१०

आठदहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. महात्माजी त्या वेळी अलीकडल्याप्रमाणे सतत देशभर फिरत नसत. सेवाग्रामलाच ते स्थायिक असत.

त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आपण सामान्य माणसे स्वत:चा वाढदिवस गोडधोड खाऊन व नाचत गाजत दिवस घालवून साजरा करतो. पण आश्रमात असले काही एक नसते. वाढदिवसाच्या दिवशी सर्व काही साधेपणाने चालते आश्रमात.

या वर्षीच्याही वाढदिवशी संध्याकाळी रोजच्याप्रमाणे सायंकाळी प्रार्थनेसाठी आश्रमातील मंडळी जमली. खास तयार केलेल्या उंच जागी गांधीजीं प्रार्थनेसाठी बसले. तेथे नव्हती सजावट, नव्हते हारतुरे.

फक्त उंचवट्याच्या जागी गांधीजींच्या समोर एका निरांजनात फुलवात मंदपणे तेवत होती. स्वत:ला जाळून घेऊन जगाला प्रकाश देणारी ती फुलवात गांधीजींच्या जीवनाचे प्रतीक होती.

गांधीजींनी निरांजनाकडे पाहिले. त्यांनी डोळे मिटले. प्रार्थना सुरू झाली.

आज प्रार्थनेनंतर गांधीजींचे वाढदिवसाच्या दिवसाचे खास प्रवचन होते. गांधीजींनी सुरवातीलाच विचारले.

‘हे निरांजन कुणी लावलं?’

कस्तुरबा म्हणाल्या : ‘मी.’

गांधीजी बोलू लागले : ‘आजच्या दिवसात सर्वांत वाईट अशी गोष्ट कोणती झाली असेल तर ती ही की, ‘बा’ने आश्रमामध्ये निरांजन लावलं. आज माझा वाढदिवस म्हणून का हे निरांजन लावलं? माझ्या भोवती पसरलेल्या खेड्यांत मी जातो तेव्हा मी पाहतो की, ‘खेडुतांना भाकरीवर लावण्यास तेलही मिळत नाही आणि माझ्या आश्रमात आज तूप जाळलं जात आहे! नंतर ते ‘बां’ना उद्देशून म्हणाले : इतक्या वर्षांच्या सहवासात हेच का शिकलीस तू! खेडुताला ज्या गोष्टी मिळत नाहीत, त्यांचा उपभोग आपण नाही घेता कामा. माझा वाढदिवस असला म्हणून काय झालं? वाढदिवसाच्या दिवशी सत्कृत्य करायच असतं. पाप नाही.

प्रवचन संपले. पण प्रवचनात सांगितलेला उपदेश मात्र ‘बा’ पुढे कधी विसरल्या नाहीत.

महात्माजींच्या मनात नेहमी खेडुतांचा विचार असे. त्यांची सुखे तीच आपली सुखे, त्यांची दु:खे तीच आपली दु:खे, असे ते मानीत असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel