास मानवास समजलेला आहे. जे मर्यादित दिसते ते क्षणाक्षणाला मर्यादा सोडून पुढे जात आहे. खरे म्हणजे अपूर्णता म्हणजे पूर्णतेचा अभाव नव्हे. सान्तता अनंततेला विरोधी नाही. अंशाअंशाने प्रकटणारी पूर्णता म्हणजे अपूर्णता. मर्यादित स्वरूपात प्रकट होणारी अनन्तता म्हणजे सान्तत.

दुःख आहे म्हणून आपण अपूर्ण आहोत असे वाटते. परंतु हे दुःख म्हणजे जीवनातील सत्यता नव्हे. दुःखाचा हेतू दुःखच नाही. शास्त्रांच्या इतिहासात अनेक चुका घडलेल्या दिसतात. पुढील शास्त्रज्ञांनी त्या दूर केल्या. त्या चुका का शाश्वत स्वरूपाच्या? चूक ही स्वभावतःच विनाशी आहे. चुकीची आज ना उद्या दुरुस्ती होणारच. सत्य कायम टिकणारे. परंतु असत्य नष्ट होत असते. बौध्दिक क्षेत्रात जसे चुकांचे, तसे दुःख, दोष, पाप यांचे जीवनात स्थान आहे. दुःख, पाप यांना आपण फाजील महत्त्व देतो. तीच सत्यता असे समजतो. जगातील प्रत्येक मिनिटाला होणार्‍या मृत्यूचेच आकडे जमवले तर आपण घाबरून जाऊ. परंतु जीवनाचा प्रवाह अखंड चालू आहे. मृत्यूने तो अडत नाही. जगात रोग असतो, मरण असो. ही पृथ्वी, हे पाणी, ही हवा, हा प्रकाश सर्वांना सुखवायला नि हसवायला सिध्द आहे. विनाशी वस्तूंचे आपण उगीच प्रस्थ माजवतो आणि कपाळाला हात लावून बसतो. मनुष्य जेव्हा जीवनातील एखाद्या विवक्षित अंगालाच महत्त्व देतो, तेव्हा सत्याचा त्याला विसर पडतो. गुप्त पोलिस सारखे गुन्हे शोधीत असतो. सामाजिक जीवनात तो गुन्हेगारीलाच अधिक महत्व देतो. परंतु हे जे विशाल सामाजिक जीवन, तेथे वाटेल त्या प्रश्नाला वाटेल तेवढी जागा मिळणार नाही. एखादा शास्त्रज्ञ उभा राहतो नि म्हणतो, “काय ही भेसूर सृष्टी ! हा त्याला खात आहे, तो ह्याला खात आहे.” अशा रीतीने आपण एकांगी दृष्टीचे बनतो आणि सत्य गमावतो. आपल्या शरीराच्या प्रत्येक चौरस इंचावर हवेचा केवढा दाब हे लक्षात आणू, तर अजून चिरडले कसे गेलो नाही, याचे आश्चर्य वाटेल ! परंतु हवेच्या या वजनाची बेरीज-वजाबाकी होऊन सुंदर व्यवस्था लागते. आणि हे सारे ओझे आपण लीलेने उचलीत असतो. हे ओझे उचलीत आहोत, याचे आपणास भानही नसते. सृष्टीत जीवनाचे कलह आहे. तर इकडे दुसर्‍याही अनेक गोष्टी आहेत. मुलांबद्दलचे वात्सल्य, मित्रांबद्दलचे प्रेम, स्वार्थत्याग, कृतज्ञता, बंधुभाव याही गोष्टी सर्वत्र आहेत. दया, त्याग यांचा जन्म प्रेमातून होतो आणि प्रेम हे जीवनाचे सार आहे.

आपण मरणावर दृष्टी सारखी खिळवू तर जग हे खाटिकखाना दिसेल. परंतु चोवीस तासात मनात मृत्यूचा विचार किती वेळ असतो? मृत्यूचा विचार हा कधी कधी पाहुण्यासारखा मनात येतो. प्रेम हे जीवनाचे अस्तित्व आहे म्हणून तर मृत्यू हे जीवनाचे नास्तिरूप आहे. आपण डोळयांच्या पापण्या कितीदा तरी मिटतो, इकडे आपले लक्ष नसते. आपण बघतो ही गोष्ट ध्यानात असते. आजूबाजूला मृत्यु असला तरी आपले लक्ष जीवनाकडे असते. हे महान् जीवन मृत्यूची मातब्बरी राखीत नाही. जीवन हसत खेळत, नाचत गात पुढे जात आहे. जीवनात हास्य आहे, खेळ आहे, गंमत आहे. मनुष्य नवीन बांधतो, प्रेम करतो. मृत्यूच्या नाकावर टिच्चून हे महान् जीवन उसळत आहे. जीवनातून मृत्यूला बाजूला काढून त्याच्यावरच फक्त जेव्हा आपण दृष्टी खिळवून बसतो, तेव्हा आपणास सारे भीषण वाटते. परंतु मृत्यू हे एक जीवनांग आहे. दुर्बिणीतून एखाद्या सुंदर वस्त्राकडे पाहाल तर मोठमोठी भोके सर्वत्र दिसतील. मग ते वस्त्र हातात धरायला नको. परंतु खरी गोष्ट का तशी आहे? आकाश कधी काळे दिसले तरी ते काळेपण उघडणार्‍या पक्ष्याच्या पंखांना काळे करू शकणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel